आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्व आलेल्या मेजरचे नाशकात ९ हजार फुटांवर स्काय डायव्हिंग; रचला नवा इतिहास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढताना पाय गमवावा लागलेले मेजर डी.पी. सिंह यांनी गुरुवारी नाशकातून स्काय डायव्हिंग करत नवा पराक्रम केला. युद्धातील जखमी सैनिकाची ही भारतात पहिलीच स्काय डायव्हिंग ठरली आहे. सिंह यांनी वायुदलाच्या विमानातून समुद्रसपाटीपासून ९ हजार फुट ऊंचावरून उडी मारली. 

 

वायुदलाकडून प्रशिक्षण :

मेजर डी.पी. सिंह यांना भारतीय वायुदलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले. युद्ध किंवा लष्करी कामांत जखमी झालेल्या वा अपंगत्व आलेल्या जवानांना प्रेरणा देण्यासाठी सिंह यांनी हा उपक्रम राबवला. डी.पी. सिंह यांनी नाशिकमध्ये १८ मार्च २०१९ ला प्रशिक्षणाला प्रारंभ केला. २८ मार्चला त्यांनी प्रत्यक्ष स्काय डायव्हिंग करत इतिहास रचला.

 

विशेष उपक्रम :

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत व इतर लष्करी आस्थापनांनी त्यांना स्काय डायव्हिंगची परवानगी दिली होती. यंदा भारतीय लष्कर कर्तव्यावर असताना अपंग झालेल्या जवानांप्रति विशेष वार्षिक कार्यक्रम राबवत आहे. त्यानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.

 

कोण आहेत मेजर डी.पी. सिंह?
मेजर डी.पी. सिंह यांना ‘इंडियन ब्लेड रनर’ म्हणूनही ओळखले जाते. १९९९ च्या कारगिल युद्धात तोफगाेळा लागून ते जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांना चुकून मृत म्हणून घोषितही करण्यात आले होते. जखमेमुळे गँगरिन होऊन अवघ्या पंचविशीत त्यांचा एक पाय गुडघ्यापासून कापावा लागला होता. मात्र हिंमत न हारता त्यांनी आपले वाटचाल कायम ठेवली. त्यांनी १८ पेक्षा जास्त मॅरेथॉन स्पर्धांत भाग घेऊन त्या पूर्णही केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...