आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिटी बसच्या तिकीटदरात करता येऊ शकेल स्काय बसमध्ये प्रवास 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-औरंगाबादेत स्काय बस सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ डिसेंबर २०१८ रोजी केली होती. बुधवारी शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत डॉपल मायर या ऑस्ट्रेलियन कंपनीने ही सेवा कशी देता येईल, याबाबत गडकरींच्या उपस्थितीत सादरीकरण केले. यानंतर सिटी बसच्या तिकीट दरात स्काय बसमध्ये प्रवास करता येऊ शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. १२५ वर्षे जुन्या, ६० देशांना स्काय बस पुरवणाऱ्या या कंपनीने गुुगल मॅपिंगद्वारे शहरातील गर्दीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर केेलेल्या सविस्तर सादरीकरणात शहागंज, औरंगपुऱ्यासह अन्य भागातील वाहतुकीचा ताण कमी करता येईल, तसेच नवे-जुने शहर जोडणेही शक्य आहे, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

 

हॉटेल अजंता अॅम्बेसेडर येथे बुधवारपासून ९ व्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस सुरुवात झाली. यानंतर एका हॉलमध्ये स्काय बसबाबत सादरीकरण पार पडले. या वेळी गडकरींसह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त निपुण विनायक यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. १५ दिवसांपूर्वी स्काय बसची घोषणा करणाऱ्या गडकरी यांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी डॉपल मायर या कंपनीचे भारतातील अधिकारी विक्रम सिंघल यांनी कंपनीची माहिती देतानाच स्काय बसबाबत सादरीकरण केले. त्यांनी केलेला औरंगाबाद शहराचा प्राथमिक सर्व्हे दाखवला. शहरात औरंगपुरा, शहागंज ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. रोज होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे या भागात पाय ठेवायलाही जागा नसते. जुने शहर म्हणजे शहागंज व नवे शहर सिडको स्काय बसने जोडता येईल, जुने-नवे शहर स्काय बसने जोडल्यास वाहतुकीची कोंडी कमी होईल, असे सिंघल म्हणाले. त्यांनी स्काय बसच्या केबिनबाबत माहिती देताच आमच्या देशातील प्रवाशांकडे चार-चार बॅगा असतात, त्याचाही विचार करा, अशी कोपरखळी गडकरींनी मारली. 

 

मेक इन इंडियाने कमी होईल खर्च 
गडकरी यांनी खर्चाचा तपशील विचारताच सिंघल म्हणाले, प्रति किलोमीटर ६० कोटींचा खर्च येईल. म्हणजेच वाळूज ते चिकलठाणा या १५ किमीसाठी ९०० कोटी लागतील. त्यावर मेक इन इंडियाद्वारे प्रतिकिमी खर्च ४० कोटींपर्यंत कमी करता येईल, असे गडकरी म्हणाले. 

 

प्रतितास १०० किमी वेग 
सिंघल म्हणाले की, विदेशात आम्ही प्रचंड गर्दीची ठिकाणे स्काय बसने जोडतो. औरंगाबादेत औरंगपुरा, शहागंजसह अनेक गर्दीची ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी स्काय बसचे स्थानक उभारता येईल. ताशी १०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्काय बसचा पिलर उभारण्यासाठी प्रत्येकी २० बाय २० फूट जागा लागते. 

 

मनपा-सिडकोचा संयुक्त प्रस्ताव पाठवा; गडकरींची आयुक्तांना सूचना 
गडकरींनी डॉ. निपुण यांना सांगितले, तुम्ही ५० लाख रुपये खर्च करा. बाकीची रक्कम कशी उभा करायची ते सांगतो. मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस (वाप्कोस) ही शासकीय कंपनी स्काय बसचा डीपीआर तयार करते. त्यांचे पैसे द्यावे लागतील. त्यासाठी मनपा व सिडकोचे जॉइंट व्हेंचर करून प्रस्ताव द्या. त्यानंतर आपण शहरातील खासगी कंपन्या जसे बजाज, स्कोडा यांच्याकडून प्रस्ताव मागवू शकतो. 

 

२० लोकांपासून २५० लोक मावतील एवढी केबिन.. 
ऑस्ट्रेलियन कंपनीने स्काय बसचे मॉडेल दाखवत २० ते २५० जण प्रवास करू शकतील अशी व्यवस्था करता येईल, असे सांगितले. अशा प्रकारच्या स्काय बसमध्ये प्रतितास १७ हजार प्रवासी ये-जा करू शकतील. ही वारंवारिता ताशी ३६ हजारपर्यंत वाढवता येईल, असाही दावा केला. 
 

बातम्या आणखी आहेत...