आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी-भाजपची युती; नगरमध्ये महापौर भाजपचा, सर्वाधिक जागा जिंकूनही सेना विरोधात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी झालेली महापौरपदाची निवड नाट्यमय घडामोडींनी गाजली. ६८ सदस्यांच्या सभागृहात २४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापौर, उपमहापौरपद मिळवले. महापौरपदी बाबासाहेब वाकळे, तर उपमहापौरपदी मालन ढोणे यांची बहुमताने निवड झाली. त्रिशंकू महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादीची ही सलगी म्हणजे नवे सत्ता समीकरण ठरले. शिवाय, महापालिका स्थापनेपासून प्रथमच भाजपला महापौरपद मिळाले.


शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. भाजपकडे अवघे १४ संख्याबळ असताना राष्ट्रवादी व बहुजन समाज पक्षाने भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे वाकळे यांना ३७, तर शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना अवघी ८ मते मिळाली. उपमहापौरपदी निवड झालेल्या भाजपच्या मालन ढोणे यांनाही ३७ मते पडली, तर शिवसेनेचे गणेश कवडे यांना एकही मत मिळाले नाही. वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याने शिवसेनेच्या बाजूने हात उंचावल्याने उडालेल्या गोंधळानंतर शिवसेना नगरसेवक बाहेर पडल्याने शिवसेना उमेदवारांच्या नावे त्यांच्या पक्षाचीही मते नोंद झाली नाहीत.

 

२४ जागा असलेली शिवसेना सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी बाकावर
नगरसेवकांना 'कारणे दाखवा': भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात येतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत सांगितले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नगरसेवकांना नोटिसा बजावल्या.

 

छिंदमने शिवसेनेच्या बाजूने हात उंचावताच गोंधळ
छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप असलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम महापौर निवडीतही वादग्रस्त ठरला. शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी छिंदमने हात वर करताच शिवसेना नगरसेवक भडकले. त्यांनी सभागृहातच छिंदमला मारहाण केली. छिंदमच्या फिर्यादीवरून ८ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपक्ष नगरसेवक छिंदम पोलिस बंदोबस्तात महापालिकेत आला होता. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी छिंदमने शिवसेनेला मत दिल्यास ते ग्राह्य धरू नये, असे पत्र पीठासन अधिकाऱ्यांना दिले होते. प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी छिंदमने शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्यासाठी हात उंचावल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी छिंदमला मारहाण केली. याप्रकरणी छिंदमने पोलिसांत तक्रारही दिली.

 

व्हिडिओ 'क्लिप' व्हायरल :
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे व श्रीपाद छिंदम यांच्यात मोबाइलवर झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली असून त्यात बोराटे आपल्याला मतदान करण्याची विनंती करत असल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु ही क्लिप बोगस असल्याचा दावा करून छिंदमवर कारवाई करावी, असा अर्ज बोराटे यांनी पोलिसांत दिला आहे.


स्वबळाचा प्रयोग निवडणुकीपूर्वी आणि नंतरही...
९ डिसेंबरला झालेली निवडणूक भाजप व शिवसेनेने स्वबळावर लढवली होती, तर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करून रिंगणात होते. सर्वाधिक २४ जागा मिळवून शिवसेना मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने १८, भाजप १४, काँग्रेस ५, बहुजन समाज पक्ष ४, समाजवादी पक्ष १, तर अपक्षांनी २ जागा मिळवल्या होत्या. बहुमतासाठी आवश्यक ३५ आकडा गाठताना सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार होती. मात्र, निवडणुकीपूर्वी स्वबळावर मैदानात उतरलेल्या शिवसेनेला नंतरही भाजपने स्वबळावर राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता मिळवत धक्का दिला.

 

विकासासाठी पाठिंबा घेतला, वावगे काय?
राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देताना एकही पद घेतलेले नाही. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहरात भाजपचा महापौर झाला तर विकास होईल म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला. त्यात वावगे काहीच नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केलेली आहे. -राम शिंदे, पालकमंत्री.

 

शिवसेनेनेच मागितले होते मत, पुरावेही देतो : छिंदम
शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनीच मला मतदान करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी शिवसेनेला मतदान केले, असे छिंदमने नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. याचे पुरावे, कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावाही त्याने केला.
 

बातम्या आणखी आहेत...