दिव्य मराठी पर्दाफाश : नाशिक-नगरची पाणीचोरी लपवण्यासाठी ३४ वर्षे दाखवले दुप्पट बाष्पीभवन

दिव्य मराठी

Apr 20,2019 09:16:00 AM IST

औरंगाबाद - नाशिक आणि अहमदनगरकडून सुरू असलेली पाणीचोरी लपवण्यासाठी तब्बल ३४ वर्षे सिंचन खात्याकडूनच जायकवाडी धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाची चुकीची आकडेवारी मांडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्यक्षापेक्षा दुप्पट बाष्पीभवन दाखवून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता. पाण्याच्या फेरनियोजनातून या हेराफेरीचा पर्दाफाश झाला आहे, तर फेरनियोजनामुळे आता मराठवाड्यातल्या शहरांमध्येच भांडणे लागण्याचा धोका निर्माण झालाय.


मराठवाड्याची जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडीच्या पाणी वापराचे पहिले फेरनियोजन १९८५ मध्ये झाले. नंतर परिस्थिती व संदर्भ मोठ्या प्रमाणात बदलले. नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा जलसंघर्ष तीव्र झाला. तो सोडवण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) अस्तित्वात आले. पुढे मजनिप्रा अधिनियम २००५ हा कायदा करण्यात आला. तर पाणीवाटपाचे नियमन करणारा मेंढेगिरी समिती आणि चितळे समितीचा अहवाल तयार झाला.

१९८५ मध्ये प्रमाण ६६५ दलघमी एवढे
२०१८ च्या पाणी वापराच्या फेरनियोजनातून मराठवाडा आणि नाशिक-अहमदनगरच्या पाणी संघर्षाचा अधिक भडका उडण्याची शक्यता आहे. या दोन शहरांसाठी पाण्याची पळवापळवी करण्याकरिता िसंचन खात्याने चक्क पाण्याच्या बाष्पीभवनाची खोटी आकडेवारी मांडण्याचे पाप केल्याचे फेरनियोजनात उघड झाले आहे. १९८५ मध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण ६६५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) एवढे होते. २०१८ मध्ये ते ३२३ दलघमी दर्शवण्यात आले आहे. बाष्पीभवन वाढण्याऐवजी ५० टक्क्यांवर आहे. उरलेले पाणी नाशिक-नगरला देण्याचे प्रताप सिंचन खात्याने केले आहेत.

फसलेल्या याेजनेच्या विस्ताराचा घाट
पाण्याच्या फेरनियोजनात उपसा सिंचनासाठी २० टीएमसी पाण्याचा वापर मंजूर केला आहे. यात ब्रह्मगव्हाण १ आणि ताजनापूर-१ व ताजनापूर २ चे आकडे शासनाच्या १९७८ च्या निर्णयानुसार आहेत. नव्या फेरनियोजनात ब्रह्मगव्हाण २ व ब्रह्मगव्हाण ३ साठी जास्तीची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या तरतुदीची गरज नसल्याचे जलतज्ज्ञ माधवराव चितळे समितीने आधीच स्पष्ट केले. या अहवालात ब्रह्मगव्हाण योजनेवर कडक ताशेरे ओढण्यात आले होते.

पाणी वापरातील आकड्यांत मोठी तफावत...

फेरनियोजनात पहिल्यांदाच घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. जल वाटपासाठी मेंढेगिरी समितीचा अहवाल प्रमाण समजला जातो. मात्र, फेरनियोजनात यातील शिफारशींना हरताळ फासण्यात आला आहे. फेरनियोजनात घरगुती पाणी वापर ११८ तर औद्योगिक पाणी वापर ७६ दलघमी दाखवण्यात आला आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालात ही संख्या अनुक्रमे २८३ आणि १६१ दलघमी आहे.

पाच महत्त्वाच्या बाबी अस्पष्ट

३४ वर्षांनंतर करण्यात अालेल्या फेरनियोजनात अनेक महत्त्वाच्या बाबी अस्पष्ट आहेत. जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी त्यापैकी पाच महत्त्वाच्या बाबी मांडल्या.

१. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार वरच्या बाजूला १६१ टीएमसी क्षमतेची धरणे बांधल्याने जायकवाडीच्या वाट्याच्या ९० टीएमसीऐवजी फक्त २८ टीएमसी पाणी मिळत आहे. या मुद्द्याचा फेरनियोजनात उल्लेख नाही.

२. जायकवाडीतील एकूण पाणी साठा १०२ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा ७६ टीएमसी आणि निभावणी १३ टीएमसी याचाही उल्लेख नाही.

३. धरणात साठलेल्या गाळाचे मोजमाप नाही. त्यामुळे
साठवण क्षमता किती कमी झाली, त्याचाही उल्लेख नाही.

४. डीएमआयसी प्रकल्पाच्या पाणी वापराचा कोठेही उल्लेख नाही
५. एकूण पाणी वापराचा उल्लेख नाही.

X