Badminton / आठ महिन्यांनंतर सिंधू फायनलमध्ये; आता यामागुचीविरुद्ध झुंजणार, चेन फेईचा २१-१९, २१-१० ने पराभव़

फायनलमध्ये जपानच्या यामागुचीच्या आव्हानाचा सामना

वृत्तसंस्था

Jul 21,2019 08:25:00 AM IST

जकार्ता-जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेली बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यंदाच्या सत्रात आपल्या पहिल्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिने शनिवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. तिला तब्बल आठ महिन्यांनंतर अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला होता. तिने गतवर्षी वर्ल्ड टूर फायनलचा किताब पटकावला होता.


आता पाचव्या मानांकित सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात चीनच्या चेन यु फेईचा पराभव केला. तिने २१-१९, २१-१० अशा फरकाने सामना जिंकला. दोन्ही गेममधील आक्रमक खेळीच्या बळावर तिने अवघ्या ४६ मिनिटांत एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह तिने फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला. या सामन्यातील पराभवाने दुसऱ्या मानांकित चेन फेईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे तिचे किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले.


आता यामागुचीचे आव्हान : पाचव्या मानांकित सिंधूला आता जेतेपदाचा बहुमान मिळवून देण्यासाठी फायनलमध्ये जपानच्या यामागुचीच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. मात्र, तिच्याविरुद्ध सिंधूचे विजयाचे रेकाॅर्ड १०-४ असे आहे. सिंधूने सलग चार सामन्यांत यामागुचीला पराभूत केले होते. तसेच तिने वर्ल्ड टूर फायनलमध्येही यामागुचीवर मात केली होती. त्यामुळे आता पुन्हा विजयाचा कित्ता गिरवत विजेतेपदाचा बहुमान मिळवण्याचा सिंधूचा प्रयत्न असेल.

X
COMMENT