आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालयांत शुकशुकाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांत त्याचा तीव्र परिणाम दिसून आला. कुठलेही कामकाज झालेच नसल्याने जनतेची गैरसोय झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर लागलीच घरी गेल्याने दिवसभर सर्वच कार्यालयांना कुलूप लावलेले असल्याचे चित्र दिसून आले. 


सातवा वेतन आयोग लागू करावा, फरक त्वरित द्यावा, जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागण्यांसाठी तीन दिवसीय संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी काही प्रमाणात कार्यालयात अालेले कर्मचारी दुसऱ्या दिवशी मात्र तासाभराचा कालावधी वगळता फिरकलेच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली. वाहनचालक, शिपाई कोणीही नसल्याने स्वत: वाहन चालविण्यासह चहापाणी घेण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. दुसऱ्या दिवशी महसूल विभाग, कोषागार विभागातील सर्वच कर्मचारी संपावर असल्याचे चित्र दिसून आले. बंद यशस्वी झाल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासनानेही काम नाही तर दाम नाही ही भूमिका राबवित कुठलीही रजा मंजूर केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 


समाजकल्याणमध्ये १०० टक्के सहभाग 
शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदविला. बुधवारी (दि. ८) झालेल्या आंदोलनात नाशिक-पुणे रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय संकुलातील प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली. 

बातम्या आणखी आहेत...