spiritual / श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास २२ सप्टेंबरपासून प्रारंभ 

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी संस्थानातील देवीची मोहक मूर्ती.  तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी संस्थानातील देवीची मोहक मूर्ती. 

मंचकी निद्रेने उत्सवाला प्रारंभ, २९ ला घटस्थापना 

प्रतिनिधी

Aug 22,2019 07:46:20 AM IST

तुळजापूर : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दि.२९ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी व इतर प्रथा परंपरांची माहिती जाहीर झाली आहे. यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवावर दुष्काळ आणि महापूर असे दुहेरी सावट राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेपासून प्रारंभ होणार आहे. नवरात्र महोत्सवाची सांगता दि. १४ ऑक्टोबर,अश्विन पौर्णिमेला अन्नदान महाप्रसादाने होणार आहे. दरम्यान या वर्षीच्या नवरात्र महोत्सवावर दुष्काळ आणि महापुराचे सावट असणार आहे.

शारदीय नवरात्र महोत्सव २०१९ चे विधी
रविवार, दि. २२ सप्टेंबर सायंकाळी तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा. रविवार, दि. २९ सप्टेंबर पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी १२ वाजता घटस्थापना, रात्री छबिना. सोमवारी, दि.३० सप्टेंबर, नित्योपचार पूजा, रात्री छबिना
मंगळवारी १ ऑक्टोबर नित्योपचार पूजा, रात्री छबिना. बुधवार २ ऑक्टोबर, ललित पंचमी, रथ अलंकार महापूजा, रात्री छबिना. गुरुवार ३ ऑक्टोबरला मुरली अलंकार महापूजा, रात्री छबिना. ४ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापुजा, रात्री छबिना. शनिवारी, दि. ५ ऑक्टोबर भवानी तलवार अलंकार महापुजा, रात्री छबिना. रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी, महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा, रात्री छबिना. सोमवार दि.७ ऑक्टोबर राेजी महानवमी, दुपारी १२ वाजता होमावर अजाबलीचा धार्मिक विधी, घटोत्थापन, रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक. मंगळवार ८ ऑक्टोबर, विजया दशमी दसरा, उषःकाली सीमोल्लंघन, मंचकी निद्रा. तर दि.१३ ऑक्टोबरच्या पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना, रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना, जोगवा. दि. १४ ऑक्टोबर नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद, रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना निघणार आहे.

दुष्काळ व महापुराचे सावट
यावर्षी मराठवाड्यात पुन्हा एकदा भीषण दुष्काळी परिस्थिती तर उर्वरित महाराष्ट्रात महापुराचा कहर आहे. यामुळे या वर्षीच्या नवरात्र महोत्सवावर महापूर आणि दुष्काळ अशा दुहेरी सावट असणार आहे. देशाच्या अनेक भागात अतिवृष्टी महापुराने हाहाकार माजला आहे. दुष्काळ आणि महापुराचा फटका नवरात्र महोत्सवाला बसणार असल्याने याचा परिणाम भाविकांच्या संख्येवर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नवरात्र महोत्सव ३ टप्प्यांत
तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव मंचकी निद्रा, नवरात्र आणि अश्विन पाैर्णिमा अशा ३ टप्प्यांत साजरा करण्यात येतो. पहिल्या टप्प्यात नवरात्रापूर्वी तुळजाभवानी माता ८ दिवस मंचकी निद्रेसाठी पलंगावर विसावते. दुसऱ्या टप्प्यात ९ दिवस नवरात्र - यामध्ये घटस्थापना, तुळजाभवानी मातेचा अलंकार महापूजा, होम कुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी आणि सीमोल्लंघन तर तिसऱ्या टप्प्यात अश्विन पाैर्णिमा पार पडते.

X
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी संस्थानातील देवीची मोहक मूर्ती. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी संस्थानातील देवीची मोहक मूर्ती. 
COMMENT