Home | Magazine | Madhurima | Shubha Bhagwat writes about Tambit laddoo

तंबिट्टाचे लाडू

शुभा भागवत | Update - Aug 28, 2018, 12:35 AM IST

नागपंचमी हा उत्तर कर्नाटकातील माहेरवाशिणींचा एक पारंपरिक सण! माहेरवाशीण हक्काने माहेरी येणारच.

 • Shubha Bhagwat writes about Tambit laddoo

  नागपंचमी हा उत्तर कर्नाटकातील माहेरवाशिणींचा एक पारंपरिक सण! माहेरवाशीण हक्काने माहेरी येणारच. तिला बांगड्या, साडी हा माहेरचा आहेर. त्याबरोबरच घरात झोपाळे, तंबिट्टाचे लाडू, लाह्या हे सर्व दृश्य डोळ्यांसमोर तरळू लागले. डोळ्यातील आसवे पुसून तोंडात आलेला रुचीचा आवंढा गिळून, त्या पदार्थांची चवसुद्धा चाखली. वास दरवळला, तो पण दीर्घ श्वासाने हुंगला. तेव्हा, तोच पदार्थ चाखायला देऊन, आवडल्याची ढेकर, पोचपावती मला ऐकू येईलच.


  योगायोगाने यंदा माझी सई माहेरवाशीण इथेच माझ्याकडे आहे. माझ्यासाठी हा दुग्धशर्करा योग!
  आम्ही मुलीबाळी नवीन पारकरपोलके, मोठ्य बायका कुणी शालू कुणी पैठणी कुणी नऊवारी गोठ पाटल्या तोडे गजरे माळून आशा सजूनधजून थाटामाटात, तबकात तंबिट्टाचे चपटे लाडू, लाह्या, बुधले भरून दूध, वस्त्रं घेऊन आमची वरात देवळात जाऊन पुजायची. घरीपण “नागोबाला दूध” असा विशिष्ट ठेवणीतील टिपेचा सूर वा स्वार कानावर पडला की, आम्ही मुले गारुड्याच्या पोत्याकडे कुतूहलाने पाहून, नागोबा कधी एकदा पुंगीचा सूर ऐकून बाहेर येतोय व डुलायला लागतो हे अगदी डोळे विस्फारून पाहायचो.


  घरात, दारात, झाडाला झोके बांधलेले दोरीचे. ते कधी बसून तर कधी उभे राहून जोरजोरात घ्यायचे. जणू काही आमचे गगनाला हात भिडत होते. सुखद गारवा, हास्याच्या, खिदळण्याच्या, गाण्याच्या लकेरीने आसमंत भरून जायचा. ‘थांबवा आता, डोके गरगरून पडाल’ अशी गर्जना झल्यावरच खेळ बंद! आता त्या आठवणींवर पडदा!
  पण लाडू तर अजून करू शकतोच ना!

  साहित्य: फुटाणे (डाळे) पीठ - १ वाटी, गूळ बारीक चिरलेला - १/२ वाटी, सुकं खोबरं - २ चमचे भाजून, खसखस -१/२ चमचा भाजून, वेलचीपूड, घरी कढवलेलं तूप - पाऊण वाटी.


  कृती : तूप गरम करून त्यात गूळ घालावा. गूळ वितळल्यावर आच बंद करून वरील सर्व जिन्नस एकत्र करून ढवळावे. कोरडे वाटल्यास पातळ तूप वरून घालावे. सोसवेल असे थंड झाल्यावर लाडू वळावे. खालून व वरून आंगठ्याने दाब देऊन चपटे करावे. (हीच या लाडवाच्या आकाराची खासियत आहे).

  - शुभा भागवत

Trending