आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्या प्रकरण : श्रीकांत पांगारकर सलग दहा वर्षे होता शिवसेनेचा नगरसेवक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात जालना शहरातील शहरातील शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत जगन्नाथ पांगारकर यास दहशतवाद विरोधी पथकातील पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले आहे. २००१ ते २०१० असे सलग दहा वर्षे तो शिवसेनेचा नगरसेवक होता. शिवाय त्याने स्वस्त धान्याचे दुकानही चालवले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तो औरंगाबाद शहरातील सिडको भागात राहत असल्याने तो जालन्यात कधी तरीच येत होता.  


श्रीकांत पांगारकर हा २००१ ते २००५ या कालावधीत शिवसेनेच्या उमेदवारीवर गणपती गल्ली, भाग्यनगर या भागातून निवडून आला होता. यानंतर २००५ ते २०१० मध्ये पुन्हा शिवसेनेच्याच उमेदवारीवरच तो शिवनगर भागातून नगरसेवक झाला होता. दरम्यान, २०११ मध्ये त्याला शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने तो पक्षातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम सुरू केले. शहरातील अंबड चौफुली भागातील महसूल कॉलनीमध्ये त्याचे घर अाहे. तो नगरसेवक असतानाच स्वस्त धान्य दुकानही चालवत होता. त्याशिवाय हॉटेल व्यवसायातही त्याने स्थिरावण्याचा प्रयत्न केला. 


दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून पत्नी, आई व मुलांसह त्याने जालना सोडून औरंगाबाद येथे स्थायिक होणे पसंत केले. याच काळात त्याचे डॉ. दाभाेलकर हत्या प्रकरणात संशयित म्हणून नाव पुढे आल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी रात्री त्यास ताब्यात घेण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाशी त्याचा नेमका काय संबंध आहे, याचीही  चौकशी केली जात आहे. तथापि, त्याच्या घरात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे.  


घराची कसून झाडाझडती
दहशतवाद विरोधी पथकाने श्रीकांत पांगारकर यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराचीही कसून झडती घेतली. या झडतीत नेमके काय सापडले, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पांगरकर याचे घर  गेल्या पंधरा दिवसांपासून बंदच हाेते, अशी माहितीही स्थानिक नागरिकांनी दिली आहे. 


जळालेली दुचाकी 
जालना शहरातील महसूल कॉलनी भागातील श्रीकांत पांगारकर याच्या घराच्या भिंतीला लागून एक अर्धवट जळालेली दुचाकी उभी आहे. मोपेड प्रकारातील ही दुचाकी असून तिला नंबर प्लेटही नाही. एटीएस पोलिसांनी या दुचाकीचे फोटोही घेतले आहेत. ही दुचाकी कशी जळाली याचाही तपास पोलिस घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...