आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकबोरोकी उद्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकबोरोक ही त्रिपुरा राज्याची अधिकृत भाषा. पण दुर्दैवाने, इथल्या अभिजनवर्गाची भाषा मात्र बंगालीच राहिलेली आहे. अशाही अवस्थेत, अवघ्या शे वर्षाची लिखित परंपरा असलेली ‘कोकबोरोक' मात्र साहित्यिक मूल्यांच्या अंगाने सर्वश्रेष्ठ ठरतेय. या भाषेतील साहित्यिकांची आणि त्यांच्या साहित्याची भारतीय पातळीवर दखलही घेतली जातेय. याच परंपरेतील लक्षवेधी कवी आणि अनुवादक म्हणून चंद्रकांता मुरासिंग यांचे योगदान अनन्यसाधारण राहिले आहे...

 

चंद्रकांता मुरासिंग हे वृत्ती-प्रवृत्तीने कवी. सध्या आगरतळ्याला राहतात. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या मुरासिंग यांनी हलाखीचं जगणं अगदी जवळून अनुभवलंय. या पहाडी भागात केली जाणारी शेती ही ‘शिफ्टिंग कल्टिव्हेशन' असते. पर्यायाने जमिनी बदलत राहतात. जागा बदलत राहतात. रोज निसर्गाशी नव्याने झगडावे लागते. हा झगडा, हा संघर्ष प्रामुख्याने मुरासिंग यांच्या कवितेत आढळून येतो. त्यांना स्वतःलाही या भटकंतीमुळे प्राथमिक शिक्षणासाठी झगडावे लागले. सारखे बदलणारे प्रदेश, मागे पडत जाणारी माणसं, निसर्गाशी जुळवून घेण्यासाठीची धडपड आणि सोबत कायमचेच हिंसक वातावरण, या साऱ्या भवतालातून यांचे अनुभवविश्व आकाराला आलेले आहे.

 

म्हणूनच त्यांची कविता जशी पाखरांची गाणी गाते, तशीच माणसांचं व्याकूळ जगणेही मांडते. त्यांच्या कवितेत जशी माती येते, तिचा गंध येतो तशीच गन-पावडर ही येते. त्रिपुरातील एखाद्या मळ्यावर काम करणाऱ्या कामगाराच्या झुगी-झोपडीपासून ते कोलकात्यातील एखाद्या पंचतारांकित हॉटेलात सुरू असलेल्या बैठकीपर्यंत बरेच आडवेतिडवे विषय त्यांच्या कवितेत आपणाला आढळून येतात. त्यांच्या कवितेत आजूबाजूच्या हिंस्र परिवेशातून आलेला वेदनांकित आकांत प्रखरतेने दिसतो. आजमितीस त्यांचे कोकबोरोक भाषेतून सात काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून त्यासोबतच त्यांनी रवींद्रनाथांच्या कवितेचा अनुवादही केलेला आहे. सध्या ते आगरतळ्याच्या त्रिपुरा ग्रामीण बँकेत काम करतात.

 

चंद्रकांता मुरासिंग यांच्या कवितेत आढळणाऱ्या पात्रांतून वाचकांना भूत-वर्तमानाचे आकलन होत राहते. हे लोक फक्त नावापुरतेच येत नाहीत, तर त्यांच्या जगण्याचं संचित वाचकांसमोर उभे करतात. त्याला लोकगीतांतून आलेल्या अनेक मिथकांची बेमालूम जोड असते. मुळातच या भाषेचा मौखिक परंपरेचा फार मोठा इतिहास आहे. त्यांची कविता अनेक मिथकांचा वापर करत वाचकांसमोर समकाळ उभा करते. ‘स्लमबर' या कवितेत त्यांनी अशीच एका कुंतुंगलाची बायको, उभी केलीय. ती भुकेने हैराण आहे.

 

नि कवी सांगतोय की, तिने तिच्या दारात गवताच्या काड्या आणि भला मोठा बेडूक शिजवायला ठेवलाय. या कवितेत कवीने आजूबाजूच्या भयाण अशा दारिद्र्यखुणा रेखांकित केल्यात. पोटापुढे अगतिक झालेली माणसं दाखवलीत. शेवटी ती कुंतुंगलाची बायको भुकेनं व्याकूळ होऊन मरते. 
आणि कवी सांगतोय की, मरणे या भागात नवीन नाहीये. कोणी तरी सांगतेय की, बाहेर क्रॉसफायर झालाय नि त्यात कुणाचा तरी भाऊ किंवा मुलगा मारला गेलाय. अर्थात जगणं महाग आणि मरण स्वस्त असलेल्या या प्रदेशातील वास्तव कवी वाचकांसमोर अधोरेखित करतोय. आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीपासून दूर जाण्याचा सल एकीकडे असतानाच त्यांच्यावर एक वेगळीच ओळख किंवा अस्मिता लादली जातेय. त्याचा कवीला प्रचंड खेद आहे. त्यातच सामाजिक किंवा सांस्कृतिक श्रेष्ठतेतून एक प्रकारचे लादलं जाणारं दुय्यमत्व कवी ओळखून आहे. यासाठी याच भाषेतील महत्त्वाचे कवी किशोर मोरासिंग यांची ‘आयडेंटिटी’ ही कविता पाहता येईल.

 

कवी सांगतो - माझे समवयस्क मला म्हणतात / हे मामा/ तर शिक्षक म्हणतात / हा आहे उग्रवादी / पोलिसांना तर मी आतंकवादी वाटतो/ तर एखाद्या नेत्याला/ वाटतो मी मागासवर्गीय/ रेशन विक्रेत्यांसाठी असतो, मी बीपीएल कार्डहोल्डर / तर अजून कोणासाठी पहाडी / तर अजून कोणासाठी अलगवादी वगैरे /अशा असंख्य ओळखी घेऊन जगत राहतो मी/ पण असे कधीच होत नाही / की मी असतो कोणाचा तरी नातेवाईक, भाऊ किंवा मित्र / किंवा फक्त माणूस. इथे माणूस म्हणून समजून घेण्याच्या किमान अपेक्षा कवी व्यक्त करतोय. काळाच्या ओघात परंपरागत सोबत असलेल्या जमिनी काढून घेतल्या जाताहेत याची जाणीव या भागातील बहुतांश कवींच्या साहित्यात आढळून येतेय. चंद्रकांता मोरासिंग सांगतात की, उद्या कदाचित आम्ही मूठभर मातीसाठी मोताद असू. हा येणारा काळ दुर्बलांना अधिक दुर्बल करणारा, गरीब करणारा आहे.

म्हणूनच त्यांची कविता अधिक राजकीय बनत थेट शासन व्यवस्थेवर प्रहार करते. तिला जाब मागू लागते. ते सांगतात की ‘आजकाल शब्द इतके स्वस्त झाले आहेत आणि त्याचा पुरवठा इतका सातत्यपूर्ण होतो आहे की, कोणतेही सरकार आपल्याकडे लक्ष देण्याची तोशिष का घेईल?’ आपल्या कवितेचा संघर्ष हा गेंड्याची कातडी पांघरून वावरणाऱ्या व्यवस्थेशी आहे, याची जाणीव असलेला हा समकाळातील म्हणूनच महत्त्वाचा कवी आहे.

 

नुकताच त्यांच्या काही मोजक्या कवितांचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आला. ‘मेमॉयर्स ऑफ वूड' या नावाने प्रकाशित झालेल्या संपादनाचे संपूर्ण भारतभर स्वागत, कौतुक झाले. चार दशकांहून अधिक काळ कोकबोरोक भाषेत लिहिणाऱ्या या कवीच्या महत्त्वपूर्ण कवितांचा यात समावेश आहे. चंद्रकांता मुरासिंग यांच्या कवितेत तुम्हाला समकालीन त्रिपुराच्या जगण्याचे समग्र अवशेष सापडतील, असे मत या संपादनासाठी प्रस्तावना लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री ‘तेमसुला ओ’ यांनी लिहिले आहे. इंग्रजी कवितांसोबतच त्यांच्या मोजक्या शंभर हिंदी कवितांचा अनुवाद कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी विद्यापीठाने प्रकाशित केला आहे. अगदी त्याचसोबत ‘विश्वभारती’कडून रवींद्रनाथांच्या प्रातिनिधिक कवितांचा कोकबोरोक भाषेत अनुवाद प्रकाशित करण्यात आलेला आहे.

 

कवी म्हणून त्यांच्यावर रवींद्रनाथांच्या कवितांचा प्रभाव असल्याचे ते मान्य करतात. ते सांगतात की रवींद्रनाथांचे सुरुवातीपासूनच त्रिपुराशी एक आत्मिक नाते राहिलेले आहे. अगदी त्यांचे त्रिपुराचे राजे बीर चंद्र माणक्य यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याच आत्मीय नात्यातून ते रवींद्रनाथांच्या कवितेकडे आकृष्ट झाले.


निसर्गापासून दूर झालेलं मानवी जीवन आणि राजकीय महत्त्वाकांक्षेतून घडणारी आजूबाजूची हिंसा अशा अनेक गोष्टींची विपुल चित्रणे त्यांच्या कवितेत आढळून येतात. आजूबाजूचा काळ संवेदनशील माणसाला अधिक अस्वस्थ करणारा असताना आपण मात्र दिवसेंदिवस आंधळे बनत चाललो आहोत, ही जाणीव कवीला अस्वस्थ करते. त्याच्या एक कवितेत तो सांगतो की - ‘या झाडाच्या फांद्यांवर / फडकतोय ध्वज दिमाखाने / जो रंगवलाय कैक आंधळ्यांनी मिळून.' आपला डोळसपणा हाच घडणाऱ्या हरेक घटनेला प्रतिसाद असू शकतो.

 

त्या डोळस हस्तक्षेपाची कवी या काळात वाचकाडून अपेक्षा ठेवतोय. हा कवी ज्या भागातून कविता लिहितोय, तो कधीच रक्तांकित झालाय. दुय्यमत्वाच्या आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्न करू शकतील, अशा कैक ओळखी त्या समूहावर जबरदस्तीने लादल्या गेल्या आहेत. अशा या दहशतगर्द जगात हा कवी मात्र एतद्देशीय भावनांशी प्रामाणिक राहून एका डोळस संवादाची जागा निर्माण करू पाहतोय. त्यांनी रवींद्रनाथांच्या कवितांचे केलेले भाषांतर असेल किंवा त्यांनी खुद्द लिहिलेल्या कविता असतील, हे सारे साहित्य एका भयमुक्त डोळस जगाच्या निर्मितीसाठीच तर आहे. एकंदरीत त्रिपुराचे समकालीन वास्तव समजून घ्यायचे असेल, वा कोकबोरोक भाषेचे साहित्यिक सौंदर्य समजून घ्याचे असेल, तर आजमितीस चंद्रकांता मुरासिंग यांच्या कवितेला पर्याय नाही.

 

- सुशीलकुमार शिंदे

shinde.sushilkumar10@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

 

बातम्या आणखी आहेत...