आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन घडविणार स्मार्ट सिटी; महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण असो त्याला काैशल्याची जोड मिळाल्यास रोजगार वा नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतात. स्मार्ट शहरामध्ये निवड झालेल्या नाशिक शहराचा विविध योजना राबवत पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. मात्र, फक्त सुविधांपुरते मर्यादित न राहता शहरातील तरुणाईला महापालिकेकडून विविध काेर्सच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा कौशल्याधारित तरुणाईच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नाशिकला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणार असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. 


नाशिक स्मार्ट सिटी, महापालिका आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर येथे स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आहे. या कार्यशाळेचे उद‌्घाटन बुधवारी (दि. ४) पालिका आयुक्त तुकाराम मुंंढे, स्मार्ट सिटी सीईओ प्रकाश थविल, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुंढे म्हणाले की, विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची याचा निर्णय घेतात. त्यामुळे नोकरी व रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाही. रोजगार मिळवण्यासाठी फक्त शिक्षणाची नाही तर कौशल्याचीदेखील गरज असते. कौशल्य अंगीकारल्याशिवाय कोणत्याही व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाही. याचाच विचार करत शहरातील युवकांना कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध कोर्सद्वारे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. साधारणत: एका विद्यार्थ्यांवर २० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा कोणत्या क्षेत्राकडे कल, पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा कार्यशाळेचा उद्देश गर्दी जमवायची नव्हे तर मुलांना कौशल्यपूर्ण घडवायचे असा आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्यांना खरे गांभीर्य अाहे त्यांनीच यावे. ३१ मार्चपूर्वी या कोर्सच्या माध्यमातून २००० कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडविणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. स्मार्ट सिटीचे सीईओ थविल यांनी यावेळी घेतल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणाबाबत तर संपत चाटे यांनी या कार्यशाळेबाबत माहिती दिली. 


पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद... 
शहरातील विभागाप्रमाणे तीन दिवसीय या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पूर्व व पंचवटी विभागासाठी होता. मात्र, अवघे १०० ते १३० विद्यार्थी व काही पालक उपस्थित होते. कार्यशाळेला प्रतिसाद कमी असल्यानेच आयुक्त मुंढेदेखील कार्यशाळेला उशिरा आल्याची चर्चा यावेळी चांगलीच रंगली होती. 


'त्या' विद्यार्थ्याला ब्लॅक लिस्ट करण्याचे मुंढेचे आदेश 
आयुक्त मुंढे यांचे भाषण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले. एका विद्यार्थ्यांने आधी कौशल्य विकासाचा कोर्स केला, मात्र तीन महिने उलटूनही प्रशस्तिपत्र न मिळाल्याची तक्रार केली. यावेळी मुंढे यांनी त्या विद्यार्थ्यांंला त्या कोर्स व संस्थेबाबत विचारणा केली. यावेळी त्या मुलांना कोर्सचे नाव सांगता आले नाही. कोर्सचे नाव न सांगता यावरून काेर्स काय केला असेल यांची कल्पना येत असल्याचे सांगत त्या विद्यार्थ्याला कार्यशाळेतून ब्लॅक लिस्ट करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...