आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी’ची संरक्षक भिंत कोसळते! (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या कोंढवा भागातील ‘अल्कॉन स्टायलस’ या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १५ निष्पापांचा बळी गेला. या प्रकरणातील दोन बिल्डरांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनाही पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्यांना जामीन मिळालाच तर पुन्हा इतर प्रकरणांप्रमाणे हेही प्रकरण इतिहासजमा होईल. अल्कॉनची ३० फुटांची संरक्षक भिंत कोसळली त्याला तीन दिवस लोटले आहेत. परिस्थिती आहे तशीच आहे. त्यात कोणताही बदल नाही. २०१३ मध्ये ही भिंत बांधली गेली होती. त्यानंतर अल्कॉनचे बिल्डर अगरवाल यांच्याकडून भिंतीच्या डागडुजीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. काही महिन्यांपूर्वी याच सोसायटीशेजारी कांचन बिल्डरनेही काम सुरू केले. या कामासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजूर आणण्यात आले. तेही बिचारे आपल्या कुटुंबीयांसह येथे आले व त्यांनी अल्कॉनच्या संरक्षक भिंतीशेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये संसार थाटले. एकीकडे अल्कॉनची संरक्षक भिंत, तर दुसरीकडे कांचन बिल्डर्सने खोदलेला ३० फुटांचा खड्डा. इकडे आड, तिकडे विहीर अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन हे कुटुंब येथील झोपड्यांमध्ये राहत होते. बिल्डर अथवा त्यांना आणणाऱ्या कंत्राटदाराने या मजुरांचा विमाही काढलेला नाही. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची उकल झाल्यास संरक्षक भिंत ढासळण्यास जबाबदार असणाऱ्यांची यादी निश्चितच वाढणार आहे. या भिंतीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांची नैतिकताही किती ढासळलेली आहे हेही त्यानिमित्ताने पुढे येईल. 
अल्कॉन स्टायलस सोसायटीतील रहिवासी मागील काही महिन्यांपासून बिल्डरकडे सोयी-सुविधांसाठी खेटे मारत होते. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. या सोसायटीला पिण्याचे पाणी येत नाही. येथे ड्रेनेजची सुविधा नाही. या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणाही नाही. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही केले गेलेले नाही. तरीही या इमारतीला पुणे महापालिकेकडून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (कम्प्लिशन सर्टिफिकेट) दिले गेले. इथेच यंत्रणांचा गाफीलपणा समोर येतो. भिंत ढासळल्यानंतर २४ तासांत याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, तीन दिवस लोटल्यावरही अद्यापही हा अहवाल सादर झालेला नाही. इतकेच काय ३० फुटांपैकी ९ फुटांची संरक्षक भिंत कोसळल्याने अल्कॉनच्या दोन इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. येथील जमीन ४५ अंशांत घसरल्याने त्वरित संरक्षक भिंत पुन्हा बांधणे गरजेचे आहे, अन्यथा ८८ कुटुंबे राहत असलेल्या दोन इमारतीही कोसळू शकतात, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. प्रशासन आणि घटनास्थळी आलेल्या नेत्यांनी आश्वासने दिली खरी, मात्र अद्यापही संभाव्य धोका टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही. सामान्य नागरिकांचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा असते, ती भिंतच ढासळली आहे. कायदा - सुव्यवस्था, नियम, प्रशासकीय चौकट यांना सुरूंग लागतात, तेव्हा सर्वसामान्य मजुरांचे मृतदेह दिसू लागतात. पुण्यातील घटना हा अपवाद नाही. दुर्दैवाने, सर्वदूर हेच चित्र आहे. ते बदलले नाही, तर अनर्थ अटळ आहे. विकास आणि स्मार्ट सिटीचे स्वप्नही व्यर्थ आहे! 

बातम्या आणखी आहेत...