प्रयागराज येथे नाव / प्रयागराज येथे नाव उलटून मराठवाड्यातील सहा जणांचा मृत्यू, चौघे जखमी; अस्थिविसर्जनासाठी गेले होते बैस कुटुंबीय व नातेवाईक

Dec 12,2018 11:25:00 AM IST

नांदेड- उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे मनकामेश्वर मंदिराजवळील सरस्वती घाटावर नाव उलटून मराठवाड्यातील ६ जणांचा मृत्यू झाला. अहमदपूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील व्यक्तींचा मृतांत समावेश आहे. चौघे जण जखमी झाले. दोघे जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. नायगाव तालुक्यातील (जि. नांदेड) कोलंबी येथील लोकांसह त्यांचे नातेवाईक मिळून १४ जण अस्थिविसर्जनासाठी प्रयागराजला गेले होते. सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी बैैस कुटुंबीयांसह इतर नातेवाईक, संबंधित असे १४ जण प्रयागराज येथे गेले होते. अस्थिविसर्जनानंतर नावेतून परतत असताना सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान प्रवाहाच्या मध्यभागी नाव उलटली. या दुर्घटनेत दिगंबर रामराव बैस (६५), बालाजी दिगंबर बैस (५०, दोघेही रा. कोलंबी), देविदास नारायण कच्छवे (५५, रा. अहमदपूर), भागाबाई बळीराम (६५), राधाबाई केशव कच्छवे (५५), लक्ष्मीबाई केशवराज (५५, सर्व रा. परभणी) या सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सुनीता देविदास कच्छवे (५०), अंगद नारायण कच्छवे ( ४७, दोघे रा. अहमदपूर), ज्योती बालाजी बैस (४५, रा. कोलंबी), केशव धनबा कच्छवे (७०, रा. दैठणा, परभणी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रयागराज येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह कोलंबी येथे आणण्यासाठी काय मदत करता येईल, याचाही प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केला. त्यासाठी त्यांनी थेट पीएमओ कार्यालयाशी संपर्क साधला.

दोघे जण अजूनही बेपत्ता, इतर दोघांना वाचवण्यात यश

रमाकांत दिगंबर बैस (४०, रा. कोलंबी)आणि भोजराज घनश्याम (७०, रा. गंगाखेड) हे दोघे अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती प्रयागराज जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना कळवली आहे. या दुर्घटनेतून मनोहर माणिकराव बैस (३२, रा. कोलंबी ) आणि मीनाक्षी रोशन पटवार (३८, रा. ब्रह्मपुरी, जि.चंद्रपूर ) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

X