Home | Magazine | Madhurima | Sneha Shimpi gives recipes of coconut

नारळी पौर्णिमेसाठी खास पाककृती

स्नेहा शिंपी, नाशिक | Update - Aug 21, 2018, 07:37 AM IST

तांदूळ धुऊन तासभर निथळून घ्यावे. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंगा व तांदूळ परतावे.

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  नारळी टिकिया
  साहित्य -
  नारळ चव दोन वाट्या, चिरलेली कोथिंबीर दोन वाट्या, चिरलेले पांढरे कांदे अर्धी वाटी, मिरच्या व आलंलसूण पेस्ट दोन चमचे, मीठ, साखर चवीनुसार, तांदूळ पिठी दीड ते दोन वाट्या, दही एक चमचा, तेल.


  कृती - नारळ चव, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं - लसूण पेस्ट, मीठ, साखर, कांदा, तांदूळ पिठी, लिंबूरस सगळं एकत्र कालवून घ्यावं. दही लावून गोल गोळे करून चपटे प्लॅस्टिकवर थापावे. पॅनमध्ये गुलाबी रंगावर भाजावे.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा आणखी रेसिपीज​...

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  गाजर - नारळ साखरभात

  साहित्य - बासमती जुने तांदूळ दोन वाट्या, गाजर कीस दोन वाट्या, नारळ चव दोन वाट्या, साखर चार वाट्या, लिंबूरस दोन चमचे, साजूक तूप दोन चमचे, लवंगा चार, किंचित मीठ, आणि गरम पाणी. 


  कृती - तांदूळ धुऊन तासभर निथळून घ्यावे. पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लवंगा व तांदूळ परतावे. गरम पाणी, लिंबूरस व मीठ घालून मोकळा मऊ भात शिजवून घ्यावा. एका ताटात पसरवून ठेवावा. कढईत गाजर कीस, साखर व नारळ चव एकत्र करून मंद आचेवर शिजवावा. थोडे मिश्रण घट्ट होत आलं की वेलचीपूड घालावी. मग थोडा गार झालेला भात हाताने मोकळा करून घालावा. अलगद मिश्रण एकत्र करावे. वरून थोडे तूप (चमक येण्यासाठी) सोडावे. हवे असल्यास काजू, बदाम, बेदाणे व थोडा नारळ चव घालून सजवावे.

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  कोकोनट क्रिस्पी 
  साहित्य
  - डेसिकेटेड कोकोनट 2 वाट्या, पिठीसाखर 2 वाट्या, साजूक तूप 1 वाटी, खसखस अर्धा चमचा, वेलची पूड व जायफळ पूड पाव चमचा. 


  कृती - प्रथम तूप फेसून त्यात खोबरे कीस व पिठीसाखर घालावी. दुधाचा हात लावून मळून घ्यावे. मग गोल गोळे करावे. खसखस एका थाळीत पसरून त्यावर केलेले खोबरा गोळे दाबावे. तूप लावलेल्या एका ट्रेमध्ये गोळे ठेवून वरून वेलची व जायफळ पूड भुरभुरून ओव्हनमध्ये बदामी रंगावर भाजावे.

   

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  नारळाच्या दुधातील धिरडी 
  साहित्य -
  नारळाचे घट्टसर दूध 1 वाटी, बेसन 1 वाटी, नाचणी पीठ 1 वाटी, तांदूळ पिठी 1 वाटी, आलं, लसूण व मिरचीचा ठेचा 2 चमचे, कोथिंबीर, मीठ व तेल.


  कृती - बेसन, नाचणी पीठ, तांदूळ पिठी, आलं, लसूण व मिरची ठेचा, मीठ व कोथिंबीर घालून एकत्र करून घ्यावे. मग नारळाचे घट्ट दूध घालून घोळ बनवावा. तव्यावर तेल सोडून पातळ धिरडी करावी. हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावी.

   

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  नारळ पकोडा 
  साहित्य
  - चणा डाळ अर्धा वाटी, मूगडाळ अर्धी वाटी, मसूर डाळ अर्धी वाटी, तूरडाळ अर्धी वाटी, नारळ चव दोन वाट्या, आले - लसूण पेस्ट दोन टेबलस्पून, तांदूळ पिठी दोन चमचे, मीठ, साखर, हळद, तिखट, तळण्यासाठी तेल. 


  कृती - सर्व डाळी दोन तास भिजवून, पाणी निथळून वाटून घ्याव्या. त्यात नारळ चव, आले - लसूण पेस्ट, मीठ, साखर, हळद, तिखट, घालून एकत्र करावे. कढईत तेल तापत ठेवावे. एक टेबलस्पून कडकडीत तेल मिश्रणात घालून चांगले फेटून पकोडे घालून खमंग तळून घ्यावे. हिरव्या चटणी किंवा साॅसबर खायला द्यावे.

   

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  नारळ - उसाच्या रसाची वडी 
  साहित्य
  - नारळ चव एक वाटी, साखर एक वाटी, पिठीसाखर एक वाटी, उसाचा रस दोन वाटी, केशर व वेलची सिरप, ट्रे तूप लावून आणि थोडा खवा.


  कृती - नारळ, उसाचा रस घट्टसर शिजवून त्यात साखर, खवा घालून घट्ट शिजवून घ्या. मग गॅस वरून उतरवून वेलची व केशर सिरप घालून थोडी पिठीसाखर घालून घोटावे. ट्रेमध्ये पसरवून थंड झाल्यावर वड्या पाडाव्या.

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  मेथीचे नारळी थालीपीठ 
  साहित्य
  - मेथी एक जुडी, नारळ चव दोन वाट्या, तांदूळ पिठी दोन वाट्या, कणीक अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल. 


  कृती - एका परातीत तांदूळ पिठी, कणीक, चिरलेली मेथी, चिरलेला कांदा, नारळ चव, हळद, तिखट, मीठ, हिंग एकत्र मळून घ्यावे. पातळ थापून पॅनवर तेल सोडून थालीपीठ गुलाबी रंगावर भाजावे. लोणी, दह्यासोबत हे छान लागते. हिरव्या मिरच्याची दाण्याचे कूट घालून केलेल्या चटणी सोबतही देता येते.

 • Sneha Shimpi gives recipes of coconut

  नारकेल वडा (बंगाली पदार्थ) 
  साहित्य
  - नारळ चव चार वाट्या, कणिक तीन टेबलस्पून, भाजलेली बडीशेप व भाजलेले जिरं प्रत्येकी अर्धा चमचा, ठेचलेली हिरवी मिरची दोन चमचे, मीठ, साखर, लिंबूरस दोन चमचे, तूप दोन चमचे मोहन म्हणून, कोथिंबीर व तळण्यासाठी तूप किंवा तेल. 


  कृती - एका वाडग्यात नारळ चव, बडीशेप, जिरेपूड, हिरवी मिरची, मीठ, साखर, कोथिंबीर, कणिक, लिंबूरस व तूप एकत्र करून छान मळावे. एका कढईत तूप घालून गरम करावे. मिश्रणाचे जाडसर वडे घालून मंद आचेवर खरपूस तळून घ्यावे. हे वडे खुशखुशीत लागतात.

   

Trending