आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेअरिंगवाला वशाटोत्‍सव!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अरे’ ला ‘कारे’ म्हणून नव्हे, तर सौहार्द-संवाद जपू पाहणाऱ्यांची एकी व्हावी या उद्देशाने सोशल मीडियावरचे मित्र एकत्र आले. तुम्ही हेच खाल्ले पाहिजे आणि तेच प्यायले पाहिजे, अशी दमबाजी करणाऱ्यांना सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून संकेत देण्यासाठी “वशाटोत्सव’ भरवण्याची कल्पना मांडली गेली. लोग जुडते गये और कारवाँ बनता गया... जसे तीन वर्षांत समविचारींचा हा वशाटोत्सव बहरत गेला, तसे सत्तेने हुकुमी अस्त्र बाहेर काढले. बदनामीच्या हिशेबाने वशाटोत्सव थेट विधानसभेत पोहोचला. सत्तेचे हेतू साफ उघड झाले...

 

सत्ताधाऱ्यांनी फकिरीचा कितीही आव आणला, नि:संगतेची कितीही ग्वाही दिली, तरीही जगातला सगळ्यात असुरक्षित घटक कोण, तर सत्ताधारी. पक्ष कोणताही असो, त्याचा नेता कोणाही असो. "पॉवर लीड्स टु इनसिक्युरिटी, अॅबसोल्युट पॉवर लीड्स टु अॅबसोल्युट इनसिक्युरिटी'अशी ही तऱ्हा. हीच असुरक्षितता सत्ताधाऱ्यांच्या मनात  संशयाचे भूत  निर्माण करते. त्यातून वैचारिक विरोधकांवर डोळ्यांत तेल घालून पाळत ठेवली जाते. संधी साधून चाबूक उठत राहतात. कोणी विरोधी सूर लावला की "देशद्रोही', "दहशतवादी', "नक्षलवादी'असे ठपाठप ठप्पे मारले जातात. सत्ता समर्थकांना हे संकेत पुरेसे असतात. ते आदेशानुसार एखाद्याविरोधात बोंब ठोकतात. हा एखादा बव्हंशी तर्काची भाषा बोलणारा असतो. सौहार्द आणि सुसंवादाचा आग्रह धरणारा असतो. पण सत्तेला तर्क मंजूर नसतो. सौहार्द-संवादाचा माहोल पसंत नसतो. कारण, यातून सत्ताधाऱ्यांच्या अधिकारशाहीला, दडपशाहीला थेट आव्हान मिळतं. ते मिळणार या भयाने सत्ताधारी आक्रमक होतात. तुम्ही हेच खाल्लं पाहिजे, तेच प्यायलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे आणि तसंच लिहिलं पाहिजे, म्हणत दंडुके उगारतात. स्वत:  दडपशाहीचं राजकारण करून सौहार्दवालेच राजकारण करत आहेत, असा कांगावा करत राहतात.


२०१६ च्या सुरुवातीला नववर्ष साजरं करण्याच्या वादातून सोशल मीडियावर काहीएक पोस्ट पडली होती. तिथं वादावादी चालू असताना मित्र मोहसीन शेखचा धर्म काढून त्याला शिवीगाळ झाली.  मग इतर दोस्तांनी मोहसीनची बाजू घेत त्याला आधार देण्याचं काम केलं. मोहसीनने त्यानंतर पोस्ट टाकली, की चला आता भेटू प्रत्यक्षात. त्या भेटीसाठी बोकडाचा बेत करू! त्या कार्यक्रमाचं पुढे ‘वशाटोत्सव' असं नामकरण झालं. शाकाहारी लोकांची पंचाईत होऊ नये म्हणून शाकाहारी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली. पुण्याजवळच्या चिंबळी भागात मित्रवर्य शंकर बहिरट यांच्या मळ्यात हा कार्यक्रम आयोजित केला गेला. दिवसभर मित्र आले. संध्याकाळी जेवणावळ पार पडली. प्रत्यक्ष गाठीभेटी झाल्या. फोटोसेशन झालं, आनंदानं जेवणखाणं झालं. हे इथं सगळं मित्र म्हणून वावरले. ना कोणी कुठल्या पक्षाचा, ना जातीधर्माचा. हा कार्यक्रम मोहसीन, सचिन कुंभार, शंकर बहिरट आणि इतर नियोजन मंडळातील लोकांनी आयोजित केला होता. हा वशाटोत्सव आयोजित करणारी पोरं कुण्या आमदार- खासदार- मंत्र्याच्या घरातली नव्हती. सामान्य शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक घरातल्या लोकांनी पुढं येऊन हे एक व्यासपीठ तयार केलं. एकमेकांच्या अडीअडचणीला पुढं येणं, आनंदात सहभागी होणं, मैत्र टिकवणं, जपणं एवढाच हेतू बाळगला. या वशाटोत्सवानं समविचारी माणसं जोडली गेली.

 

एवढ्याच उत्साहानं दुसरा वशाटोत्सवही १२ नोव्हेंबर २०१७ रोजी किरकटवाडी भागात दणक्यात पार पडला. फेसबुकवरच्या भेटी प्रत्यक्षात होण्यात आनंद असतोच. यावेळी संख्या वाढून दुप्पट झाली. काही कुठली राजकीय किंवा धार्मिक पार्श्वभूमी नाही किंवा जातीयही नाही. मित्रमैत्रिणी एकत्र आले. गप्पाटप्पा झाल्या, वशाटाचा आनंद घेतला आणि मार्गस्थ झाले.
हे असं सगळं मजेशीर चालू होतं, दोन वर्षे. मात्र, गेल्या जुलै महिन्यात विधान परिषदेत हा ‘वशाटोत्सव’ पोहोचला, तो भाजपचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांच्या कृपेने.  धस हे भाजपतर्फे याच वर्षी निवडून गेलेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण माहिती घेऊन एखादा विषय मांडणं जरुरी असतं. मात्र सध्या ‘६०० कोटी’ लोकसंख्येच्या देशात तसं काही वातावरण नाही, त्यामुळे त्यांच्याकडून तशी अपेक्षा कुणी का ठेवावी?
 तर आमदार सुरेश धस यांनी थेट वशाटोत्सवावर आरोप केला की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पक्षासाठी गैरमार्गाने फेक अकाउंट चालवणाऱ्या लोकांसाठी जेवणावळीचं आयोजन करतो आहे. सबब अशा फेक अकाउंट चालवणाऱ्यांवर ‘मोक्का’ लावा. कुठून माहिती मिळाली आणि कुठनं एवढा कॉन्फिडन्स आला, त्यांनाच माहीत ! सरळ ‘मोक्का’च लावा म्हणून मागणी केली.

 

सुरेश धस यांच्यावर टीका होऊ लागली. तेवढ्यात वशाटोत्सव टीमने काही वेळातच पुढच्या उत्सवाचं जाहीर आवतण दिलं. मुळात, हा काही राजकीय उत्सव नव्हताच, मात्र सुरेश धस यांनी त्याला तसं वळण दिलं. त्यातूनच सत्ता समर्थकांच्या विखारी नि विद्वेषी राजकारणाला ‘काउंटर नरेटिव्ह’ मिळण्याची दिशा तयार होत गेली. वशाटोत्सवासाठी बोकड देणारे लोक पुढे येऊ लागले, मदतीसाठी अनेक मित्र पुढे आले.


हा वशाटोत्सव गाजणारच होता. तारीखही जाहीर झाली. त्याच दरम्यान राज्यभरात मराठा , धनगर आरक्षणासाठी आंदोलन चालू झालं. आत्महत्यांचे प्रसंग घडले. या संवेदनशील वातावरणात आपण मटनावर ताव मारणं शोभणारं नव्हतं. यासाठी नियोजन मंडळानं वशाट रद्द केलं आणि पिठलं-भाकर असा बेत पक्का केला.


राजकीय नसणाऱ्या या कार्यक्रमाला सुरेश धस यांनी त्यातला सौहार्द आणि संवादाचा धागा समजून न घेता राजकीय रंग दिल्याने त्यांना त्याच अंगाने उत्तर देणं अपेक्षित होतं. यासाठी परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना पूर्वकल्पना देऊन निमंत्रित केलं गेलं. जेवणाचा मेनू बदलला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींना निमंत्रित केलं. याचा कुठलाही विपरीत परिणाम या ‘वशाटोत्सवा’वर न होता, गेल्या दोन वर्षापेक्षा सर्वात जास्त या कार्यक्रमाला गर्दी झाली. प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाअगोदर तरुण-तरुणींनी आपली मतं, कविता सादर केल्या होत्या.
हे सगळं पार पडल्यानंतर कार्यक्रमाचा आयोजक मोहसिन शेखला जेवणातील मेनूचा बदल आणि राजकीय नेत्यांना दिलेलं निमंत्रण या मुद्द्यांवरून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. तो यावर म्हणतो की, “आम्ही राजकीय व्यक्तींना अस्पृश्य मानत नाही. आमचा ‘पॉझिटिव्ह पॉलिटिक्स’वर विश्वास आहे. समविचारी लोकांच्या चळवळीतून आम्ही आजवर विविध उपक्रम राबवले, ते फक्त सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता ग्राउंडवरही राबवण्यावर आमचा भर राहील. आजचे विरोधक उद्याचे सत्ताधारी असतील, त्या वेळीही आमचा आवाज कायम राहील.’ टीका करणारे स्वतःच्या घराबाहेरही पडणारे नसतात, त्यापेक्षा शंभर लोकांपासून सुरू होऊन, हजारापर्यंत जाणारी संख्या हीच खरी ऊर्जा असल्याचं मोहसिनने सांगितलं. हा वशाटोत्सव आमदार धस यांना प्रत्युत्तर देणे एवढ्यापुरता मर्यादित न राहता बहुजन समाज घटकांची समाजभान जपणारी चळवळ उभारण्याकरिता प्रयत्नशील असल्याचंही त्यानं स्पष्ट केलं.  या कार्यक्रमासाठी  मुंबईहून सुषमा झोरे आली होती, तर सलग तीन वर्षे सतीश पवार हा सोलापूरहून येतो आहे. सुषमा म्हणाली, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी आणि तिथं होणारी चर्चा ही माझ्यासाठी महत्त्वाची आणि ऊर्जा देणारी असल्याने मी  मुलांना सोबत घेऊन खास वेळ काढून आले होते.

 

काहीही कारणं नसताना देशद्रोही-दहशतवादी अशी लेबलं लावून दिल्लीत विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणांना जेलचं, पोलिस स्टेशनांचं पर्यटन घडवून आणण्यात आलंचं होतं. इथंही ‘मोक्का’चा शिक्का बसायला वेळ लागला नसता. मात्र समाज जागरूक असतो, तो सत्ताधाऱ्यांविरोधात एकवटून प्रामाणिक लोकांच्या नेहमीच पाठीशी राहतो. हे या निमित्ताने लोकांना दाखवून दिलं.  सध्या टोकाच्या राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण असताना मतमतांतरं विसरून समूहाने एकत्र येण, ही बाब दुर्मिळ होताना, असे कार्यक्रम सुखावह ठरतात. तिथंही तुम्ही खोडा घालणारे होणार, निष्पाप लोकांना पक्षाचं लेबल लावणार, थेट मोक्का लावण्याची मागणी करणार, तर मग कार्यक्रम साहजिकच राजकीय होणार!

 

खुनशी सरकार

वशाटोत्सवात जमलेल्यांना मार्गदर्शन करत असताना निखिल वागळे म्हणाले, सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असून, गेल्या अनेक वर्षांत अनेक सरकारे बघितली, मात्र या सरकारइतकं खुनशी सरकार कोणतंही नाही.  त्यांनी याप्रसंगी असंही आवाहन केलं की, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात, देशात पसरलेल्या विद्वेषी वातावरणाविरोधात तरुणाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या संसदीय परिघात सोशल मीडियावर व्यक्त झालं पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनी आपल्या भाषणात सांगितलं की, तरुणाईकडे ऊर्जा असते. आक्रमकता असते. तिथंच सरकार हल्ला करतं, नोटिसा पाठवतं. तशा जर कुणाला नोटिसा आल्या, तर त्याची एक प्रत मला पाठवा, मी तुमच्या पाठीशी नेहमीच उभा असेन...

 

shreniknaradesn41@gmail.com

बातम्या आणखी आहेत...