आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेच्याचा स्वाद आवडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी आम्हा 8 मित्रांचा समूह अमरनाथला भोलेनाथाच्या दर्शनासाठी गेलो होतो. प्रत्येक नागरिकांनी एकदा तरी अमरनाथला जाऊन यावे, असे म्हटले जाते. औरंगाबाद ते दिल्लीपर्यंतचा आमचा प्रवास रेल्वेने झाला. दिल्लीपासून पुढे अमरनाथ-वैष्णोदेवी दर्शनाला गेलो, यासाठी एका यात्रा कंपनीकडून पॅकेज घेतले होते. या कंपनीच्या दोन ट्रॅव्हल्स बसमध्ये 60 यात्रेकरूंचा समावेश होता. यामध्ये आम्ही महाराष्‍ट्रीयन फक्त आठ जणच होतो. यात्रा दिल्लीहून पंजाब प्रांतात गेली. तेथूनच यात्रेचा खरा आनंद मिळत गेला. पंजाबमध्ये मोठमोठी भाताची शेतं, गव्हाचे हिरवेगार मळे आणि चोहोबाजूने पाणी पाहून मन खरोखरच उल्हासित झाले. आमचा प्रवेश जम्मू-काश्मीरमध्ये झाला. तेथे तैनात असलेल्या चेकपोस्टवर भारतीय जवान पाहून आमचा ऊर अभिमानाने भरून आला. रस्त्यात जागोजागी भाविकांसाठी भंडारे आणि सुरक्षेसाठी सशस्त्र सैनिक व्यवस्थेत होते.

आजूबाजूचे डोंगर आणि त्यातून खळाळत वाहणारे पांढरेशुभ्र पाणी पाहून मन प्रसन्न होत होते. काश्मीरमध्ये पहलगामपासून अमरनाथपर्यंत 28 किलोमीटर अंतराची आमची पायी यात्रा सुरू झाली. पहिला दिवस पावसात गेला. संध्याकाळी 6 वाजता संगमावर पोहोचलो, तेव्हा तेथील तापमान 0 अंश सेल्सियस होऊ लागले. दुस-या दिवशी तशाच वातावरणात यात्रेचा पुढचा टप्पा सुरू झाला. दुपारी अमरनाथला पोहोचलो. भोलेनाथाचे दर्शन घेतले. या यात्रेदरम्यान आम्ही थकून गेल्याने तसेच आम्हा सर्व मित्रांना ताप आल्याने हेलिकॉप्टरने पहलगामला पोहोचलो. हॉटेलवर गेलो, पण काश्मिरी जेवण आवडले नाही. आमच्याबरोबर असलेले रामूमामा यांनी घरून एका डब्यात हिरव्या मिरच्याचा ठेचा आणला होता. झणझणीत ठेचा पाहून सर्वजण तुटून पडलो. आमच्यासोबत असलेल्या दिल्लीच्या यात्रेकरूंनी आमच्या ठेच्याचा स्वाद घेतला. ठेच्याच्या स्वादाची त्यांनी स्तुती केली. काश्मीरमध्ये झणझणीत ठेच्याचा स्वाद घेताना आपल्या महाराष्‍ट्रची खूप आठवण येत होती..!