आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅलो, इन्स्पेक्टर! : गाद्या जळाल्या, धूर झाला...नीलिमांचा जीव कशाने गेला?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकांत सराफ

पहाटे पाचची वेळ. अनेक जण मॉर्निंग वॉकची तयारी करत होते, तर काही जण त्याआधीच उद्यानात, रस्त्यांवर दाखलही झाले होते. अर्धवट झालेली झोप आवरत काही जण बळजबरीचा व्यायाम करत होते. त्याच वेळी पोलिसांची मोबाइल गस्त व्हॅन ठाण्याकडे परत निघाली होती. ती ठाण्याच्या आवारात शिरत असतानाच ग्रीनलँड अपार्टमेंटमध्ये काहीतरी गडबड झाल्याचा निरोप वायरलेसवर मिळाला. इन्स्पेक्टर काळेंनी ड्रायव्हरला व्हॅन तशीच वळवण्यास सांगितले...

बघ्यांची गर्दी हटवून काळे अपार्टमेंटच्या आवारात दाखल झाले, तर पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धूर येत होता. धुराचे लोट जिन्यावरूनही वाहत होते. त्यामुळे कोणाला तिथं जाणं शक्य नव्हतं. सोसायटीचे सचिव मनीष धारकंडकर अग्निशमन दलाला कॉल करत होते. काळेंनी मग स्वतःच अग्निशमनच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यांचे बोलणे होईपर्यंत आगीचा बंब आला होता. जवानांनी शिड्या लावून पाण्याचा मारा केला. धूर थांबला. मग काळे आणि त्यांचे सहकारी झटपट पायऱ्या चढून फ्लॅटमध्ये शिरले. दरवाजाला धक्का दिला. तेव्हा त्या मागे अडसर म्हणून अडकवलेल्या, एकाला एक जोडलेल्या दोन गाद्या खाली पडल्या. त्यात तिन्ही गाद्यांतून धूर येतच होता. शिवाय, गॅलरीत ठेवलेली एक गादी, दोन उशाही धुराने वेढलेल्या होत्या. त्या पलीकडे काळेंनी नजर टाकली आणि ते चकितच झाले. आणखी  एका जळालेल्या गादीवर एक महिला पडलेली होती. त्यांनी तपासलं तर तिचा प्राण निघून गेला होता. ग्रीनलँड अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकट्याच राहणाऱ्या, अंदाजे पन्नास वर्षे वय असलेल्या एलआयसी कर्मचारी नीलिमा यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे, असं काळेंनी वरिष्ठांना कळवलं. चोरीचा इरादा असावा. किमान दोन चोरटे असावेत. महिलेने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिला गळा आवळून मारले आणि नंतर आगीत जळाल्याचे भासावे म्हणून गादी पेटवली असावी, असा अंदाजही व्यक्त केला. मग अँब्युलन्स बोलावून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रवाना केला. 
अपार्टमेंटचा चौकीदार, सचिव आणि अध्यक्षांकडे त्यांनी नीलिमांविषयी चौकशी केली. त्या साधारणतः सहा वर्षांपूर्वी येथे राहण्यास आल्या होत्या. त्यांचे पती केनियामध्ये असतात. ते कधीच इथे आल्याचे दिसले नाही. त्यांच्या सावत्र बहिणीचा तरुण मुलगा कधीतरी येताना दिसत असे. क्वचित ऑफिसचे कर्मचारी, मैत्रिणी येत, पण तेही तासाभराच्या पलीकडे थांबत नव्हत्या. नीलिमा कधीच सोसायटीच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नसत. 

संध्याकाळी ऑफिसमधून आल्या की त्या स्वतःला टीव्हीसमोर बांधून घेत. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत किंवा एकटीच पत्ते खेळत. कधीतरी बाहेरून जेवण मागवत, अशी माहिती समोर आली. नीलिमा यांचे कोणाशी सख्य नसले, तरी भांडणही नव्हते. काळेंनी अपार्टमेंटच्या चौकीदाराला पट्ट्यावर घेण्याचा प्रयत्न केला, पण तो सत्तरीत पोहोचलेला म्हातारा. त्याची नात बाळंतपणासाठी आली होती. तिच्या देखभालीत रात्री गुंतला होता. त्यामुळं अपार्टमेंटमध्ये कोण आलं, हे त्यानं पाहिलंच नव्हतं. पण, हा फ्लॅट एका बिल्डराला पाहिजे होता. त्यासाठी तो नीलिमांकडे तगादा लावत होता. अध्यक्ष, सचिव आणि अपार्टमेंटमधल्या काही बायका नीलिमा मॅडमवर नाराजच होत्या. समोरचा किराणा दुकानदारही फ्लॅटवर डोळा ठेवून आहे, असं चौकीदारानं हलक्या आवाजात सांगितलं. काळे पुन्हा फ्लॅटमध्ये शिरले. तोपर्यंत फिंगर प्रिंट एक्स्पर्ट आले होते. श्वानपथकही दाखल झालं होतं. सामानाची उचकापाचक झाली होती. त्यात पत्त्यांचा कॅट विखुरला होता. पण, सोन्याचे दागिने, रोख रक्कम सगळंच जागच्या जागी होतं. म्हणजे ही चोरी नव्हती. मग नेमकं काय होतंॽ नीलिमांचा जीव कोणी घेतला होताॽ गादी का जळाली होतीॽ (वाचा पुढील भागात)

स्वरूपकुमारांवरील हल्ल्यामागची ‘रिंग’
आयसीयू वॉर्डातील बेडवर पडलेल्या स्वरूपकुमारांनी त्या संध्याकाळचा सगळा घटनाक्रम डोळ्यासमोर तपशिलाने आणला. एका क्षणाला ते चमकले आणि रुममधील कपाटात अडकवून ठेवलेली त्या दिवशीची पँट त्यांनी तपासून पाहिली. पँटच्या खिशात सोन्याची एक अत्यंत बारीक रिंग अडकली होती. त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी तातडीने तिसऱ्या सूनबाईला म्हणजे मंजूला बोलावून घेतले. रिंग दाखवताच ती घडाघडा बोलू लागली. नवऱ्याला नव्या शोरुमसाठी सासऱ्याकडून एक कोटी रुपये मिळत नाहीत, हे लक्षात आल्यावर तिने संतापाच्या भरात वाकडा मार्ग निवडला. गुंडाला एक लाख रुपये दिले. पण, त्याचा फटका स्वरूपकुमारांनी चुकवला. ते त्याच्या अंगावर चालून जात असताना मंजूनेच त्यांना मागे ओढले. झटापटीत तिच्या कानाची रिंग स्वरूपकुमारांच्या पँटला अडकली होती. रुग्णालयात अर्धवट शुद्धीत आल्यावर त्यांनी काय टोचतंय, असं म्हणत खिसा झटकला. तेव्हा ती रिंग खिशात गेली होती. सासऱ्यानेच गुन्हेगार शोधलाय, हे लक्षात आल्यावर मंजू माफी मागू लागली. खरे तर स्वरूपकुमारांना जबाब बदलण्याची इच्छा होती, पण त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायचे ठरवले.