आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीपूजनावेळचं ‘सरप्राइज’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीमंतिनी काळे

मधुरिमाच्या या दिवाळी विशेषांकासाठी पहिल्या दिवाळीची नवऱ्याला भेटण्याची हुरहुर शब्दबद्ध केलीय एका ७९ वर्षांच्या आजींनी. त्यांनी आठवणींना दिलेला हा उजाळा... 
 
आता वयाच्या ७९ व्या वर्षी मागे वळून पाहताना अनेक प्रसंग आठवतात.साठ ते सत्तरच्या दशकातील एक आठवण! आम्ही येवला, जिल्हा नाशिक येथे राहत होतो एकत्र कुटुंबात. पती मोठे होते.आर्थिक परिस्थिती साधारण  होती. पती नुकतेच शासकीय नोकरीत लागले होते. बदली कोकणात झाली होती त्यामुळे तिथे ते एकटेच राहत. दरमहा मनिऑर्डर पाठवत. 

तेव्हा खुशाली कळण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे पोस्टकार्ड! पत्र येत असे बाकी फोन वगैरे प्रकार नव्हते. त्या वर्षी दिवाळीचा महिना.  पत्र आले. त्यात काही कारणामुळे येणे शक्य नाही असा उल्लेख होता. पैसे एका व्यक्तीबरोबर पाठवत आहे, अमुक दिवशी मिळतील हेही त्या पत्रात सांगितले होते. आमची दिवाळीची तयारी सुरू झाली. पूर्वी आजच्याइतका डामडौल, भपका नव्हता. पण आहे त्यात आनंद मानून सणवार साजरे होत. घरातील सर्वांना कपडे वगैरे खरेदी केले जायचे. त्या दिवाळीसाठी काही गोष्टी उधारीवर आणल्या होत्या. पण ठरल्याप्रमाणे पैसे घेऊन कोणी आले नाही. आम्ही वाट पाहत होतो. अगदी लक्ष्मीपूजन दिवस उगवला, पण कोणीच आले नाही. आता काय करावे? इतक्यात स्वतः पती ऐन दुपारी घरी आले. सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी खुलासा केला, सुटी मिळत नव्हती. दोन दिवसांत येऊन जाणे शक्य नव्हते. पण अचानक साहेबांनी सुटी मंजूर करून लगेच जाण्यास सांगितले. मग कोकणातून मिळेल त्या वाहनाने कोल्हापूरमार्गे येवल्याला आले. लक्ष्मीपूजनाची सुटी असल्याने त्यांचे राहणे झाले. दिवाळीसाठी लागणारे पैसे पती स्वतःच घेऊन आले होते. दिवाळी साजरी झाली. नंतर काही महिन्यांनी आम्ही कोकणात राहण्यास गेलो. आयुष्याच्या या प्रवासात अनेक दिवाळ्या साजऱ्या झाल्या. आता वृद्धापकाळात या गोष्टी आठवून नकळत डोळ्यात पाणी येते. पूर्वीचे दिवस काही वेगळेच होते.आणि एकत्र कुटुंबातील साजरे होणारे सणवार यातून मिळणारा आनंद ते प्रसंग अजूनही मनात आहेत.

लेखिकेचा संपर्क : (०२५३)२३६५३२३

बातम्या आणखी आहेत...