Home | Magazine | Rasik | Shru G Rahi writes about women's condition

…पण पर्याय कायै?

राही श्रु. ग. | Update - Apr 14, 2019, 12:05 AM IST

आपल्या मनातला अंतिम युटोपिया आणि व्यवहारातल्या परिस्थितीचं भान यातला तोल मात्र अत्यंत महत्वाचा

 • Shru G Rahi writes about women's condition

  ‘ताई, तुम्ही म्हणता ते बरोबरंय. खरंच, लय वाढलीय बेरोजगारी. माझंच बघा ना, सहा लोकांचं कुटुंब आहे आमचं, आणि मी कमावणार म्हनून आमचा म्हातारा आशा लावून बसलाय. नोकरी काय भेटंना…’ या सदरातल्या मागच्या लेखानंतरचा पस्तीसावा फोन उचलेपर्यंत या वाक्यांची सवय होऊनही पुन्हा कसंसं होत होतं. ‘…मग ताई, याला पर्याय काय?’ या प्रश्नापर्यंत मी पुरेशी खचून जाऊन काहीबाही उत्तर देत होते. खाजगी आयुष्यापासून देशाच्या राजकीय परिस्थितीपर्यंत कशाविषयीही नुसती नाराजी व्यक्त केली तरी, आजकाल ताबडतोब ‘पण पर्याय काय आहे?’ असं विचारून आपल्या सगळ्यांना गप्प केलं जात असताना, या सगळ्या फोन आणि मेसेजवरून आलेल्या प्रामाणिक चिंतेनं मला विचारात पाडलं...


  आपल्या मनातलं आदर्श ‘दुसरं जग’ आणि आपल्या हाती आलेलं इथलं जग यांच्या भागाकारातून आपण पर्याय निवडत राहिलो, तेव्हा कुठे आपण अश्मयुगीन गुहेतून आजवरचा प्रवास करू शकलो. आपल्या मनातला अंतिम युटोपिया आणि व्यवहारातल्या परिस्थितीचं भान यातला तोल मात्र अत्यंत महत्वाचा...


  ‘पर्याय काय?’ या प्रश्नापासून ‘आता आहे ते असंय, पर्याय काय!’ अशा सुस्काऱ्यापर्यंत आपण फार वेगात पोचतोय. मला आठवतंय, रोजच्या जगण्यातल्या कसल्याशा मजबुरीने वैतागून जेवायच्या ताटावर कुणी त्रागा करायचं, तेव्हा माझी आजी हलकेच म्हणायची, ‘आपल्या हाती हेच जग बाई, तुला दुसरं जग कुठून आणू?’ आहे ती रोजची अडचण स्वीकारण्यासाठीची तिच्या पोतडीतली ही खास किल्ली होती. ‘आपल्या हाती हेच जग’ म्हणून एका जागी बसून राहणं, तिला कधीच पटलं नसतं. मनातली नाराजी आणि राग झटकून टाकल्यावर मग आहे, ते जग नीट दिसतं, हे तिला ठाऊक होतं. शांत होऊन पाहिल्यावर बंद झालेल्या रस्त्याला मोकळं करायचा मार्ग सापडतो, असा तिचा ठाम विश्वास होता. आपल्या आहे, त्या जगातच ‘दुसरं जग’ घडवता येईल, असा तो विश्वास होता. घरातली चणचण आणि वणवण, बाईच्या वाटेवर पसरलेले हजार काटेकुटे, नातेवाईकांमधल्या कुरबुरींवरचा अक्सिर इलाज दिवसाकाठी शांतपणे सापडेल, याची तिची तयारी होती. त्यासाठी आपल्या हातातल्या या जगातच दुसरं जग जन्माला घालण्यासाठी तिने आपल्या आवाक्यातले लहान मोठे लढेही दिले. खिशात पैसे नसताना कुठुनही पै-पै जमवून आपल्या पोरापोरींना शिकवणाऱ्या आणि मुलीच्या सासरच्या जाचातून तिला सोडवण्यासाठी अख्ख्या खानदानासमोर खमक्या उभ्या राहिलेल्या तिच्यासारख्या बायकांचे, हे अनाम लढे या ‘दुसऱ्या जगा’च्या अढळ विश्वासावरच तर उभे असतात.
  हीच माझी आजी दुष्काळात होरपळलेल्या कुठल्याशा गावाची गोष्ट सांगायची. एका वर्षी त्या गावात इतका दुष्काळ पडला की, धान्याचा कण न कण संपला. जमीन तडकली आणि जनावरं माना टाकू लागली. गावामधून जाणारा रिकामा रस्ता कोरड्या कडकडीत विहिरीपाशी पोचत होता. उद्याचा दिवस बघायची वेदना सोसावी लागू नाही, म्हणून तरूणांचे लोंढे विहीर जवळ करणार तेवढ्यात, त्यांच्यातल्या एकानं रस्ता अडवला. माळावरच्या निवडुंगांची फुलं खाऊन आणि मुळांमधले पाण्याचे थेंब पोटात ढकलून गावानं दुष्काळाचा महिना काढला. पुढे असा पाऊस झाला की विहिरीकडे जीव द्यायला निघालेल्या तरूणांनी हाती कुदळी फावडी घेतली आणि गाव कधी नाही, एवढं हिरवं झालं. ‘पर्याय नाही’ म्हणून विहीर जवळ केली असती, तर हे सगळे तरूण आपल्या मायबापाची जमीन कायमची उजाड करून बसले असते.

  बहुतेक वेळा कुणालाच नको असलेला पर्याय सर्वांच्या माथी मारताना ‘पण पर्याय काय?’ची खेळी खेळली जाते. विसाव्या शतकाच्या अखेरीस जगभरातल्या ‘मागास’ आणि ‘विकसनशील’ देशांवर नवउदारमतवाद लादताना अमेरिकेने वापरलेलं ‘आणखी कसलाच पर्याय नाही’ हे पालुपद ‘टीना’ (‘देअर इज नो अल्टरनेटिव्ह’) म्हणून ओळखलं जातं. कॅनेडियन लेखिका नाओमी क्लाइन यांच्या ‘द शॉक डॉक्ट्रिन’ या पुस्तकात त्यांनी या ‘टीना’मुळे जगभरात झालेले भयानक परिणाम सविस्तर समजावले आहेत. चिले हा दक्षिण अमेरिकेतला एक लहानसा देश. या देशामधले हुशार तरूण अमेरिकेत अर्थशास्त्र शिकायला गेले आणि नवभांडवलदार समर्थक, "फ्री मार्केट'ची भलामण करणाऱ्या शिकागो स्कूलच्या फ्रीडमनवादी (मिल्टन फ्रीडमन)अर्थनीतीने भारावून गेले. तुमचा देश मागास आहे, तुमची अर्थव्यवस्था बुडालेली आहे, तेव्हा अमेरिकेचं वर्चस्व असलेली नवउदार अर्थव्यवस्था स्वीकारली,तरच तुम्ही वाचू शकता, असं त्यांना शिकवलं गेलं. वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आपत्तींमुळे चिले आधीच जेरीस आला होता. त्यांचा हुकुमशाह युद्धखोरीने झपाटला होता. लोक भीती आणि निराशेने हतबल झाले होते. अशा वेळी अमेरिकेतून आलेल्या चिलेयन ‘शिकागो बॉइज’च्या सल्ल्याने देशाला ‘शॉक थेरपी’ दिली गेली. देशाचं कर्ज फेडून जागतिक बाजारात उतरण्यासाठी सगळी अनुदानं, शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत आणि सामाजिक क्षेत्रातला खर्च कापून टाकला. आपल्या एकमेव युद्धखोर राज्यकर्त्याच्या नीतीशिवाय खरंच ‘पर्याय काय’ म्हणत लोक नाईलाजाने या शॉक थेरपीला सामोरे गेले. आपल्या पगाराच्या थप्प्या घेऊन हे शिकागो बॉइज सुस्तावले तेवढ्यात, चिले अक्षरशः निकालात निघाला. देशाची अर्थव्यवस्था अशी कोसळली की, याआधी कधी न पाहिलेली हलाखी समोर उभी राहिली. एकीकडे जगभरातले अनेक देश या ‘टीना’च्या कचाट्यात सापडत होते, मात्र त्या त्या ठिकाणी विहिरीचा रस्ता अडवणाऱ्या तरूणांचे जत्थेसुद्धा उभे राहत होते. ‘देअर इज नो अल्टरनेटिव्ह’ला ‘दुसरं, नवं जग शक्य आहे’ (अनादर वर्ल्ड इज पॉसिबल) असं उत्तर देत, या देशोदेशीच्या लोकांनी जगभरात वेगाने पसरणाऱ्या नवउदार अर्थव्यवस्थेला छोटो छोटे स्थानिक पर्याय शोधले आणि यशस्वीही करून दाखवले. मिल्टन फ्रीडमन कोण हे माहीत नसलेले गावोगावचे साधे लोक विकेंद्रित, लोकनियंत्रित, सामाजिक न्याय जपणारी इकॉनॉमी शक्य आहे, हे सिद्ध करून दाखवू लागले.

  अनेकदा आहे, त्या अन्याय्य आणि हिंसक परिस्थितीला उत्तर शोधताना मोठ्या अडचणींचे डोंगर उभे राहतात, अशा वेळी उत्तर शोधणारे गांगरून जातात. ज्यांना आहे, त्या परिस्थितीतून फायदा मिळणार असतो, ते मग अशा वेळी गांगरलेल्या जनतेला ‘पण पर्याय काय आहे’ म्हणत आणखी गोंधळून टाकतात. लोकांना नको ते त्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार असतो. ‘पर्याय काय’ विचारण्यामागे स्थितीशील प्रतिगामी लोकांचं मोठं राजकारण असतं. आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी देशभर पसरलेल्या चळवळीमध्ये हर प्रकारचे लोक होते. एकत्र लढताना आपण काही चुकाही केल्या. त्या चुकांमुळे गोंधळून जाणं, तर आपल्या माणूस असण्याचं लक्षण! पण म्हणून ‘पर्याय काय’ म्हणत आपण ब्रिटिश सत्तेला चिकटून बसलो असतो, तर आजचं चित्र काय असतं, याची कल्पनाच केलेली बरी. आपल्याला माहीत होतं की, स्वातंत्र्य चळवळीत अनेक उणिवा आहेत. आपल्याला माहीत होतं की, स्वतंत्र भारतात सारं काही आलबेल नसणार. तरीही आपण आपलं ‘दुसरं जग’ घडवण्याची आशा असणारा पर्याय निवडत इतिहास घडवला. खुलेआम जुलूम आणि हिंसा करणारं सरकार नाकारून आपण आपल्या स्वप्नांना बांधणाऱ्या, संविधान घडवणाऱ्या सरकारचा पर्याय स्वीकारला. संविधानाने आपल्याला आपला युटोपिया - आपलं ‘दुसरं जग’ दिलं आणि पुढे संविधान मानणाऱ्या सगळ्या सरकारांनी ते दुसरं जग खरं करण्याचा रस्ता दाखवला.

  आता, व्यवहाराचं भान नसेल तर जगणं अवघड होऊन बसतं हे जितकं खरं तितकंच युटोपियाशिवाय जगण्याला अर्थ उरत नाही, हेही खरं. जगण्याचा तात्पुरता कोरडा हिशेब करत, तर प्राणीही जगतात. आपल्या मनातल्या दुसऱ्या जगाचं चित्र हेच तर आपल्याला रोज ‘माणूस’ करत असतं. ‘आपल्या हाती हेच जग’ म्हणताना माझी आजी, शैलेंद्रच्या या ओळीच तर सुचवत नव्हती?

  ‘तू जिन्दा है तो जिन्दगी की जीत, पर यकीन कर
  अगर कही है स्वर्ग तो उतार ला जमीन पर!’

  कोणी कितीही म्हणलं की, ‘जो भी है, हम हैं!’ तरी सांगते, फक्त पर्याय शोधत राहण्याला पर्याय नाही, दोस्त. बाकी, इथल्या चिखलातल्या सगळ्या सगळ्याला पर्याय आहे! फक्त ‘पर्याय काय’ म्हणत कोरड्या विहिरीकडे निघालेल्यांची वाट अडवून त्यांना रान हिरवं करायची संधी द्यायला तुम्ही आम्ही उभं राहायला हवंय...

  (लेखिका नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.)

  राही श्रु. ग.
  rahee.ananya@gmail.com
  लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२

Trending