आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकतीस लाखांचे बक्षीस असलेल्या सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : नक्षलवादीविरोधी अभियानाला मंगळवारी मोठे यश आले. चळवळीत होणारी पिळवणूक आणि दुसरीकडे पोलिसांचा सासेमिरा या प्रकारांना कंटाळलेल्या सहा जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या सहा नक्षलवाद्यांमध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांच्यावर एकूण ३१ लाखांची बक्षिसे होती, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये संदीप ऊर्फ महारू चमरू बडे (३०) हा जहाल माओवादी कमांडर पदावर कार्यरत होता. फेब्रुवारी २००९ मध्ये संदीप हा कसनसूर दलमचा सदस्य म्हणून दाखल झाला. २०११ पासून त्याच्याकडे कमांडर म्हणून जबाबदारी होती. त्याच्यावर चकमकीचे १७, खुनाचे ४, जाळपोळीचे ७, अपहरणाचे २ गुन्हे दाखल असून राज्य शासनाने त्याच्यावर ६ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पण करणाऱ्या महिलांमध्ये मनीषा ऊर्फ बाली ऊर्फ गंगाबाई जगनुराम कुरवामी (३०) ही डिसेंबर २००३ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून दाखल झाली होती. त्यानंतर २००४ पासून ती कसनसूर दलमच्या सदस्यपदी कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ९, खुनाचा १ व जाळपोळीचे २ गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर ५ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. स्वरूपा ऊर्फ संथिला ऊर्फ सरिता सुकलु आतला (२३) ही ऑगस्ट २०१४ मध्ये चातगाव दलम सदस्य म्हणून दाखल झाली होती. ती जून २०१६ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत टिपागड दलममध्ये कार्यरत होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ ते आजपर्यंत ती प्लाटून क्र. ३ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ६ व खुनाचे ४ गुन्हे दाखल असून राज्य शासनाने तिच्यावर ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. अनी ऊर्फ मिला मोतीराम तुलावी (वय २५) ही एप्रिल २००८ ला गट्टा दलमची सदस्य म्हणून कार्यरत होती. त्यानंतर २०१४ ते २०१९ पर्यंत ती कंपनी क्र. ४ च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावरही चकमकीचे १४, खुनाचे ५ व जाळपोळीचे ३ गुन्हे दाखल आहेत. राज्य शासनाने तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ममिता ऊर्फ ममता जन्ना राजू पल्लो (२०) ही सन २०१६ मध्ये चामोर्शी दलममध्ये दाखल होऊन फेब्रुवारी २०१७ नंतर कंपनी क्र. ४ च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ३, तर जाळपोळीचा १ गुन्हा दाखल आहे. शासनाने तिच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

तुलसीवर होते पाच लाख रुपयांचे बक्षीस

तुलसी ऊर्फ मासे संतु कोरामी (२४) ही २०१० मध्ये कसनसूर दलममध्ये दाखल झाली होती. त्यानंतर मार्च २०१० ते आतापर्यंत ती कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर ६ चकमकीचे गुन्हे दाखल असून शासनाने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण हे नक्षल विरोधी अभियानातील मोठे यश असल्याचा दावा गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केला. चळवळीत होणारी पिळवणूक व पोलिसांच्या दबावामुळे या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सहभागी होऊन शांततामय जीवन जगण्याचा निर्णय घेतला, असाही पोलिसांचा दावा आहे.

या वर्षात तब्बल २९ जणांची शरणागती

सन २०१९ मध्ये आतापर्यंत एकूण २९ माओवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. यात ३ विभागीय सदस्य, २ दलम कमांडर, १ दलम उपकमांडर, २२ सदस्य, एक समर्थकाचा समावेश आहे. २१ नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. २००५ ते आजपर्यंत एकूण ६३३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे यांनी या वेळी दिली.