आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाॅनवोवन पिशवी बंदीतून वगळा; िनतीन गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात अगोदरच प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचे बारा वाजले आहेत. त्यात आता केंद्रीय परिवहनमंत्री व राज्यातले वजनदार भाजप नेते नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून या बंदीतून 'नाॅनवोवन पिशव्या' वगळण्याची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून राज्याचा पर्यावरण विभागही गडकरी यांच्या पत्राच्या कार्यवाहीसाठी तत्परतेने कामाला लागला आहे. गडकरी यांनी ३१ जुलै रोजी पाठवलेल्या पत्रात 'नाॅनवोवन पिशव्या प्लास्टिक नसून, त्या कापडी पिशव्यांसारख्या आहेत, तरी त्यांना बंदीच्या श्रेणीतून वगळण्यात यावे', अशी मागणी केली आहे. त्या पत्रावर 'तपासून कार्यवाही करावी' असा शेरा मारून मुख्यमंत्र्यांनी ते पत्र तातडीने राज्याच्या पर्यावरण विभागाकडे पाठवले अाहे. 


प्लास्टिक बंदीसंदर्भात राज्यात शक्ती प्रदत्त आणि तज्ज्ञ अशा दोन समित्या कार्यरत आहेत. आॅगस्ट महिन्यात तज्ज्ञ समितीची एक बैठक झाली. त्यात गडकरी यांनी शिफारस केल्यानुसार नाॅनवोवन पिशव्यांवरील बंदी उठवण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच नाॅनवोवन पिशव्यांसंदर्भात मुंबईच्या इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नाॅलाॅजी संस्थेकडे मत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडकरी यांना ११ मे रोजी विदर्भ टेक्स्टाइल्स बॅग्जमेकर्स वेल्फेअर सोसायटीने नाॅनवोवन पिशव्यांसंदर्भात सविस्तर पत्र पाठवले होते. त्यात नाॅनवोवन हे प्लास्टिक नसून वस्त्रोद्योगाचा तो भाग अाहे. तसेच नाॅनवोवन हे समाजासाठी वरदान असल्याचा त्यात दावा केला आहे. त्यानुसार गडकरींनी राज्य सरकारकडे त्यावरील बंदी उठवण्यासाठी पत्र पाठवल्याचे सांगितले जाते. केमिकल टेक्नाॅलाॅजी इन्स्टिट्यूटचा अहवाल काय येतो, त्यावर नाॅनवोवन पिशव्यांना प्लास्टिक बंदीतून सूट मिळणार की नाही, हे ठरणार आहे. मात्र नाॅनवोवन पिशव्या या इको-फ्रेंडली आहेत, असा मोठा समज असून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून त्या सर्रास वापरल्या जाऊ लागल्या आहेत. 


नाॅनवोवन अाहे काय ? 
नाॅनवोवन (पाॅलिप्रोपिलिन) मटेरियलला इंडस्ट्रियल टेक्स्टाइल्स असेही म्हणतात. न विणता ही बॅग बनवली जाते. मात्र ती हुबेहूब कापडाच्या पिशवीसारखी भासते. नाॅनवोवन हा अविघटनशील पदार्थ असल्याचे सरकारनेही प्लास्टिक बंदीच्या अादेशात मान्य केले अाहे. दुसरीकडे, 'या पिशव्यांच्या निर्मितीत नागपूर शहरात तब्बल पाच हजार लाेकांना रोजगार मिळाला आहे. यात बहुसंख्य महिला कार्यरत असून घरच्या घरी हा व्यवसाय केला जातो,' असे विदर्भ टेक्स्टाइल्स बॅग्जमेकर्स वेल्फेअर सोसायटीचे म्हणणे आहे. 


'बायाेडिग्रेडेबल'च्या पिशव्यांचे ७२ दिवसांत विघटन हाेते 
नॉनवोवन पिशव्या 'बायोडिग्रेडेबल' प्लास्टिकपासून तयार करायला हव्यात. या प्लास्टिकचे ७२ दिवसांतच विघटन होते. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये या बायोप्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तेथे त्याचे स्टँडर्डदेखील तयार झाले आहेत. त्यामुळे त्याचा वापर बॅगा तयार करण्यात होऊ शकतो. मात्र, प्लास्टिकच्या बादल्या किंवा ऑटोमोबाइलच्या सुट्या भागांसाठी पेट्रोलियम प्लास्टिक वापरता येईल, कारण ते आपण फेकून देत नाही. ते पुन्हा-पुन्हा रिसायकल करता येते. 
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री 


अधिसूचनेच्या व्याख्येत समावेश 
पर्यावरण विभागाने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली. त्यात प्लास्टिकची सविस्तर व्याख्या आहे. त्या व्याख्येत अविघटनशील अशा २० पदार्थांची नावे आहेत. त्यात 'नाॅनवोवन पाॅलिप्रोपिलिन'चा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...