आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार गौरी लंकेश खून प्रकरण: जळगावमधून एसआयटीच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कर्नाटक राज्यात झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचे धागेदोरे जळगाव शहरात मिळून आले आहे. सोमवारी दिवसभर सोलापूर, बंगळुरू येथील एसआयटीचे पथक जळगावातील कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या सिद्धिविनायकनगरातील एका घरात तपासासाठी आले होते. या घरातून काही महत्त्वाचे पुरावे घेऊन हे पथक मंगळवारी दुपारी भुसावळ येथे रवाना झाले. अत्यंत गोपनीयता बाळगत या पथकाने सोमवारी स्थानिक पोलिस व माध्यमांनादेखील अधिकृत माहिती देण्याचे टाळले होते. 


तीन दिवसांपूर्वी नालासोपारा (मुंबई) येथून सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना दारूगोळ्यासह अटक करण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. तर एम.एम. कुलबर्गी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व गौरी लंकेश यांच्या खुनाच्या प्रकरणातदेखील पोलिसांची प्रगती नसल्यामुळे न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगाने राज्यभरात एसआयटीचे पथक सक्रिय झाले आहे. मुंबईत दारूगोळा सापडल्यानंतर त्याची लिंक थेट जळगावपर्यंत येऊन ठेपली आहे. सोलापूर जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या नेतृत्वात एक पथक सोमवारी सकाळी जळगावात दाखल झाले. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली. 


कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या सिद्धिविनायकनगर येथील एका घरात हे पथक आले. दुपारी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलिसांचे पथक याच घरात थांबून होते. घरातील प्रत्येक वस्तू, आक्षेपार्ह साहित्याची तपासणी केली. काही वस्तू पोलिसांनी सोबत नेल्या. या घराच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांकडूनदेखील माहिती घेण्यात आली. सावखेडा शिवारात असलेल्या सिद्धिविनायकनगरात बऱ्यापैकी शांतता आहे. हा परिसर निर्मनुष्य असल्यामुळे संशयितांनी तेथे राहून काही कट रचल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. यानंतर बुधवारी सकाळी पथक भुसावळकडे रवाना झाले होते. 


दोघे मे महिन्यापासून आले होते राहण्यासाठी
एका माजी नगरसेवकाच्या मालकीचे हे घर आहे. मे महिन्यात दोन तरुणांना त्याने घर भाड्याने दिले होते. हे तरुण जास्त करुन बाहेरच असायचे. रात्रीच्या वेळी घरी येत असत. दरम्यान, त्यांच्या शेजारी असलेली तीन घरेदेखील रिकामे असल्यामुळे कोणाशीही त्यांचा संबध आला नाही. दरम्यान, हे दोघे कोण होते? बेपत्ता का झाले? याबाबत पोलिसांनी गोपनीयता ठेवली आहे. तर घर मालकानेदेखील त्यांच्याबद्दल जास्त माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे. 


परिसरात भीतीचे वातावरण
पोलिसांच्या छापेमारीनंतर सोमवारी सायंकाळी कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांनादेखील माहिती मिळाली. आपल्या परिसरात गुन्ह्यांशी संबंध असलेले लोक राहत होते. पोलिसांनी शाेधासाठी दिवसभर चौकशी केली. यामुळे या परिसरातील नागरिकदेखील भयभीत झाले आहेत. मंगळवारी दिवसभर वाघनगर, कोल्हे हिल्स परिसरात याच चर्चा रंगल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...