'फ्री होल्ड'वरून सेना-भाजपचा / 'फ्री होल्ड'वरून सेना-भाजपचा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे

सुंदोपसुंदी ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची भाजपची तयारी 

Dec 22,2018 10:14:00 AM IST

औरंगाबाद- सिडकोतील मालमत्तांचे लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष सरसावला असून ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरात जाहीर सत्कार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भाजपच्या या निर्णयाला शिवसेनेने अर्थातच आक्षेप घेतला आहे. २० वर्षांपासून आम्ही यासाठी प्रयत्न करतोय, आम्ही अनेक बैठका घेतल्या. हा निर्णय होणारच होता, आता झाला तर त्याचे श्रेय घेतले जातेय. भाजपला फक्त श्रेय घेण्याची उत्सुकता असल्याची टीका शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

फ्री होल्डवरून फ्रीस्टाइल
दरम्यान, अजून मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला नसला तरी ३ जानेवारी रोजी १०० कोटींचे रस्ते भूमिपूजनासाठी फडणवीस शहरात येत असून त्याच वेळी जाहीर सत्कार करण्याचे नियोजन असल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. तर आपण सर्व कामे करायची आणि भाजपने श्रेय घ्यायचे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, अशी विनंती आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचेही खैरे म्हणाले.

फ्री होल्डचा निर्णय झाल्यापासूनच कलगीतुरा रंगलेल्या या दोन मित्रपक्षांत आता या निर्णयाचे खरे शिल्पकार कोण यावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. खैरे सध्या पंढरपूर येथे आहेत. तेथे सोमवारी ठाकरे यांची सभा आहे. तेव्हाच आपण ठाकरेंना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची विनंती करणार असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले. फ्री होल्डच्या मुद्द्यावरून येत्या काळात शिवसेना व भारतीय जनता पक्षात फ्रीस्टाइल वाद लागण्याची चिन्हे या निमित्ताने दिसू लागली आहेत. अजून सत्काराचा कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर झाला नाही. तो जाहीर झाल्यानंतर सेनेची काय भूमिका असेल हे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्थात भाजपने सर्वपक्षीय सत्काराची तयारी चालवली आहे. परंतु सत्कार सर्वपक्षीय झाला तरी श्रेय मात्र भाजपलाच जाईल, याची खबरदारी त्यांच्याकडून घेतली जाणार आहे. आम्ही यासाठी काय प्रयत्न केले, हे जनतेला माहिती आहे, यासाठी आम्हाला जाहीर कार्यक्रम घेण्याची गरज नाही. त्यांनी पूर्वी यासाठी काहीच केले नाही. म्हणूनच त्यांच्यावर जाहीर कार्यक्रम घ्यायची वेळ आली आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट होत असल्याचे खैरे म्हणाले.

संघाने काय सांगितले हे लक्षात ठेवा
भाजपने या निर्णयाचे श्रेय घेतल्याने खासदार खैरे कमालीचे संतप्त झाले होते. 'मी केले, मी केले, असे सांगू नका' असे संघानेच सांगितले आहे. तरीही भाजपवाले मी केले, मी केले असे सांगू लागले आहेत. हे चुकीचे आहे. भाजपने फक्त निर्णय घेतला आहे. आधीची पेरणी आम्हीच करून ठेवली होती, याचा विसर त्यांना पडल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरातींसाठी पैसे आले कोठून?
श्रेय घेण्यासाठी सावे व भाजपच्या चमूने पानभर जाहिराती दिल्या. यासाठी पैसे आले कोठून, असा सवाल खैरे यांनी केला. या जाहिरातींवर लाखो रुपये खर्च झाले. तेवढे पैसे जनतेच्या कामासाठी खर्च करता आले असते, असेही ते म्हणाले.

अजून बोलणे झाले नाही
याबाबत मुख्यमंत्र्यांशी अजून बोलणे झाले नाही. परंतु १०० कोटींच्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी ते शहरात येत आहेतच, तर ३ तारखेला त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे नियोजन आहे. - अतुल सावे, भाजप आमदार.

X