आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी मराठवाडा बनले ‘रेशीम कोष’ उत्पादनाचे आदर्श मॉडल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हमखास उत्पन्नाबरोबरच ५४ लाख मनुष्य दिवस उपलब्ध झाला रोजगार

संतोष देशमुख 

औरंगाबाद- सततच्या दुष्काळात मराठवाड्यात तुतीची शेती फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे लागवड क्षेत्र १० पटीने वाढले असून मराठवाड्यासह राज्य रेशीम कोष उत्पादनाचे आदर्श मॉडल बनले आहे. उत्पादकांच्या आर्थिक उन्नती बरोबरच ५४ लाख मनुष्य दिवस रोजगार देखील मिळाला. कर्नाटकच्या धर्तीवर जालना व पूर्णा येथे कोष खरेदी विक्री मार्केट आणि प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. 

मराठवाड्यात पाण्याची गंभीर समस्या  आहे.  शेती व शेतकऱ्यांची उन्नती साध्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासन  प्रयत्न करत आहेत.  २०१४ मध्ये राज्यात केवळ ४ हजार ७०५ शेतकरी ५ हजार ९७१ एकरावर रेशीम शेती पिकवत होते. त्यापैकी ११७७ शेतकरी व १५९० एकर क्षेत्र मराठवाड्याचे होते. दुष्काळातही रेशीम कोष उत्पादन चांगले आले. बाजारात दर चांगले मिळाले. त्यामुळे गत पाच वर्षांत मराठवाड्याचे तुती लागवड क्षेत्र ११ हजार ७८२ एकरावर पोहोचले आहे. तीन पटीने रेशीम कोष उत्पादनात वाढ झाली. हे विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत अाहे. औरंगाबाद जिल्ह्यातील केकत जळगाव, आडगाव ठोंबरे, पिंपळगाव गांगदेव, विहामांडवा  रेशीम शेतीचे हब बनल्याची नोंद स्थानिक ते राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.
 
२०१४-१५ : औरंगाबाद जिल्हा  ४२४ शेतकरी,५५६ एकर लागवड क्षेत्र, ३६ मेट्रिक टन रेशीम कोष उत्पादन.  
 
मराठवाडा : ११७७ शेतकरी, १५९० एकर क्षेत्र, ६७१ मे. टन कोष उत्पादन 


राज्य : ४ हजार ७०५ शेतकऱ्यांनी ५ हजार ९७१ एकरावर तुती लागवड केली होती. यातून १३१९ मेट्रिक टन कोष उत्पादन. 


२०१८-१९ : औरंगाबाद जिल्हा  १९८४ शेतकरी, २ हजार २२ एकर (२०१४,१५ च्या तुलनेत ४ पटीने वाढ) लागवड क्षेत्र, १३५ मेट्रिक(९९ मेट्रिक टन उत्पादनात वाढ ) टन उत्पादन


मराठवाडा : १० हजार ३०९ शेतकरी, ११३७२ एकर क्षेत्र, १८०२ मेट्रिक टन कोष उत्पादन. राज्यातील १८ हजार १६० शेतकरी, १९ हजार ७८२ एकरावर तुती लागवड केली. ३२३० मेट्रिक टन उत्पादन मिळाले. 

औरंगाबादेत रेशीम उद्योग प्रशिक्षण सेंटर

रेशीम विभागाचा प्रस्तावावर जिल्हाधिकारी उदय चौधरी, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वेगात काम करून सावंगी बायपासवर २५ एकर जागा दिली. तसेच अंडपूंज निर्मिती, चॉकी निर्मिती, धागा निर्मिती व प्रशिक्षण सेंटर उभारण्यास मान्यता देऊन २७ कोटी रुपये मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून तो अंतिम टप्प्यात आहे. या जागेला २३ लाख रुपयांतून फिनिशिंग कंपाउंड बसवण्याचे काम सुरू आहे. ३० हजार तुतीची झाडे लावण्यात आली. 

अडीच पटीने वाढला रोजगार
तुती लागवडीमुळे शाश्वत उत्पन्न मिळते. याच बरोबर बेराेजागारांच्या हाताला वर्षभर काम उपलब्ध होते. २०१४,१५ मध्ये २२ लाख मनुष्य दिवस काम उपलब्ध झाले होते. त्यात पाच वर्षांत अडीच पटीने वाढ होऊन ५४ लाख मनुष्य दिवस काम मिळाले. 

मार्केट व दर 

  • जालना, पूर्णा येथे कोष खरेदी विक्रीचे मार्केट सुरू झाले आहे.
  • जालन्यात कोष प्रक्रिया कारखानाही सुरू झाला आहे.
  • सरासरी ४०० रुपये प्रति किलो प्रमाणे कोष विक्री होतात.
  • दर्जेदार कोष ५०० ते ७०० रुपये दरानेही विक्री झाले आहेत.
  • औरंगाबादेत लवकरच एमजीएम केव्हीके धागा निर्मिती कारखाना सुरू करत आहे. त्यामुळे मागणी व दरही वाढतील.

संजीवनी देणारे पीक


रेशीम शेतीतून एकरी १ लाख २० हजारापर्यंत शाश्वत उत्पन्न मिळाले. त्यामुळे ९ एकरांवर तुती लागवडीला महत्त्व दिले होते. मात्र, गती वर्षीच्या अतिदुष्काळामुळे ३ एकरांवरील तुती कमी करावी लागली. सहा एकरवर तुती यंदा बहरली आहे. याचबरोबर चॉकी सेंटर सुरू केले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती संजीवनी देणारी ठरत आहे. संतोष वाघमारे, रा. विहमांडवा, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद.

असे मिळते अनुदान

नर्सरी तयार करणे १ लाख ५० हजार, तुती लागवड ५० हजार, शेड उभारणे १ लाख ६८ हजार, कीटक संगोपन साहित्य ७५ हजार आणि धागा निर्मिती केंद्रासाठी १८ लाख रुपये अनुदान मिळते. इतर वर्गासाठी ७५ टक्के आणि एससी व एसटीकरिता ९० टक्के अनुदानाची तरतूद आहे. अल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीच अनुदानाची तरतूद आहे. त्याचा राज्यातील १० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याची नोंद रेशमी विभागाने घेतली आहे. 

दुसऱ्याच वर्षी एकरी उत्पन्न वाढते

पहिल्या वर्षी १ लाख २० हजार रुपये उत्पन्न मिळते. दुसऱ्या वर्षांपासून एकरी २ लाखांवर उत्पन्न मिळायला सुरुवात होते. १५ वर्षांपासाठी एकदाच लागवड करावी लागते.   कीड व रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने कीटकनाशक फवारणीचा खर्च शून्य आहे. कमी व जास्त पाऊस, पावसातील खंड आदी बदलत्या हवामानात तग धरणारे कमी पाण्यात येणारे पीक आहे.  

यंदा दीड पटीवर वाढणार तुती लागवडीचे क्षेत्र

तुती लागवडीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, रेशीम विभाग व सरकारच्या वतीने गावोगाव जनजागृती अभियान राबवले जात आहे. नवीन हंगामासाठी ६ हजार शेतकऱ्यांनी रेशीम व कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे.  पोखरा योजनेमुळे दीड ते दुपटीवर लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा विश्वास संचालक डॉ. दिलीप हाके यांनी व्यक्त केला. 
 

बातम्या आणखी आहेत...