आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेघोट्यांची शिडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील महिन्यात माझ्या मैत्रिणीच्या सासूबाईंचे अपघाती निधन झाले. सांत्वन करण्यासाठी मी तिच्या घरी गेले. घरात शोकाकुल वातावरण होते. त्यामुळे कोणत्या शब्दांत तिला धीर द्यावा हेच कळत नव्हते. सासू-सुनेचे नाते अगदी मायलेकीप्रमाणे होते आणि घरातील ममतेचा मोठा आधारच गमावल्यामुळे माझी मैत्रीण अगदी सुन्न झाली होती. घरात बरीच पाहुणे मंडळी होती. कुणी जुन्या आठवणी काढून डोळे पुसत होते, कुणाची आवराआवर चालली होती, तर कुणी स्तब्ध बसले होते. माझ्या मैत्रिणीचा दोन वर्षांचा मुलगा चिन्मय याला घरात काय चाललंय हे कळत नव्हतं. आजीचा तो खूप लाडका होता. आजी-नातवाचं नातंच दुधावरील सायीप्रमाणे घट्ट असतं. घरात गर्दी आहे, पण आपली आजी कुठेच दिसत नाही, म्हणून त्याने ‘आजी कुठे गेली’ असं आईला विचारलं. हे ऐकताच माझ्या मैत्रिणीला रडू कोसळलं. त्याला जवळ घेऊन, कुरवाळून सांगितलं, ‘बाळा, आजी आता देवाघरी गेलीय.’ ‘मग तिला आपल्या घरी बोलवून आणा ना.’ त्याला समजावण्यासाठी मैत्रीण म्हणाली, ‘खूप लांब आहे देवाचं घर. आपण नाही बोलावू शकत आजीला.’
हे ऐकून चिन्मय अस्वस्थ झाला. थोड्या वेळाने त्याने एका कागदावर दोन लांब उभ्या रेषा व मधून छोट्या आडव्या रेषा काढल्या. बराच विचार केल्यानंतर कळलं, की त्याने देवाघरून आजीला आणण्यासाठी शिडीचं चित्र रेखाटलं होतं. ते चित्र आईला दाखवून तो आजीला लांबून आणण्यास सांगत होता. त्याच्या या बालसुलभ कृत्यामुळे सर्व जण स्तब्ध झाले आणि प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू तरळू लागले. लहान मुलांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो. कारण त्यांच्या बालसुलभ मनात प्रश्नांची भेंडोळी तयार झालेली असतात. ती सोडवणे अशा कठीण समयी तरी अवघड असते. त्यांची समजूत घालण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात. अन्यथा त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.