आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलमल की गोली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोष्ट तशी बरीच जुनी आहे. 1990 ते 2000 मध्ये मी सिडको एन- 7 भागात राहत होतो. माझे एक पाटील नावाचे मित्र होते. त्यांचे ‘महाराष्‍ट्र मेडिकल स्टोअर्स’ हे दुकान होते. त्यांना भेटायला म्हणून मी अनेकदा त्यांच्या दुकानावर जात असे. जवळच काही डॉक्टरांचे दवाखाने असल्यामुळे दुकानात ग्राहकांचा सतत राबता असे. अशा वर्दळीतही एकीकडे त्यांचे काम आणि दुसरीकडे आमच्या गप्पाटप्पा सुरू असत. औषधाच्या दुकानात आलेले प्रत्येक गि-हाईक एक तर स्वत: पेशंट असे अथवा नातेवाइकाकरिता औषध घेण्यासाठी आलेले. त्यामुळे त्या ठिकाणी बसल्यानंतर मला ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीची ख-या अर्थाने प्रचिती आली. रीतसर डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन औषध नेणारे तिथे येत, तसे औषधांची रिकामी खोकी, त्यावरील लेबल, गोळ्यांच्या जीर्ण झालेल्या स्ट्रिप्स दाखवून औषधाची मागणी करणारेही नागरिक दुकानावर येत. त्याचबरोबर डॉक्टरकडे जाण्याचे टाळून आपल्याला होणारा त्रास किंवा प्रकृतीची लक्षणे सांगून थेट औषधाची मागणी करणारे, दुकानदाराच्या सल्ल्याने औषध घेणारे नागरिकही मला तिथे भेटले. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या पूर्ण डोसऐवजी उपलब्ध पैशात सर्व औषधी घेण्याच्या इराद्याने काही गरीब लोक आल्यावर गणित आणि फार्मसीचे ज्ञान या दोन्ही गोष्टींचा मेळ बसवण्यात पाटील यांचे कसब पणाला लागत असे. तुमच्याकडे आल्यावर आमचे अर्धे दुखणे पळून जाते, अशी पाटलांच्या स्वभावाला दिलखुलास दाद देणारे लोकही होते. एकदा मात्र मजेशीर किस्सा घडला. एक जण घाईघाईत येऊन म्हणाला, ‘जरा मलमल की गोली देना.’ ते ऐकून पाटील लगेच म्हणाले, ‘मलमल के कुर्ते के बारे में सुना था, मलमल के गोली के बारे में मुझे कुछ पता नहीं.’ त्यांचे उत्तर ऐकून त्या व्यक्तीलाही हसू फुटले. त्याने ‘मला मळमळ होत आहे, ती थांबेल अशी गोळी द्या, प्लीज,’ असे मायमराठीत स्पष्टीकरण दिले. त्या वेळी मला उगाचच ‘मलमली तारुण्य माझे’ या गाण्याची क्षणभर आठवण झाली.