Home | Business | Business Special | Slots will return to Jet as soon as they start the service

जेटची सेवा सुरू हाेताच स्लाॅट परत देणार; बँकांनी केली होती स्लाॅट सुरक्षित ठेवण्याची मागणी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 24, 2019, 10:54 AM IST

शरद पवार यांचे जेटच्या कर्मचाऱ्यांना आश्वासन

 • Slots will return to Jet as soon as they start the service

  मुंबई - जेट एअरवेजचे फ्लाइट स्लाॅट इतर एअरलाइन्सला देण्यात येत असल्याच्या मुद्यावर सरकारने स्थिती स्पष्ट केली आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार हे स्लाॅट अस्थायी स्वरूपात तीन महिन्यांसाठी इतर कंपन्यांना देण्यात येणार आहेत. जेटची सेवा सुरू हाेताच हे स्लाॅट पुन्हा जेटला परत देण्यात येतील. मंत्रालयाने सांगितले की, प्रवाशांची असुविधा हाेऊ नये तसेच क्षमता वाढवण्यासाठी जेटचे काही स्लाॅट अस्थायी स्वरुपात इतर कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्लाॅट आधी तीन महिन्यांसाठी आणि नंतर एक-एक महिन्यांसाठी देण्यात येणार असल्याचे नागरी उड्डयन सचिव प्रदीपसिंह खराेला यांनी मागील आठवड्यात सांगितले हाेते. जेटचे कर्मचारी आणि एसबीआयच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाने सोमवारीच सरकारकडे जेटचे आंतरराष्ट्रीय स्लाॅट सुरक्षित ठेवण्याची मागणी केली हाेती. यामुळे एअरलाइन कंपनीचे मूल्य कायम ठेवण्यात मदत मिळेल, असे त्यांनी म्हटले हाेते. कर्मचाऱ्यांनी तर देशांतर्गत स्लाॅटही दुसऱ्या कंपन्यांना देण्यास विराेध केला आहे, त्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

  कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली हाेती. स्लाॅट वाटण्यामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी डीजीसीए, विमानतळ प्राधिकरण, एअरलाइन्स आणि स्लाॅट काेआॅर्डिनेटरच्या प्रतिनिधींची एक समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे. अतिरिक्त विमान आणतील त्याच कंपन्यांना हे स्लाॅट देण्यात येणार आहेत.


  कर्मचाऱ्यांना शरद पवार यांचे आश्वासन
  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेट कर्मचाऱ्यांना हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासमाेर मांडण्याचे आश्वासन दिले आहे. जेट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पवार यांनी हे आश्वासन दिले आहे.


  जेटच्या शेअरमध्ये १० टक्के वाढ
  तीन दिवसांच्या घसरणीनंतर जेट एअरवेजच्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात ९.९ टक्क्यांच्या वाढीसह १६९.९० रुपयांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात यात ८.३ टक्क्यांची वाढ झाली. तीन दिवसांत शेअरमध्ये ४०.९४ टक्क्यांची घट झाली हाेती.

Trending