आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा, नयनतारा यांचे निमंत्रण रद्द करण्याची जबाबदारी स्वीकारली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- स्वातंत्र्य व सहिष्णुता या मूल्यांची पाठराखण करणाऱ्या येष्ठ इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर नकार देण्यावरून उठलेल्या त्सुनामीने अखेर महामंडळ अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा बळी घेतला. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांना पाठवलेल्या ई-मेल राजीनाम्यात जोशी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे लिहिले आहे.

 

"नयनतारा यांना नकार कळवण्याच्या चुकीची जबाबदारी कुणी स्वीकारो अथवा नाही पण महामंडळ अध्यक्ष म्हणून नैतिक जबाबदारी माझी आहे. सहगल यांना नकार कळवून झालेली चूक दुरूस्त करण्याची इच्छा असल्याने मी राजीनामा देत आहे. नयनतारा यांना भेटून आपण माफी मागणार आहोत, असे जोशी यांनी सांगितले आहे. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, राजीनाम्याची प्रेरणा आपण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून घेतली आहे. आपला एक सामान्य कार्यकर्ता संमेलन उधळून लावण्याची धमकी देतो आणि त्या संस्थेचा सर्वोच्च प्रमुख त्याच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, हेच खूप प्रेरक आहे. एखाद्या संस्थेच्या प्रमुखाने कसे वागायचे, याचे हे अलिकडच्या काळातील आदर्श उदाहरण आहे. संमेलन करणे हा अग्रक्रम असल्यामुळे आणि आयोजकांच्या अडचणी समजून घेणे हा महामंडळाच्या निर्णय प्रक्रियेतील महत्वाचा भाग असल्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या समजून घेतल्या नसत्या तर पुढे कोणी संमेलन घेण्यास तयार झाले नसते. परंतु आयोजकांनीही आपण किती मर्यादेपर्यत कशी, कोणती िवधाने केली पाहिजे, याचे भान बाळगणे आवश्यक होते. कुणीच जबाबदारी घेत नसल्याने "हे महामंडळ की पळपुट्यांचा अड्डा' इथपर्यत हे प्रकरण गेले. ज्यांची मूळ चूक आहे त्यांनी ती कबुल न करता माझी चूक नसताना मला खलनायक ठरवले गेले. बाकी सर्व नायक, उपनायक व चरित्र नायक अशी कथा रचली गेली. या कथेचे कथाकार व पटकथा लेखक कोण आहेत, हा सर्व आॅर्केस्ट्रा कोणी डायरेक्ट केला आहे, याचा माध्यमांनी शोध घ्यायला हवा, असे जोशी म्हणाले.

 

मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवले
आपली प्रतिमा कोणाच्याही आश्रयाने उभी केलेली नाही, कुणाकडे गहाण ठेवलेली नाही. माझे प्रतिमाहनन व चारित्र्यहनन ठरवून करण्यात आले आहे. कटकारस्थान रचून मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवले. आपण कुणावर, काय आरोप करत आहोत, याचे भान न बाळगता आयोजकांनी माझ्यावर बेछूट आरोप केले. हे माझ्यासाठी खूपच क्लेशकारक, दु:खदायक व वेदनादायक आहे. आयोजकांनी श्रीपाद भालचंद्र जोशी हे कसे कपटी, स्वार्थी, ढोंगी व सूत्रधार, खलनायक व डाव्या विचारसरणीचा आव आणणारे आहेत, अशी माझी प्रतिमा निर्माण केली. पण मी डावा, उजवा, मधला, तिरपा अशा कुठल्याही दिशेचा नाही, असे जोशी म्हणाले.

 

तर संमेलन देण्याचा विचार करावा लागेल
आयोजकांनी त्यांच्या झालेल्या चुकीबद्दल, राज ठाकरे यांच्या दिलगिरीनंतर आता ते कारण राहिलेले नाही, अशी क्षमायाचना केल्यानंतरसुद्धा आयोजकांमधील मंडळी या पद्धतीने वागणार असेल तर अशा आयोजकांना यापुढे संमेलन द्यायची की नाही, याचा निर्णय महामंडळाला घ्यावा लागणार आहे, इसा इशारा जोशींनी दिला. हे महांडळ या घटनेमुळे तुटून जाईल, त्यातून कार्यकर्ते बाहेर पडतील, इतपत धमक्या देण्यात आल्या. संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे हा अग्रक्रम असल्यामुळे आपण राजीनामा दिला. असेच दुषित वातावरण राहिले तर यापुढे साहित्य, संस्कृती, भाषा क्षेत्रातील संस्थांना कार्यकर्ते मिळणे बंद होईल. नयनतारा सहगल या कोणत्या विचारांच्या आहेत, याच्याशी महामंडळाला काहीही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री नागपुरचे आणि महामंडळाचे अध्यक्षही नागपुरचे असल्यामुळे हा मुख्यमंत्र्यांचा अजेंडा असल्याची वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला त्याचा खुलासा करावा लागला. ही लज्जास्पद गोष्ट आहे.

 

बातम्या आणखी आहेत...