आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चांदी बाजाराला मंदीची झळ; नाशकात ४५ पैकी ४० कारखाने बंदच्या मार्गावर, चांदीवरील आयात कर आणि जीएसटी महागडा

एका वर्षापूर्वीलेखक: अनिरुद्ध देवचक्के
  • कॉपी लिंक

नाशिक  - प्राचीनकाळापासून जगप्रसिद्ध असलेली नाशिक घाटाची चांदीची भांडी आणि वस्तू बनवणारे शहरातील ४५ पैकी ४० कारखाने आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कराचा वाढीव बोजा, चांदीचे वाढलेले दर आणि बाजारातील मंदीचा फटका या उद्योगातील सुमारे दाेन हजारपैकी एक हजार कारागिरांना बसला आहे. अनेकांच्या हाताला कामच उरलेले नसल्याने दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची भ्रांत त्यांच्यासमोर आहे.

जवळपास ३५० वर्षांपूर्वी मराठा कालखंडात नाशिक घाटाची चांदीची भांडी बनवण्याचे काम सुरू झाले. शुद्ध चांदीचा वापर करून नाशिक घाटाची भांडी घडवली जातात. शहरात ४० ते ४५ असे कारखाने असून दाेन हजार मजूर त्यात काम करत, मात्र आज जवळपास ४० कारखाने बंद पडण्याच्या स्थितीपर्यंत आले आहे. नाेटबंदी, जीएसटीचा सामना करत असतानाच चांदीचे भाव प्रति किलाेला ४७,५००  रुपयांपर्यंत गेल्याने एेन हंगामात अनेक कारागीर बसून आहेत.
 

चांदीवरील आयात कर, जीएसटी महागडा
चांदी खरेदी करताना आता तीन टक्के जीएसटी माेजावा लागताे. जीएसटीपूर्वी १.२ % व्हॅट हाेता. आयात शुल्कातही विद्यमान सरकारने वाढ केली. पूर्वी १० टक्के आयात शुल्क माेजावा लागत हाेता. ताे आता १२.५ टक्के आकारला जाताे.
 

क्लस्टररूपी दिलासा गरजेचा
या कारागिरांसाठी सरकारने मूलभूत याेजना राबवाव्यात किंवा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. स्वतंत्र क्लस्टरची गरज आहे. स्थिती कायम राहिली तर नाशिकची आेळख पुसली जाण्याची भीती आहे. - चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ असाेसिएशन 
 

कारागिरी लुप्त हाेण्याची भीती 
नाशिकची चांदी भांडी आणि कलाकुसर प्रसिद्ध आहे. मात्र, आजपर्यंत कधीही न पाहिलेली मंदी पाहायला मिळत आहे. याचा फटका आमच्यासारख्यांना बसला असून असेच राहिले तर कालांतराने ही कारागिरी लुप्त हाेण्याची भीती आहे. 
- गजानन गंगावते, चांदीचे कारागीर 
 

सोेने कारागिरांनाही फटका :
नाशकात पाच हजारांच्या आसपास बंगाली कारागीर साेन्याची कलाकुसर, घडणावळीसाठी प्रसिद्ध आहेत, मात्र साेन्याचे दरही ४० हजारांच्या आसपास गेल्याने या कारागिरांचे कामही घटले आहे, काहींकडे तर कामच नाही, त्यामुळे त्यांनीही मूळ गावचा रस्ता धरल्याचे चित्र आहे.
 

औरंगाबादेतही फटका : ७०% कारागीर मूळ गावी परतले
सोन्याचांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली. यामुळे ग्राहकांची संख्या घटली आहे. औरंगाबादेत अनेक वर्षांपासून सराफा बाजारात जवळपास ८०० कारगीर काम करत होते. आता फक्त २०० उरले आहेत. ते गावाकडे परतले आहेत. ७० टक्के कारागिरांच्या हाताला काम नसल्याने ते गावाकडे जात आहेत. सणाच्या तोंडावर सोने-चांदीची बाजारपेठ बहरते. साडेतीन मुहूर्तांना आता सुरुवात होणार आहे. अशा वेळी सोन्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. एकीकडे पाऊस नाही, दुसरीकडे किमतीत वाढ व घटलेली मागणी यामुळे  स्थलांतराचीच वेळ आली आहे.
- नरेंद्र गिलडा, सोने व्यापारी औरंगाबाद

0