आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री-पुरुष अन त्यांचे कपडे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्वेता पाटील

कॉलेज फेस्टिवलमध्ये साडी आणि टाय डे चा दिवस पुण्याच्या फर्ग्युसनमधील तीन मुलांनी साडी घालून साजरा केला. अशा घटनांना अनेकदा फक्त एका इव्हेंटचं रूप येत असलं तरी यानिमित्ताने पुन्हा स्त्री पुरुष, ट्रान्सजेंडर यांच्या कपड्यांमधील भेद, त्यात असलेला ताठरपणा या संदर्भात चर्चा होणं महत्त्वाचं वाटलं.


फर्ग्युसन कॉलेज मध्ये आगळावेगळा साडी डे' अशा शीर्षकाची बातमी वाचली. कॉलेज फेस्टिवलमध्ये साडी आणि टाय डे चा दिवस पुण्याच्या फर्ग्युसनमधील तीन मुलांनी साडी घालून साजरा केला. आकाश,सुमीत आणि ऋषिकेश अशी त्या तिघांची नावं. साहजिकच त्यांनी काहीतरी वेगळी कृती केली म्हणून वर्तमानपत्रांनी त्याची दखल केली. फर्ग्युसनची माजी विद्यार्थिनी असल्याने मलाही त्याबद्दल उत्सुकता होतीच. त्यातल्या एका मित्राशी बोलले. स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी ही कृती केल्याचं त्याचं म्हणणं होतं. अशा घटनांना अनेकदा फक्त एका इव्हेंटचं रूप येत असलं तरी यानिमित्ताने पुन्हा स्त्री पुरुष, ट्रान्सजेंडर यांच्या कपड्यांमधील भेद, त्यात असलेला ताठरपणा या संदर्भात चर्चा होणं महत्त्वाचं वाटलं.

आपण पुरुषसत्ताक व्यवस्थेत जगतोय. सहाजिकच जे जे पुरुषांचं ते ते श्रेष्ठ ह्या विचारांचे आपण बळी आहोत. कपड्यांच्या बाबतीतही हीच तरहा आहे. म्हणजे काळाची गरज म्हणून स्त्रियांनी साडीच्या जागी पंजाबी ड्रेस,पँट शर्ट घालायला सुरुवात केली. पँट शर्टची ओळख पुरुषांचा पेहराव अशी आहे. पण ते कपडे कमी अधिक प्रमाणात स्त्रियांकडून स्वीकारले गेले. पण पुरुषांनी मात्र रूढार्थाने स्त्रियांचे असणारे कपडे जसं की साडी, घागरा ओढणी कधीच स्वीकारले  नाहीत. शर्ट पँट घातलेली स्त्री समाजाने स्वीकारली पण साडी घातलेला पुरुष असं चित्रही भारतीय समाज स्वीकारू शकत नाही. याही पुढे जाऊन स्त्रीने पुरुषांचे कपडे घातले की तिला मर्दानी वगैरे उपाध्या देऊन तिचं कौतुक करणं किंवा तिचा गौरव करताना फेटा बांधणे अशा कृती समाजात होत असतात. पण याच जागी एखाद्या पुरुषाचा सन्मान करतांना त्याला साडी भेट दिलीये असं आपण कधी ऐकलय का? नाही ना...कारण ते तर कमीपणाचं होईल, त्याचा अपमान होईल. अन् एखाद्या पुरुषाने असे कपडे घातलेच तर त्याला वाईट पद्धतीने हिणवलं जाईल. या सर्वाचं मुख्य कारण म्हणजे  स्त्रियांच्या कपड्यांना दुय्यमत्व देण्याची आपली मानसिकता.


मनुष्य जन्माला येताना लिंगभेद सोडला तर कोणतेही भेद सोबत घेऊन येत नाही.आई वडील, समाज त्याला त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक चौकटीनुसार कपडे घालतात. मुलगा असेल तर पँट शर्ट, मुलगी असेल तर फ्रॉक अशी ती सुरुवात असते. खरंतर त्यांना असे कपडे घालताना आई वडिलांनी काही त्याची परवानगी घेतलेली नसते. कारण तेव्हा त्या बाळाला ती समज नसते. तुम्ही समाज म्हणून जे लादता ते- ते तो स्वीकारतो. पण जेव्हा त्या व्यक्तीला समज येते, तेव्हा जर एखाद्या मुलाने पँट शर्ट नाकारून साडी किंवा सलवार कुर्ता घालायचं ठरवलं आणि एखाद्या मुलीने पँट शर्ट घालायचं ठरवलं तर ती त्याची/तिची  वैयक्तिक चॉईस असते आणि समाजाने तितक्याच सहजपणे ती स्वीकारायला हवी. पण असं मात्र होतं नाही.कारण कपड्यांच्या भोवती  फिरणारी श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाची व्यवस्था. कपडे हे माणसाने निर्माण केलेत आणि ते निर्जीव असतात. त्याला कसली आली ईज्जत अन श्रेष्ठ- कनिष्ठत्वाची भावना? हे सगळं  मानवी संस्कृतीने कपड्याशी जोडलं आणि ते इतकं रिजिड  करून ठेवलं की कुणी वेगळे कपडे घातले की आपण बिथरतो, आपली संस्कृती बिथरते, संस्कृती रक्षक घाबरतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेत बाईला मिळणाऱ्या  दुय्यम दर्जाची वागणुकीमुळे संपूर्ण समाज तिच्या कपड्यांकडेही त्याच नजरेने बघतो. हिजडा समूहाने बाईसारखा पोषाख आणि बाईचं वागणं स्वीकारलं आहे. या समूहाकडे तुच्छतेने बघण्याच हेही एक कारण असू शकतं. स्त्रियांनी पुरुषांसारखं वागावं असं माझं म्हणणं नाही, कारण तसं करणं म्हणजे पुरुष सर्वार्थाने श्रेष्ठ आणि बरोबर आहे हा पुरुषसत्ताक विचार मान्य करणं होय. स्त्री पुरुष समानतेचा पुरुष हा मापदंड नाही. तसेच पुरुषांनी स्त्रियांसारखं रहावं हाही आग्रह चुकीचाच. "स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांचं माणूसपण स्वीकारावं' या दिशेने काम करण्याची गरज आहे. एकदा एकमेकांबद्दल एकमेकांच्या मनात असलेला भेदभाव संपला की कपडे वगैरे हे बाह्यरूपातले भेदभाव सहज विरून जातील आणि कपड्यांचा संबंध हा त्यात कन्फर्ट वाटण्याशी असतो हा विचार रूजण्यात मदत होईल.

लेखिकेचा संपर्क - 7875017637