आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाई माझा कोंबडा...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रेणिक नरदे

शेतकऱ्यांना कोणते ना कोणते आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार नवे नाहीत. कंपन्या शेतकऱ्यांना मोठमोठी आमिषे दाखवितात. अगोदर करार करतात आणि नंतर कंपन्या पोबारा करतात. नंतर अशा कंपन्यांवर कधी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. लाघवी बोलणे आणि "कडक' मार्केटिंगच्या जोरावर अशा कित्येक योजना आपल्याकडे आल्या आणि फसल्या. मागणीपेक्षा अमाप उत्पादन असणारी साखळी योजना जेव्हा वाढत जाते तेव्हा तिचा बोऱ्या वाजतो. "कडकनाथ'चेही नेमके हेच झाले...
बाजारातील अनिश्चितता, सरकारी कृपेने आलेली बंधने, निसर्गाची अवकृपा अशा नानाविध कारणांनी शेतकऱ्याचे परिवर्तन जुगाऱ्यात झाले. आजच्या काळात शेती ह्या एकमेव धंद्यावर उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे.  यातून शेतकरी जोडधंदा शोधत असतो. मग ते कोंबडीपालन, वराहपालन, पशुपालन असे काही प्रकार महाराष्ट्रच नव्हे तर देशभर सुरू असल्याचे आपण बघत आहोत. "यशोगाथा' नावाच्या सदरामधून वृत्तपत्रं, इलेक्ट्रानिक माध्यमं आणि आता सर्वांच्या हातात असलेली समाजमाध्यमं यातून दर दिवसाला अनेक डोळे दिपवणाऱ्या कथांचा सुळसुळाट आपल्यापर्यंत येऊन धडकत असतो. कधी इंजिनिअरने परकीय देशातली गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतीतून काही लाखांचं उत्पन्न मिळवलेलं असतं, तर कधी एखाद्या सामान्य शेतकऱ्याने काही गुंठ्यांतून लाखो रुपये फक्त कलिंगड लावून कमवलेले असतात. अशा स्वरूपांच्या यशोगाथा रोज बघायला, वाचायला मिळतात. १९८०-९० च्या दरम्यान जन्मलेले आणि आता शेतीत असलेल्या शेतकऱ्यांकडे व्हॉट्सअॅप, यूट्यूब आदी माध्यमातून या बातम्या पोहोचत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे कुणालाही कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याचा मोह होतोच. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि छत्तीसगडमधील बसरत (दोन्ही राज्यांनी "कडकनाथ' मूळचा आपलाच असल्याचा दावा केला असून याप्रकरणी वाद सुरू आहेत.) या दोन भागात एका कोंबडीची प्रजाती आढळते आणि तिचं नाव सबंध भारतात वाऱ्यासारखं पोहोचतं ते म्हणजे कडकनाथ कोंबडी! या कोंबडीच्या प्रजातीबद्दल मिळालेली माहिती अशी...कोंबड्याचं वजन हे दीड ते दोन किलो भरतं तर कोंबडीचं वजन एक किलो ते दीड किलो इतकं असतं. याचं मांस साधारण काळं किंवा करड्या रंगाचं असतं. रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना तसेच प्रसूती झालेल्या महिलेसाठी हे मांस फायदेशीर असल्याचं काही जण सांगतात. पण या माहितीत काहीही तथ्य नाही... आपली खुराड्यातली देशी कोंबडी आणि कडकनाथ कोंबडीच्या मांसात रंगाव्यतिरिक्त कसलाही फरक नसल्याचं तज्ञांनी सांगितलं आहे. देशी फळे, देशी कंदमुळे, देशी जवार, देशी रताळं, देशी गाजर, देशी घेवडा, देशी गाय, देशी गायीचं गोमूत्र हे आरोग्यदायी असल्याचं सांगण्याचा हा जमाना आहे. कोणतंही तथ्य न तपासता झटपट नैसर्गिक, सेंद्रिय आणि देशी अशी बिरुदं मिरवणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यात ग्राहकालाही एक प्रकारचे समाधान मिळतं. कडकनाथ कोंबडीबद्दलही काहीसं असंच झालं. कडकनाथचं मांस पौष्टिक, आरोग्यदायी असा प्रवाह बाजारात समाजमाध्यमांच्या साहाय्याने रुजवण्यात आला. तितक्यातच कडकनाथाच्या यशोगाथांच्या मालिकाही पाठोपाठ येऊ लागल्या. महाराष्ट्रभरात कडकनाथ चिकन मिळणाऱ्या हॉटेल्सबाहेर बोर्ड दिसायला लागले. त्यासोबतच या काळ्या रंगाच्या कोंबड्याच्या मांसाच्या आणि अंड्याच्या औषधी गुणधर्माचे दावेही चर्चिले जाऊ लागले. साहजिकच हे बघण्यात आल्यानंतर शेतकरी तिकडे वळला नाही तर आश्चर्यच... याच संधीचा फायदा घेऊन “महारयत’ ही कंपनी बाजारात आली. यामध्ये शेतकऱ्यांना दीडेक लाखांची गुंतवणूक करावी लागत असे. या दीड लाखांच्या बदल्यात २०० पक्षी, त्यासाठी लागणारे खाद्य, औषधं, लस आणि भांडी कंपनीतर्फे पुरवली जातात. त्यानंतर तीन महिन्यांनी १०० नर आणि २० मादी ठेवून ८० पक्षी परत नेत असे. आता या पक्ष्यांना अंडी देण्यासाठी जो कालावधी लागतो तो ४ ते ५ महिन्यांचा असतो. या कालावधीनंतर अंडी खरेदी करण्याची जी या कंपनीची योजना होती ती बोगस होती. हे गुंतवणूकदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या ध्यानात आलं नाही, हेच मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. 
मागच्या दोन-अडीच वर्षांत या कंपनीनं बहुतांशी सांगली, कोल्हापूर, साताऱ्याच्या हजारो शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात पैसे गुंतवायला लावले. केलेल्या गुंतवणुकीवर जवळपास ३०० टक्के फायद्याचं अामिष दाखवलं. यातून शेतकऱ्याला एका वर्षात २,३०००० रुपयांचा निव्वळ नफा होईल असं आमिष दाखवण्यात कंपनी यशस्वी झाली आणि व्यावहारिक गणित नसणारे किंवा तर्कही नसणारे जवळपास ८ हजार शेतकरी या योजनेला बळी पडले. साठ रुपयांपर्यंत अंडं जातंय, पाचशेपेक्षा जास्तीला कोंबडी जाते असं सांगितल्यावर लोकांनी आणखी पैसे घातले. 
जाहिरात होत होती. गावातल्या गावात लोक एकमेकांचं बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते. कर्ज काढून, नातेवाइकांकडे पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं या साखळीत उतरत होते. या सर्वांना मिळून ५०० कोटींचा चुना लागला. शेतकऱ्यांची फसवणूक झाली. या महिन्यात पेमेंट देऊ, पुढच्या महिन्यात पेमेंट देऊ असं म्हणत कंपनी शेतकऱ्यांना टोलवायला लागली.  सुरुवातीला कोंबड्यांचं खाद्य मिळालं. नंतर ते थांबलं तेव्हा अनेकांनी पदरमोड करून कोंबड्यांना जगवलं. पण कोंबड्याच इतक्या होत्या की ते फार काळ खर्च करू शकले नाहीत. काही कोंबड्या मेल्या, काही मिळेल त्या भावाला विकल्या. गेल्या वर्षी त्या वेळचे मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा सुरू होती. शेतकऱ्यांनी त्या यात्रेच्या विकास रथाच्या आडवे येत त्यावर कोंबड्या भिरकावल्या. परंतु त्यांनी ढुंकूनही या शेतकऱ्यांकडे बघितलं तर नाहीच, उलट कडकनाथवाल्या शेतकऱ्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रसादच मिळाला. कडकनाथ कोंबडी घोट्याळ्यात पश्चिम महाराष्ट्रातली गावंच्या गावं अडकली आहेत. लोकांच्या आयुष्याची कमाई गेली आहे, भविष्याची तरतूद गेली आहे. आज हा घोटाळा उघडकीस येऊन सहा-सात महिने होत आले. याचदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मसूद माले गावातील प्रमोद जमदाडे या युवा शेतकऱ्याने सुमारे पाच लाखांचं कर्ज काढून कडकनाथ कुक्कुटपालन केलं होतं. या कंपनीचा घोटाळा उघडकीला आला आणि आपण फसलो गेले असल्याची जाणीव प्रमोद यांना झाली आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे या युवकाने विषप्राशन करून जीवन संपवलं. खरं तर या कंपनीची ही योजना बोगस असल्याचं ध्यानात येण्यासाठी कुठल्याही अर्थशास्त्राच्या पदवीचीसुद्धा गरज नाही. या कंपनीने अंडी खरेदीची जी योजना सांगितली ती जरी पाहिली तरी हा प्रकार बोगस असल्याचं साधं व्यवहारज्ञान असलेली व्यक्ती ओळखू शकते. सततची नापिकी, पिकलं तरी विकलं जात नाही, विकलं तरीही नफा नाही या सर्वांतून आलेल्या आर्थिक समस्या आणि म्हणून आलेलं नैराश्य यातून शेतकरीच नाही तर इतरही क्षेत्रातले सर्व झटपट श्रीमंतीची वाट चोखाळत असतात. अशा वेळी जाळी लावून बसलेले बदमाश शिकारी बरोबर अशा सावजांना जाळीत पकडतात. काहींनी दीड लाख तर काहींनी पाच लाख तर काहींनी सात लाख इतक्या भल्या थोरल्या रकमा या कंपनीच्या हवाली केल्यानंतर आता कंपनी हात वर करून रिकामी झाली. गत सरकारात कंपनीची कोणतीही चौकशी झाली नव्हती. आताही ती होईल की नाही हे सांगणंही तसंच कठीण.  आता हा कडकनाथ व्यवसाय पंजाब आणि अन्य प्रांतात सुरू आहे. त्यातील काही लोकांशी बोलणं झालं तर त्यातील पोल्ट्रीवाल्यांनी सांगितलं की अंड्यांची खरेदी ही दहा रुपयांपासून जास्तीत जास्त पंधरा रुपयापर्यंत होते आणि जादाचं आमिष न बाळगता छोट्या प्रमाणात ही खरेदी-विक्री सुरू आहे. कडकनाथ कोंबडीचा ग्राहकवर्ग म्हणावा तितका नाही.  बाजारात त्याची मागणी असली तरी ती कमी आहे. मात्र त्याचा ग्राहकवर्ग जास्त आहे, तसेच या पक्ष्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये चढ्या भावाने मागणी असते या निव्वळ अफवा असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुळात कडकनाथ कोंबडीला खवय्यांची फारशी मागणी नव्हतीच. खुल्या बाजारपेठेत मटण ५०० रुपये, कोंबडी १५० रुपये किलोने मिळत असताना सामान्य ग्राहक कडकनाथचे अधिक दराने मिळणारे मांस आणि अंडी कशासाठी खरेदी करेल? चेनचा फुगा फुटतोच. चेनची एक ग्लोबल किंवा डोमेस्टिक सिस्टिम असते, त्याच्या वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडीज आहेत, क्रिमिनल माइंड्स, स्मार्ट लोक बरोबर याच्यामध्ये वेळोवेळी ट्रेंड ओळखत असतात. कधी ससे, कधी कोंबडी, कधी इमू. यांना फॉरमॅट्स हवे असतात फक्त. ते लोक बरोबर या फॉरमॅटमध्ये एंट्री करतात आणि चेन सिस्टीम जेव्हा तळाला जाते तेव्हा ती सर्वस्वी फेल जाते. तेच कडकनाथमध्ये झालं. ही चेन सिस्टिम फेल जाणार का होती, तर त्याला जो मूलभूत आधार लागतो डिमांडचा, संघटित बाजाराचा, शास्त्रशुद्ध पोल्ट्रीचा, तो नव्हता. आता हे सर्व प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत असून निकाल येईल तेव्हा येईल, मात्र तूर्त हे शेतकरी फसवले गेलेत इतकेच खरे आणि त्यांनी न खचता हे धीराने घ्यावं, अशी मनोकामना करण्यापलीकडे कुणाच्या हाती काय आहे?

संपर्क - ९९७५७२८६७१

बातम्या आणखी आहेत...