आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shweta Patil Writes About Gandhi's India's 'Lena'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांधींच्या भारतातील ‘लेना’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्वेता पाटील

महात्मा गांधींबद्दल जर्मनीच्या लेनाला बरीच माहिती होती आणि जर्मनीतील बरेच विद्यार्थी गांधींबद्दल खूप वाचतात हेही लेनाने सांगितले.


लेना ही जर्मनीची. मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी. गेल्या वर्षी एका छोट्या संशोधनासाठी तीन महिन्यांसाठी भारतात आली. आधी नाशिक जिल्ह्यात एका मेडिकल कॉलेजमध्ये राहिली आणि शेवटचा एक महिना आमच्याकडे म्हणजचे अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, बंगळुरूला थांबली. ती खूप मनमोकळी, भरभरून बोलणारी अशी होती. 

एकदा जेवताना मी तिला विचारलं, “जर्मनीमध्ये कोणता भारतीय नेता लोकप्रिय आहे?’
अन् ती चटकन बोलली, “महात्मा गांधी. Gandhi is the only Indian leader that every German knows.

महात्मा गांधींबद्दल लेनाला बरीच माहिती होती आणि जर्मनीतील बरेच विद्यार्थी गांधींबद्दल खूप वाचतात हेही लेनाने सांगितले. 

लेनाला पहिल्यांदा भेटले तेव्हा आम्ही सिनेमावर बोलत होतो आणि ती हसत हसत बोलली, “मी नाशिकला एक सिनेमा बघितला. नाव आठवत नाही. हिंदी होता की मराठी तेही माहीत नाही. पण मी खूप हसले’ एखादा प्रसंग व्हायचा आणि लगेच हीरो-हिरोइन नाचायला लागायचे. I was Like, अरे काय झालं कायं? अचानक का नाचताय? अन् एकाच गाण्यात चार ड्रेस बदलायचे त्यांचे. हे म्हणजे काहीही होतं हा’ असं म्हणून ती जोरजोरात हसायला लागली. आम्हीही तिच्या हसण्यात सामील झालो. सिनेमात गाणी असल्याशिवाय आम्हाला सिनेमा बघायला मजा येत नाही, असे सिनेमे बघायची सवय असलेले आम्ही आणि सिनेमात गाण्याचं काय काम हा तिचा प्रश्न. याच वेळी जाणीव झाली की बाहेरच्या देशातील लोकांचा सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो.  

भारतात येण्यापूर्वी इथल्या महिलांच्या समस्यांबद्दल तिने खूप ऐकलं होतं. महिलांवरचे अत्याचार, स्त्री-पुरुष असमानता, महिलांचं सगळं फक्त सोसत राहण्याची वृत्ती असं सगळंच. विशीतली ही तरुणी जेव्हा भारतात आली ती या सर्वांबद्दलची भीती, चीड, राग मनात घेऊनच. इथं आल्यानंतर भारतातल्या महिलाचं वेगवेगळ्या पातळीवर बदलत जाणारं चित्र पाहून तिची मतं बदलत  गेली. लेनासोबत राहून तिच्याशी मैत्री झाल्यावर भारतीय स्त्रीला स्वतःच्या शरीराबद्दल किती नको तितका संकोच असतो हे प्रकर्षाने जाणवलं. भारतात अरेंज मॅरेज पद्धतीने विवाह केले जातात ही गोष्ट पचवणे तिच्यासाठी थोडं अवघड होतं. शिवाय अाजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी एका वेगळ्या वैचारिक आणि  सांस्कृतिक परिवेशातून आलेल्या व्यक्तीला किती विचित्र वाटू शकतात हे बघून मलाच आश्चर्य वाटायचं. जर्मनीत उच्च शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत दिलं जातं, पण भारतात भाषेचा झालेला घोळ बघता उच्च शिक्षण घेण्यात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना किती संघर्ष करावा लागत असेल, अशी चिंता लेनाला वाटायची.  लेना म्हणते की, “मी जर माझी मातृभाषा सोडून इतर कोणत्या भाषेत शिकले असते तर मला नाही वाटत की आज मी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करू शकले असते. 

तिच्या बोलण्यातून सतत गांधीजींचे संदर्भ यायचे. भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल इतका आदर होण्यामागे भारत हा गांधींचा देश आहे असं तिचं मत होतं. जगभरात आपली ओळख गांधींचा भारत अशीच आहे ही मला आश्वस्त करून जाणारी गोष्ट होती. लेना आता जर्मनीला परत गेलीये. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहोत. जर्मनीच्या लेनासाठी मी ‘गांधींच्या भारतातील श्वेता’ आहे. मला या सुखावणाऱ्या ओळखीतच  आयुष्यभर राहायला आवडेल.

संपर्क- 7875017637