आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजार विचारून कर्मचारी देतात रुग्णांना औषधे, आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह सुविधांची वानवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम- २,५४१ लोकसंख्या असलेल्या आंबी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दिवसभरातील सर्व रुग्णांची तपासणी अवघ्या एका आरोग्य सेविकेने केल्याचे दिसून आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. करडे रविवार व सोमवारी परीक्षेसाठी गेल्याने त्यांनी काही तातडीचे रुग्ण आल्यास वालवड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पोतरे यांना आंबी येथे येऊन त्या रुग्णाची तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सोमवारी वालवड व आंबी या दोन्ही गावांचा आठवडी बाजार असल्याने डॉ. पोतरे आंबी येथील आरोग्य केंद्रात येऊ शकले नाहीत, दरम्यान आरोग्य केंद्र उघडण्याची वेळ सकाळी साडे आठ वाजण्याची होती. मात्र नऊ वाजता दार उघडण्यात आले. 

 

मागास भाग म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यातील आंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 'दिव्य मराठी'ची टीम सकाळी साडेआठ वाजता दाखल झाली. आरोग्य केंद्राची वेळ साडेआठ वाजता असताना पावणेनऊ वाजता कर्मचाऱ्यांनी दार उघडून साफसफाईला सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाऊन दरवाजा बंद दिसल्याने इतर कर्मचाऱ्यांना डॉक्टर नाहीत का अशी विचारणा करत होता. त्यानंतर सेवक संबंधितांना आरोग्य सेविकेकडे जाण्याचा सल्ला देत होता. आरोग्य सेविका त्या रुग्णांना इंजेक्शन, सलाईन लाऊन उपचार करत होत्या. मात्र सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आरोग्य सेविका, औषधे देणारा कर्मचारी आणि सेवकांव्यतिरिक्त अन्य एकही कर्मचारी दवाखान्यात दिसून आला नाही. रुग्ण औषध पुरवठा खिडकी जवळ आला असता आतून तुम्हाला काय त्रास आहे, असे विचारले जात होते. रुग्णाने त्रास सांगितल्यानंतर तेथूनच गोळ्या, औषधे दिली जात होती. काहीवेळा 'समोर म्याडम आहेत तिथे जाऊन इंजेक्शन' घ्या असा सल्ला दिला जात होता.येथील आरोग्य केंद्रात दररोज तीस-चाळीस रुग्णाला तपासले जाते व सोमवारी बाजार असल्याने स्थानिक व बाहेर गावातील रुग्ण मिळून ८० ते ९० रुग्णांची तपासणी केली जाते. या आरोग्य केंद्राअंतर्गत वडगाव नळी, अंतरवली, आंबी या तीन उपकेंद्र व आंबी, आनंदवाडी, दांडेगाव, कृष्णापुर, सावरगाव, वडगाव, घुलेवाडी, नळी, तिंत्रज, अंतरवली, जेजला या अकरा गावांचा समावेश होतो. येथे श्वान दंश, सर्प दंश व इतर सर्व प्रकारच्या लस उपलब्ध आहेत. यावेळेत एक श्वान दंश, एक शुगर तपासणी व इतर सर्दी, खोकला, जुलाब यांसारख्या आजारांचे एकूण ५९ रुग्ण आरोग्य सेविकेने तपासले. 

 

१२ पदे रिक्त, उर्वरित गेले कुठे ? 

आरोग्य केंद्रात एकूण २५ पदे मंजूर असून, त्यापैकी १३ पदे भरली आहेत तर १२ पदे रिक्त आहेत. त्यापैकी वैद्यकीय अधिकारी १,आरोग्य सेविका १, कनिष्ठ आरोग्य सेविका ३, आरोग्य सेवक २, क सहाय्यक १, परिचर १, स्वीपर १ व अंश कालीन परिचर २ अशी १२ पदे रिक्त आहेत. दिव्य मराठी टीमने सोमवारी पाहणी केल्यानंतर आरोग्य केंद्रात मोजकेच कर्मचारी उपलब्ध होते. केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. शिवाय अन्य १२ कर्मचाऱ्यांची पदे भरलेली असताना उर्वरित कर्मचारी कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित होतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर प्रशासनाचे लक्ष नसल्याने सेवेचा खेळखंडोबा आहे. 


कर्मचाऱ्यांनाही नाही वेळेचे गांभीर्य 
आंबी आरोग्य केंद्रात पाणी नसल्याने दोन वर्षांपासून शस्त्रक्रिया वालवड येथे केल्या जातात. कर्मचाऱ्यांनाच पिण्यासाठी पाणी बाहेरून विकत आणावे लागत आहे. तर दर पंधरा दिवसाला एकदा सात हजार लिटरचा पाण्याचा टँकर एका हौदात ओतला जातो व त्यातून पाणी शेंदून कर्मचारी वापर करतात. दरम्यान,वेळ साडेआठची असताना नऊला केंद्र उघडण्यात आले. 


शेळगाव केंद्र २५ गावांचा आधार, डॉक्टरांचाच अभाव 
तालुक्याची सीमारेषा असलेल्या शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर २५ गावांतील रुग्णसेवा अवलंबून आहे. मात्र, एकाच डॉक्टरावर उपचार यंत्रणा आहे. सोमवारी दिवसभर आरोग्य सेविकेने रुग्णांवर उपचार केले. डॉक्टर परीक्षेसाठी गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दवाखान्याची वेळ ८.३० वाजता असतानाही सकाळी १० वाजता दवाखाना उघडण्यात आला. विशेष म्हणजे वेळेचा फलक आरोग्य केंद्रात लावण्यात आला असून, त्यावर उघडण्याची वेळ १० वाजताची लिहिण्यात आली आहे. 

 

शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सकाळी ९.४५ वाजता 'दिव्य मराठी'ची टीम पोहोचली. १० वाजता रुग्णालय उघडण्यात आले. परिसरातील गावात वाहतुकीची सोय नसल्यामुळे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत रुग्णसेवा चालु होती. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ पर्यंत केंद्र चालू होते. वैद्यकीय अधिकारी यांची सोमवारी अधिकृत रजा नव्ह, मात्र ते परीक्षेसाठी गेल्याने पर्याय व्यवस्था म्हणून अनाळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणीसाठी सांगण्यात आले होते.रुग्णालयात श्वानची लस तसेच इतर औषधांचा साठा मुबलक आहे. शुध्द पाण्याची सोय आहे. परंतु स्वच्छतागृहाची दुरावस्था असून एकच स्वच्छतागृह सुरू आहे. महिन्यात १० ते ११ प्रसुती केल्या जातात. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ६ उपकेंद्र असून २५ गावे वाड्या वस्ती आदींचा समावेश आहे. त्यामध्ये चिंचपुर (बु), इनगोंदा, देऊळगाव, चिंचपुर (खु), शेळगाव, मुगाव पांढरेवाडी, ताकमोडवाडी, धोत्री, जगदाळवाडी, पारेवाडी, उंडेगाव, लोणारवाडी, काटेवाडी, काळेवाडी, देवगाव, कोकरवाडी, जेकटेवाडी, शिरगीरवाडी, लंगोटवाडी, भिलारे वस्ती, हिंगणगाव, तांदुळवाडी, वाटेफळ आदी गावातील लोंकाना या आरोग्य केंद्राचा आधार आहे. शेळगावच्या केंद्राचे अधिकारी सोमवारी उपस्थित नसल्याने केबीन रिकामी होती. 

 

रिक्त पदांचे ग्रहण 
प्राथमिक आरोग्य केंद्रात १ वैद्यकिय अधिकारी, १ औषध निर्माण अधिकारी, २ आरोग्य सहायक, १ स्टाप नर्स (कंत्राटी), २ परिचर, १ चालक कार्यरत असून १ वैद्यकिय अधिकारी, १ लिपीक, ३ परिचर, तसेच ६ उपकेंद्रात ४ एमपीडब्ल्यू व १ एएनएम अशी पदे रिक्त आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...