आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींसोबत असू शकतात हे सहा दिग्गज नेते, कोण सांभाळणार सर्वात महत्त्वाची मंत्रालये?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालाआधीच भाजप मुख्यालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या निरोपाच्या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाचे गठन करताना ५०-६० टक्के बदल करण्याचे संंकेत दिले आहेत. आता मोदींसोबत ६ महत्त्वाच्या पदांवर कोण येणार हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. त्यात गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांशिवाय भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा सभापती या पदांचा समावेश आहे. अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सर्वोच्च चार पदांमध्ये समावेश होण्याची शक्यता कमीच आहे. सुषमा स्वराज तर सध्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नाहीत. सुमित्रा महाजन यांनी निवडणूक लढवली नसल्याने लोकसभा सभापती पदही रिक्त होणे निश्चित आहे.


अमित शहांच्या नावाची चर्चा गृहमंत्री किंवा अर्थमंत्री या पदासाठी होत आहे, पण ते सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे. संघ आणि पक्ष स्तरावरही ही चर्चा सुरू आहे की, शहांनी सध्या मंत्रिमंडळात जाऊ नये, कारण पक्षाच्या घटनेनुसार सध्या त्यांना तीन वर्षांचा आणखी एक कार्यकाळ मिळू शकतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्ष संघटनेत ते मोदींनंतर सर्वात शक्तिशाली आहेत आणि मंत्री-मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकक्षेत येतात.
लोकसभा सभापतिपदासाठी संतोष गंगवार सर्वात जास्त आठ वेळा खासदार असल्याने मोदींची पसंती ठरू शकतात. जर शहा-मोदींच्या मंत्रिमंडळात गेले तर ज्याचा मोदी-शहांशी समन्वय उत्तम असेल, अशा चेहऱ्याचा शोध अध्यक्षपदासाठी सुरू आहे. कारण सरकार आणि संघटना यांची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या या दोघांच्याच हाती असणार आहे. वाजपेयी-अडवाणींच्या वेळी जेव्हा एनडीए सत्तेत होता तेव्हा बंगारू लक्ष्मण, जनकृष्णमूर्ती आणि व्यंकय्या नायडू यांच्याकडे भाजप अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. या वेळीही तसेच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आता व्यक्त करण्यात येत आहे.
 

 

६ महत्त्वाच्या पदांसाठी या ९ नेत्यांमधून होऊ शकते निवड

1. गृह मंत्रालय : राजनाथ सिंह किंवा अमित शहा यांची नावे
राजनाथ सिंह ज्येष्ठतेमुळे या मंत्रालयात कायम राहू शकतात. त्यांची संघाच्या ज्येष्ठ नेत्यांशी अनौपचारिक चर्चाही झाली आहे. या विभागासाठी अमित शहांच्या नावाचीही चर्चा आहे. पण जे मंत्रालय जनतेशी थेट जोडलेले आहे असे मंत्रालय शहांना आवडते. त्यांचे निकटवर्तीय सांगतात की, शहा जेव्हा गुजरातमध्ये गृह राज्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी आपल्याला ग्रामीण विकास मंत्रालय द्यावे, असे मोदींना म्हटले होते.

 

 

2. अर्थ मंत्रालय : पीयूष गोयल, अमित शहा, नितीन गडकरी
पीयूष गोयल प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी अंतरिम बजेटही सादर केले होते. अर्थ मंत्रालय सांभाळले आहे. गोयल हे मोदी-शहांचे विश्वासू मानले जातात. सरकारचे प्राधान्य आर्थिक आघाडीवर यश मिळवणे हे असल्याने स्वत: अमित शहांची पसंती अर्थ मंत्रालयाला असल्याची चर्चा आहे. त्यासाठी ते जबाबदार नाव आहे. या विभागासाठी नितीन गडकरींच्या नावाचीही चर्चा आहे.

 

3. संरक्षण मंत्रालय : शहा, राजनाथ यांच्या नावाची चर्चा
या विभागासाठी अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या नावावर विचार होत आहे. गृहमंत्री म्हणून राजनाथ यांना अंतर्गत सुरक्षेचे बारकावे माहीत आहेत. त्यांना सीसीएसमध्ये (सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समिती) कायम ठेवायचे असल्याने त्यांच्याकडून गृह विभाग काढून घेतला जाऊ शकत नाही. दुसरीकडे, संरक्षण मंत्रालयात आल्याने शहांना संघटनेच्या कामावर लक्ष देण्यास वेळ मिळेल, ते सध्या त्यांच्यासाठी खूप गरजेचे आहे.
 

4. परराष्ट्र मंत्रालय : निर्मला सीतारमण, स्मृती इराणी
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण नव्या परराष्ट्रमंत्री असू शकतात. अव्वल चार पदांत महिला असावी, असे मोदींना वाटते. त्यामुळे सीतारमण ही त्यांची पहिली पसंती असू शकते. त्यांच्याशिवाय स्मृती इराणींच्या नावाचीही चर्चा आहे. स्मृती इराणींनी मनुष्यबळ विकास, माहिती आणि प्रसारण आणि सध्या वस्त्रोद्योग मंत्रालय सांभाळताना आपली प्रतिभा दाखवून दिली आहे.
 

 

5. लोकसभा सभापती : संतोष गंगवार, राजनाथ सिंह
या पदासाठी राजनाथ यांचेही नाव घेतले जात आहे. पण सर्वात जास्त आठ वेळी यूपीच्या बरेलीचे खासदार संतोष गंगवार यांना योग्य चेहरा मानले जात आहे. गंगवार याआधी वाजपेयी सरकार आणि मोदी सरकारमध्ये मंत्री होते आणि विरोधी पक्षात असताना लोकसभेत मुख्य प्रतोदही होते. ते सौम्य प्रकृतीचे असून कमी बोलतात. सर्वात वरिष्ठ असूनही ते सध्या स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आहेत.
 

 

6. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष : भूपेंद्र यादव, जे. पी. नड्डा
राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा मोदी-शहांशी चांगला समन्वय आहे. वाजपेयी सरकारच्या वेळी संघटनेची सूत्रे दक्षिण भारतीय नेत्यांकडे सोपवल्याने संघटनेत स्थिरता आली होती आणि पक्ष पराभूत झाला होता. या वेळी हिंदी पट्ट्यातून अध्यक्ष करण्याची रणनीती आहे. जगत प्रकाश नड्डांच्या नावाचीही चर्चा आहे. गेल्या वेळीही ते स्पर्धेत होते, पण शहा अध्यक्ष झाले. यूपीचे प्रभारी म्हणून त्यांनी यंदा पक्षाला चांगले यश मिळवून दिले.