आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री स्वातंत्र्यविरोधी भूमिकेलाच ‘थप्पड’!

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एवढ्या ‘लहान’ गोष्टीसाठी घटस्फोट?

यशवंत पोपळे
‌yashwant.pople@dbcorp.i
n


एकीकडे समाजात महिलांबाबत विपरित विचार मांडले जात असताना दुसरीकडे, कुटुंबातील महिलेच्या आत्मसन्मानाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘थप्पड’ हा चित्रपट येणे याला एक वेगळे औचित्य आहे. ‘थप्पड’मधील अम्मूने स्त्री स्वातंत्र्यविरोधी विचारांना आपल्या कणखर भूमिकेद्वारे लगावलेली चपराक समाजाला अंतर्मुख करणारी आहे.

एवढ्या ‘लहान’ गोष्टीसाठी घटस्फोट? थापड ही तर किरकोळ बाब. तीही पतीने पहिल्यांदाच रागाच्या भारात लगावलेली. सहनशील भारतीय स्त्रीच्या भावना वर्षानुवर्षे गृहीत धरलेल्या समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्न ‘थप्पड’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने केलेला आहे. ‘थप्पड’च्या केंद्रस्थानी महिलांचा निखळ आत्मसन्मान हा विषय आहे. थापड ही घटना निव्वळ निमित्तमात्र. या चित्रपटाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘किरकोळ’ वाटत आलेल्या पारंपरिक घुसमटीच्या विषयावर समाज काही अंशी तरी विचार करू पाहील, असे वाटते.
चित्रपटाची कथा अशी : बहुराष्ट्रीय काॅर्पोरेट कंपन्यांमधील बढतीवरून होणारे राजकारण. त्याचे पती-पत्नीच्या नातेसंबंधांपर्यंत उमटणारे जीवन उद्ध्वस्त करणारे पडसाद. एकीकडे कुटुंबप्रमुखाने पद, पैसा आणि प्रतिष्ठेसाठी कंपनीत केलेली प्रचंड भावनिक गुंतवणूक. दुसरीकडे कुटुंबाबाबत फारशी आस्था राहिली नसल्याने आई व पत्नीशी निव्वळ कोरडे नि भावनाशून्य नाते. झालेली बढती ऐनवेळी नाकारल्याचा फोन आल्यानंतर संतापलेल्या नवऱ्याने भर पार्टीत सर्वोत्तम गृहिणी बनू पाहणाऱ्या पत्नीला अकारण मारलेली थापड. त्यामुळे अमृताचा/अम्मूचा (तापसी पन्नू) दुखावलेला आत्मसन्मान. त्यावरून अम्मूने थेट ‘निरपेक्ष घटस्फोटा’साठी उचललेले पाऊल! तिच्या आईपासून पतीपर्यंत सर्वांनाच थापड मारण्याच्या घटनेच्या किरकोळ कारणावरून घटस्फोटाचा अट्टहास कशासाठी, याचे प्रचंड आश्चर्य वाटत असते. पतीने थापड का मारली, या वरकरणी ‘किरकोळ’ वाटणाऱ्या प्रश्नाच्या बाजूने मात्र कुणीच उभे राहत नाही, अगदी अम्मूची वकीलसुद्धा. कारण पत्नीला थापड मारणे हा नवऱ्याचा स्वाभाविक हक्क असतो, हा समाजाचा‌ परंपरेने भक्कम केलेला गैरसमज. तो भेदण्याची ताकद पटकथेत आहे.

एकीकडे महिलांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी आजचा समाज सर्वार्थाने बदलतोय, हेच ‘थप्पड’ने अधोरेखित केले आहे, तर दुसरीकडे सोलापूरच्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या वक्तव्यावर आधारित क्लिपची चर्चा जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गाजते आहे. रामतीर्थकर यांचे महिलांबद्दलचे विचार असे‌ : १) बायकोनं नवऱ्याला चहा देताना थरथर कापलंच पाहिजे, हीच खरी संस्कृती. २) बाईनं‌ घरचा उंबरा कधी ओलांडू नये, उंबरा म्हणजे मर्यादा. ३) मुली पप्पा म्हणून गळ्यात पडतात, पण पप्पा ‘पुरुष’ आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही का? ‌४) भारतीय स्त्री शिक्षणामुळे कधीच यशस्वी होऊ शकत नाही. ५) चांगल्या घरातील लेकी-सुनांनी सूर्य मावळल्यानंतर आरशात बघायचं असतं. ‘थप्पड’मधील अम्मूने अशा स्त्री स्वातंत्र्यविरोधी विचारांना आपल्या कणखर भूमिकेद्वारे चांगलीच थापड लगावली आहे, हा एक योगायोगच.


अम्मूची महिला वकीलही, नवऱ्यानं रागाच्या भरात पहिल्यांदाच मारलेल्या नुसत्या एका थापडेमुळे तू घटस्फोट का घेतेस, अशी तिची समजूत वारंवार काढत असते. त्यावर अम्मू म्हणते, ‘‘पहिल्यांदा का होईना, सर्वांसमोर थापड मारून मला अपमानित करण्याचा, हा हक्क त्याला दिलाच कुणी? तो समाजमान्य असला तरी मला कदापिही मान्य नाही. मी घटस्फोटाचा अर्ज मागे घेणार नाही.’’ अम्मूच्या या कणखर भूमिकेमुळे आरंभी सगळेच वैतागून जातात. हळूहळू अम्मूच्याच भूमिकेचा‌ विचार पतीसह सगळेच अंतर्मुख होऊन करू लागतात. तिची भूमिका सर्वांना पटू लागते. चित्रपटाच्या शेवटी पती पहिल्यांदाच ‘आय अॅम रिअली सॉरी’ म्हणतो. अम्मूच्या या एका प्रकरणाने तिच्या भोवतालच्या कौटुंबिक नात्यांचा अर्थच सकारात्मकदृष्ट्या बदलत जातो. म्हणजेच एखादी सामान्य वाटणारी पण मौलिक भूमिका सर्वांनाच धडा शिकवून जाते, हे रामतीर्थकर यांचे विचार पटणाऱ्यांनी ‘थप्पड’पासून समजून घेण्यास हरकत नसावी. निमित्त, विषय किंवा प्रसंग कोणताही असो; खुळचट परंपरांना प्रभावीपणे छेद देण्याची गरज या चित्रपटामुळे निश्चितच अधोरेखित झाली आहे. रूढी-परंपरांच्या नावाखाली महिलांना गृहीत धरले तरी हरकत नाही, हा समज वाढवण्यासाठी महिलाही काही अंशी जबाबदार असतात. अर्थात त्यात कालानुरूप बदलही झालेले आहेत. आजच्या काळातही भारतीय पुरुषसत्ताक समाजात महिलांनी एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावली तर त्याची बातमी होण्याइतपत महत्त्व येते, ते यामुळेच. महिलांना दुय्यम स्थान देण्याची पुरुषी मक्तेदारी आजही उच्चभ्रू, उच्चशिक्षित आणि पांढरपेशा वर्गातही जागोजागी दिसते. घरातील महिला केवळ राबणाऱ्याच्या भूमिकेत असाव्यात, हे गृहीतक सर्वसामान्य कुटुंबांमध्ये आढळते. एखाद्या स्त्रीने अशा गृहीतकांच्या विरोधात बंडाचे निशाण उगारण्याचे धाडस दाखवले तर पुरुषकेंद्री मानसिकतेची कशी गाळण उडते ते ‘थप्पड’ या चित्रपटाने दाखवून दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...