आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shweta Patil Madhurima Article About Urdu Hindi Shayari, Gazal, Poetry And Songs

उर्दूच्या आशिकांची महफिल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्वेता पाटील

उर्दू अन् हिंदी भाषेची जपवणूक व्हावी, या भाषांचं सौंदर्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या हेतूने पाच वर्षांपूर्वी ‘जश्न ए रेख्ता' चा पहिला प्रयोग झाला आणि आता सबंध भारतातून दर्दी ‘रेख्ता'साठी गर्दी करतात. ये तेरे गले का जो दुपट्टा हैं वो ठीक हैं,

मगर ये परचम बन जाता तो अच्छा होता!दिल्लीच्या ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये पुस्तकं आणि चहाच्या दुकानांच्या गदारोळात ही अक्षरं लिहिलेला बोर्ड दिमाखात उभा होता. झाडांवर रंगीत धाग्यांनी केलेल्या सुंदर नक्षीच्या सोबतीला झोतात उभी असलेली उर्दू, हिंदी अक्षरं बघितली अन् आपण भाषेच्या उत्सवाला आलो आहोत ही जाणीव सर्वांगाला झाली. "जश्न-ए-रेख्ता'ला आले होते. रेख्ता हे उर्दूचं सुरुवातीचं नाव... आणि "रेख्ता' या विशेषणाचा अर्थ "सहजपणे येणे' असा होतो. त्या उर्दू भाषेच्या जश्नमध्ये मी सामील होत होते. तीन दिवस उर्दू अन् हिंदी कविता, गाणी, शायरी, गझल या सर्वांनी मला त्यांच्या जगात सहज सामावून घेतले होते. 
उर्दू अन् हिंदी भाषेची जपवणूक व्हावी, या भाषांचं सौंदर्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या हेतूने पाच वर्षांपूर्वी "जश्न-ए- रेख्ता' चा पहिला प्रयोग झाला आणि आता सबंध  भारतातून दर्दी "रेख्ता'साठी गर्दी करतात. स्टेडियमच्या आवारात एकाच वेळी चार ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम चालू होते. गप्पा, गझल, कव्वाली, गाणी अगदी सगळंच... प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल म्हणावा असा.  इतकंच काय तर बाहेर डिजिटल स्क्रीन लावलेल्या होत्या, तिथेही लोकं ठाण मांडून बसलेले. बरं त्यात सगळ्या वयांची लोकं. दिल्लीची थंडी, हातात वाफाळत्या चहाचा कप अन् कानावर पडणारी व्वा, इर्शाद, क्या बातची दाद! जसजशी संध्याकाळ झाली तसतसं शब्दांचा सण किती देखणा करता येऊ शकतो याची प्रचिती आली. इथल्या प्रत्येक सजावटीला उर्दू भाषेचा, संस्कृतीचा साज होता. मंडपातली रोषणाई तुम्हाला आपलेपणाची साद घालत होती. पुस्तकांचे स्टॉल, खाण्याची दुकानं, उर्दू अक्षरांची रेखाटनं असलेल्या भेटवस्तूंची दुकानं या सर्वांनाच उर्दू नावांचा पेहराव होता. भपकेबाजी नाही, पण हा मौसमच अक्षरांचा आहे असं वाटावं अशी नजाकतीने तो परिसर नटला होता. कव्वालीच्या शेवटाला तल्लीन होऊन स्वतःतच डोलणारे तरुण, तितक्याच अदबीने सामाजिक विषयावरच्या शायरीवर दाद देताना बघितले.


सबको मेरा सलाम, तुझें देखने के बाद! 
दुनिया से क्या काम, तुझे देखने के
बाद!ही गझल जणू काही फक्त आपल्यासाठीच आहे असं समजून प्रेमाच्या दुनियेत स्वतःला झोकून देणाऱ्या तरुणाईचं ते बेहोश रूप पाहून हरखून गेले. रेख्ताचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःला कधीच "अपॉलिटिकल' म्हटलं नाही. तिथल्या स्टेजवरून नेहमीच सामाजिक, राजकीय विषयांवर भक्कम भूमिका घेतल्या गेल्या आहेत. भाषेची ताकद ओळखून कमी आणि प्रभावी शब्दांत सत्तेला प्रश्न विचारत राहणं हे आपण जागे असण्याचंच लक्षण आहे. नाही का? असं सगळं मी माझ्या मित्राशी बोलत होते. तोवर आमच्या पुढच्या खुर्चीवर बसलेल्या एका तरुणाने अचानक मागे वळून आम्हाला विचारलं , ‘तुम्ही स्पेशल रेख्तासाठी इथं आलात का? की इथंच असता?'
मित्राने सांगितलं,"मी हरियाणा गव्हर्नमेंटसोबत काम करतो. जवळ होतं म्हणून आलो.' 
मी सांगितलं, 
"मी दिल्ली गव्हर्नमेंटसोबत इंटर्नशिप करतेय.'


त्यावर त्याचं उत्तर होतं, "मी मुंबईचा आहे. फक्त रेख्तासाठी दिल्लीला आलोय. आम्ही चार-पाच मित्र आलोय, खास रेख्तासाठी म्हणून.' हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर अभिमान अन् आनंद दोन्हीही  झळकत होते. मग मात्र मी विचार करायला लागले. मला त्या तीन दिवसांत असे अनेक लोक भेटले, जे फक्त रेख्तासाठी म्हणून दूरदूरवरून प्रवास करून आले होते. माझ्यासारख्या अनेकांना तर उर्दू पूर्णत: कळतही नाही तरी आम्ही तिथे ठाण मांडून बसलो होतो. हे फक्त भाषेच्या सौंदर्याच्या ओढीने होतं का? की ज्या कल्पकतेने हा उत्सव साजरा केला जात होता त्याचा प्रभाव होता?  दुसरं कारण अधिक पटणारं वाटलं. सगळ्यांनाच सगळ्या भाषा समजतातच असं नाही. पण प्रत्येक भाषेचा एक वेगळा बाज असतो. जश्न ए रेख्तासारखं "मराठीचा सण' इतक्याच जोरदारपणे साजरा झाला तर तरुणाई त्याकडे आकर्षित होणार नाही का? नक्की होईल. कारण आजही "मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर' किंवा ‘हिरवे हिरवेगार गालिचे' या कविता कानावर पडल्यावर क्षणभर विसावा घेणारे आमच्यासारखे अनेक जण आहेत. म्हणून जश्न ए रेख्ताच्या मराठी व्हर्जनची स्वप्नं रंगवत त्या सुरेल माहोलमधून बाहेर पडले ते निदा फाजलींच्या ओळी गुणगुणतच,


‘यही हैं जिंदगी कुछ ख्वाब कुछ उम्मीदे,
इनही खिलोने सें तुम भी बहल सको तो चल
ो।'