Birth Anniversary : / Birth Anniversary : पैसा कमावण्साठी तीन शिफ्टमध्ये करायची साऊथची ही बोल्ड अॅक्ट्रेस, या कारणामुळे गळफास घेऊन केली होती आत्महत्या

Dec 02,2018 12:34:00 AM IST

मुंबई: 2011मध्ये रिलीज झालेला विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. आज सिल्क आपल्यात असती तर तिने वयाची 58 वर्षे पूर्ण केली असती.


ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिताची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला होता. तिचे बालपणीचे नाव विजयलक्ष्मी होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत तिचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्कने सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून स्मिताही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होती.

एका ब्रेकने उजळले होते नशीब

स्मिताला 1978 मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' (1979) सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात तिने स्मिताचे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, तिने मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने तिला सिल्क स्मिता नाव मिळाले. 1983मध्ये तिने 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये तिने जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केले.

पैसे कमावण्यासाठी तीन शिफ्टमध्ये करायची काम
सिल्कची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती. तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी 3-3 शिफ्टमध्ये काम करत होती. ती एका गाण्यासाठी 50 हजार रुपये मानधन घेत होती. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून तिने 10 वर्षांमध्ये जवळपास 500 सिनेमांमध्ये काम केले.

बॉलिवूडमध्ये केली होती एन्ट्री
सिल्कच्या यशाची जादू बॉलिवूडमध्येसुध्दा चालली होती. जितेंद्र-श्रीदेवी आणि जितेंद्र-जयाप्रदा यांची जोडी लोकप्रिय झालेली असताना स्मिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. तिने 'जीत हमारी' सिनेमातून बी-टाऊनमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही' आणि 'विजय पथ'सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केले होते.

निर्माती बनून झाला होता कोटींचा तोटा
सिनेमांममधून कोटींची केल्यानंतर स्मिताने निर्मितीत हात आजमावला. निर्माती झाल्यास खूप पैसा कमावशील, असा सल्ला तिला तिच्या एका मित्राने दिला होता. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये तिला दोन कोटींचा तोटा झाला. तिचा तिसरा सिनेमा निर्माती म्हणून पूर्णच होऊ शकला नाही. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला. ती मानसिकरित्या खचून गेली होती.

गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा
23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क स्मिताचा मृतदेह तिच्या राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिच्या आत्महत्येच्या बातमीने दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. 18 वर्षे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्रीने रहस्यमयरित्या या जगाचा निरोप घेतला.

X