उदंड झाले थेट / उदंड झाले थेट पुरस्कार; कामगिरीपेक्षा सहभाग श्रेष्ठ! स्मृतीसह हर्षदा, सागर कुलकर्णी, अमेय जोशीला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

Feb 14,2019 10:14:00 AM IST

मुंबई- आचारसंहितेच्या भीतीपोटी क्रीडा खात्याने यंदा घाईगडबडीने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली खरी; पण शासन निर्णयाच्या आधारामुळे, उत्कृष्ट कामगिरीपेक्षाही थेट पुरस्कारासाठीच्या निकषांच्या कुबड्यांमुळे अनेक जण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. एकीकडे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे फॉर्म मागवणाऱ्या आणि आक्षेप मागवणाऱ्या क्रीडा खात्याने पारदर्शीपणा दाखवला. त्याच वेळी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, एशियाड, विश्व अजिंक्यपद सहभाग एकाच तराजूमध्ये तोलून केवळ सहभाग असणाऱ्यांना पुरस्कारांची खिरापत वाटली गेली. एवढेच नव्हे, तर थेट पुरस्कारार्थींच्या साथीला मार्गदर्शकांवरही थेट पुरस्कारांची बरसात करून शिवछत्रपती पुरस्कारांचे महत्त्व कमी करण्यात आले. शासन निर्णयातील थेट पुरस्कारांच्या निकषात बदल करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक खेळात पुरस्कार द्यायचेच असे निकष ठरवल्यामुळे पुरस्कार उदंड झाले आहेत. पुरस्काराचा दर्जा गुणवत्तेत मोजला जावा, संख्येत नको. थेट पुरस्कारांमुळे यंदा ही संख्या उदंड झाली आहे. साहसी क्रीडा पुरस्कार प्रियंका मोहिते यांना मिळाला आहे. येत्या रविवारी राज्यपालांच्या हस्ते गेटवे आॅफ इंडिया येथे विजेत्यांचा गौरव करण्यात येईल.

स्पर्धेतील फरक कळेना; एकत्र तुलना :
थेट पुरस्कार देताना ऑलिम्पिक स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा एकाच तागडीत तोलल्या जाण्यात हे एक आश्चर्य आहे. त्यापेक्षाही चमत्कारिक गोष्ट म्हणजे केवळ सहभागावरच हा पुरस्कार दिला जात आहे. म्हणजे सांघिक खेळात तर हा पुरस्कार काहीही कामगिरी न करता अनेकांना मिळणार. पुरस्कार मिळवण्याबाबतची चतुराई तेवढ्यावरच संपत नाही. संघातील खेळाडूंनी आपापल्या मार्गदर्शक - व्यवस्थापकांच्या डोक्यावरदेखील पुरस्काराचा मुकुट बसवला आहे. काही खेळाडू तर तेवढ्यावरच थांबले नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नावे त्यांनी दिली. त्यांच्यापेक्षाही बिलंदरांनी एका वर्षी प्रशिक्षक म्हणून आपल्या वडिलांचेच नाव टाकले. त्याच खेळाडूंनी यंदा आपल्या मातोश्रींनाही उपकृत करण्याचा प्रयत्न केला.

कुटील खेळी; क्रीडामंत्र्यांना हुलकावणी
पुरस्कार मिळवण्यासाठी नियमांचा आधार घेण्याची कल्पकता व धूर्तपणा याआधीही अनेकांनी दाखवला आहे. त्यामुळे शासन निर्णयांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची गरज आहे. जुन्या ‘जी आर’च्या आधारे यंदा क्रीडामंत्र्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनादेखील हुलकावणी देण्यात काही चतुर यशस्वी ठरले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या सहभागासाठी थेट पुरस्कार देताना प्रत्येक खेळाच्या दर्जाबाबतही वेगवेगळे निकष निश्चित करणे गरजेचे आहे. त्या-त्या खेळातील थेट पुरस्कार मागणाऱ्या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील स्थान काय आहे याचाही विचार होणे गरजेचे आहे. केवळ कागदावर प्रशिक्षक-मार्गदर्शक किंवा व्यवस्थापक असणाऱ्यांच्या प्रत्यक्ष कामगिरीचाही विचार व्हायला हवा. दोन संघटनांच्या वादाचा फटका खेळाडूंना बसू नये हे जरी खरे असले तरीही दोन संघटना असणाऱ्या खेळांवर अंकुश ठेवणेही गरजेचे आहे. दिव्यांग खेळाडूंच्या संघटनादेखील या गोष्टीला अपवाद ठरू नयेत हे दुर्दैव.

संघर्षातून गाठला नंबर वनचा पल्ला; पुरस्कारातून शासनाने केला मेहनतीचा गौरव
बालपणी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्मृतीची सारखी धडपड सुरू होती. यासाठी मेहनत करताना तिने कुठल्याही गोष्टीची पर्वा केली नाही. त्यामुळेच वेळप्रसंगी तिला भावाच्या मित्रांसोबतही क्रिकेटचा सराव करता आला. मात्र, यादरम्यान तिने केवळ मेहनतीवर आपले लक्ष केंद्रित केले. यामुळेच तिला सातत्याच्या संघर्षातून क्रिकेटच्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करता आली. यातून तिच्या कामगिरीचा दर्जा उंचावला. याच दर्जेदार खेळीच्या बळावर तिने जगातील नंबर वन फलंदाजाच्या प्रतिष्ठेचे सिंहासन गाठले. याच मेहनतीचा आता शासनाने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तिच्या या यशाचा मला नेहमीच अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया स्मृतीचे वडील श्रीनिवास यांनी दिली. स्मृती ही सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.ती उद्या शुक्रवारी मायदेशी परतेल.

गेटवे ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते गौरव :

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. येत्या रविवारी गेटवे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पुरस्कार विजेती हर्षदा औरंगाबादची तिसरी नेमबाज
युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू हर्षदा निठवे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जिंकणारी औरंगाबादच्या इतिहासातील तिसरी नेमबाजपटू ठरली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी मुळे आणि सुमेधकुमार यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही हर्षदाने न डगमगता नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. नेमबाजी महागडा खेळ असतानाही आई-वडिलांनी खानावळ चालवून हर्षदाचा आर्थिक भार उचलला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज हर्षदाने केले. ती एमजीएम नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रा. संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने नुकत्याच पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्युनियर गटात आपला दबदबा राखला. ती सध्या भारताची आघाडी खेळाडू आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकायचे, हे लक्ष्य ठेवून ती सध्या जोरदार सराव करत आहे.


सत्राच्या पुरस्कारासाठी १३ खेळ प्रकारात ९० पेक्षा अधिक हरकती
यंदा एकूण १३ क्रीडा प्रकारांमध्ये ९० पेक्षा अधिक खेळाडूंबाबत हरकती नोंदवल्या गेल्या हेही लक्षण चांगले नाही. पुरस्कारासाठी नाव पाठवताना किंवा अर्ज भरताना त्या खेळाडूंचे श्रेष्ठत्व निर्विवाद असणेही गरजेचे आहे. असे आक्षेप घेतलेले व नंतर गुण कमी झालेले खेळाडू काठावर पास होऊनही पुरस्कार घेऊन गेले आहेत. सर्वोत्कृष्ट एकच असावा. एकाच वर्षी त्या-त्या खेळात अनेकांना पुरस्कार देणे भूषणावह नाही.

X