आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनभिंतीच्या शाळेचा नंदुरबार पॅटर्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील शेवटच्या जिल्ह्यात आहे तोरणमाळ नावाचे हिल स्टेशन. सातपुड्याच्या पर्वतरांगांत कडेकपारीत आदिवासी पाडे आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत रस्ते, वीज, नळाचे पाणी, इतकेच काय तर पुरेशा शाळा आणि दवाखाने पोहोचविणे भौगोलिक दुर्गमतेमुळे खूप कठीण आहे. त्याचमुळे नंदुरबारमध्ये शाळाबाह्य मुलांचे प्रमाण खूप आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीवर मात करून बालरक्षक दादाभाई पिंपळे आणि संदीप म्हमाणे यांनी उभारली आहे - आंबानबुंद, म्हणजे आंब्याच्या झाडाखालची अनौपचारिक शाळा.
निमित्त झालं २६ जानेवारी २०१६च्या प्रजासत्ताक दिनाचं. ध्वजवंदन झाल्यावर थेट घरी जाण्यापेक्षा बालरक्षक या नात्याने आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यात कोणी शाळाबाह्य मुले सापडतात का, याचा शोध घेण्याचे दोघांनी ठरवले. अगदी दुचाकी जाईल एवढाही रस्ता नसल्याने जवळपास दोन डोंगर, खाचखळगे, नाले पार करत ते मुलांच्या शोधात निघाले. विनदेवपाड्याजवळ कवता नावाची मुलगी नाल्यात खेळत होती, मग तिच्याशी त्यांच्याच बोलीभाषेत बोलून जादू, ज्योतिष, गिलदार, चुट्ट्या, कुवा अशी त्यांची मित्रमंडळी दादाभाई आणि संदीप सरांनी शोधून काढली.


या मुलांना शाळेत दाखल करायचे होते, पण शाळा म्हणजे काय हेच माहिती नसणाऱ्या त्यांच्या आईबापांना या दोघांनी खूप मिनतवारीने समजावले की, “शिक्षण हाच चांगल्या भविष्याचा एकमेव मार्ग आहे. आज तुम्ही दऱ्याखोऱ्यात कष्टाचे जिणे जगताय, पण तुमची मुलं शिकली तर उद्या नोकरी-धंदा करून सुखाचे आयुष्य जगतील.” पण या पाड्यापासून सगळ्यात जवळची शाळा म्हणजे तोरणमाळ. त्या शाळेला जाण्याचा रस्ता दुर्गम आणि जंगलातून असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार नव्हते. म्हणूनच या दोन गुरुजींनी त्यांच्या पाड्यावरच सुरू केली - बिनभिंतीची, दप्तर आणि गणवेषाची अट नसलेली आंब्याच्या झाडाखालची शाळा - आंबानबुंद!
औपचारिक शिक्षणाचे सगळे उपचार बाजूला ठेवून ही शाळा सुरू झाली. दोघे शिक्षक मुलांसोबतच खाली जमिनीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारत, गाणी म्हणत, मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देऊ लागले. पहिल्यांदा केवळ गाणी, संदीप सरांसोबत खेळ, व्यायाम, गोष्टी इ. मग झाडांची पाने, फळे, काड्या, भाकऱ्या, दगड मोजून अंकओळख, बेरीज-वजाबाकी, त्यांच्या भाषेतील शब्दांवरून अ, आ, इ, ईची ओळख असा अभ्यास सुरू झाला. विनदेवपाड्यातील या अनोख्या शाळेविषयी पिंपळे सरांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, त्यावरून लोकांनी या कामाला उदारहस्ते मदत केली. कुणी वह्या आणि पेन पाठवले, कुणी दप्तर आणि बुटांचा खर्च उचलला, तर कोणी या लेकरांसाठी आयुष्यातली पहिली सोनपापडी, केक, सफरचंद असा खाऊ पाठवला. पाखरं शाळेत अगदी रमून गेली.


या दोन्ही बालरक्षकांच्या तळमळीची दखल राज्याचे तत्कालीन शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी घेतली. नंदुरबारच्या दऱ्याखोऱ्यात कुठल्याही सोयीसुविधा नसताना या बालरक्षकांनी आदिवासी पाड्यांपर्यंत जिद्दीने जी ज्ञानगंगा पोहोचवली त्याचे कौतुक केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विशेष कार्याधिकारी प्राची साठे तसेच महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या अनोख्या शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पिंपळे सर तसेच म्हमाणे सरांच्या कामाचे कौतुक केले. आज या आंबानबुंदमधले ८५ विद्यार्थी तोरणमाळच्या निवासी शाळेत दाखल करण्यात आले आहेत.


जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असणारे दादाभाई मूळ नंदुरबारचेच तर संदीप सर मूळ सोलापूर जिल्ह्यातले. तोरणमाळच्या केंद्रशाळेत दादाभाई सध्या प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहतात, तर संदीप सहशिक्षक आहेत. शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांच्या बाबतीत नंदुरबार राज्याच्या तुलनेत अजून खूप पिछाडीवर आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती आणि काही प्रमाणात प्रशासनाची अनास्था याला कारणीभूत आहे. दादाभाई आणि संदीप महाराष्ट्राच्या बालरक्षकांच्या फळीतले खंदे कार्यकर्ते आहेत.


पण नंदुरबारची आव्हानं वेगळीच आहेत, असं म्हणत संदीप म्हमाणे सांगतात, “कुठल्याही डोंगराच्या कडेकपारीत आदिवासी वस्ती करू शकतात. लोकसंख्येचाही मोठा प्रश्न इथे जाणवतो. अनेक आदिवासींना ८-१० मुलं सहज असतात. कमाईची साधनं मात्र अत्यंत तुटपुंजी, त्यामुळे शहरातल्या पालकांसारखे आपल्या अपत्यांना सर्वोत्तम सोयी देऊ, वगैरे यांच्या गावीही नसते. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी गेले असता, कित्येक पालकांना आपल्याला किती मुलं आहेत, हेही सांगता येत नाही. दुर्गम भाग असल्याने शाळेपर्यंत जाण्याचा रस्ता लांबचा आणि बऱ्याचदा जंगलातून जाणारा असतो. शिवाय शिक्षणाने काय फायदे होतात, हे जवळच्या कुठल्या नातेवाइकाबाबत बघायला न मिळाल्याने शिक्षणाविषयी मोठी अनास्था इथे आहे.”


दादाभाई पिंपळे सांगतात, “नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. नागरी समाजापासून तुटलेल्या या आदिवासींची बोलीदेखील वेगळी आहे. सुरुवातीला मलाही त्यांची भाषा यायची नाही, त्यामुळे शिक्षक म्हणून नोकरी करणे अवघड वाटायचे. तेव्हा मला माझ्या वडिलांनी समजावले होते, ‘अरे, शेतात नांगराला जुंपलेल्या बैलालाही मालकाची भाषा कळते आणि तुला जित्याजागत्या माणसांची भाषा कळेना? प्रयत्न तर कर, जमेल.’ आणि ते खरंच ठरलं. मास्तराला शाळेतल्या लेकरांशी माय होऊन बोलावं लागतं, प्रेमाची भाषा प्रत्येकाला कळते आणि इथल्या स्थानिक नहाली, पावरी भाषा तर मी शिकलोच. मी स्वत: हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेलो असल्याने मला शिक्षणाचे महत्त्व चांगलेच कळते, त्यामुळे या दऱ्याखोऱ्यातल्या वाड्यावस्त्यांत शिक्षण पोहोचवणं मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं.”
दादाभाई आणि संदीप यांनी केंद्रशाळेतल्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्यादेखील २५वरून १४५वर आणलेली आहे. तोरणमाळ ही ग्रुप ग्रामपंचायत आहे, या परिसरात ५६ पाडे आहेत. त्यापैकी शक्य त्या पाड्यांपर्यंत हे बालरक्षक पोहोचत आहेत. नंदुरबारमधून शेजारच्या गुजरात राज्यातही आदिवासींचे फार मोठे स्थलांतर होते. मध्यंतरी पालकांसोबत कामासाठी स्थलांतरित झालेल्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ५२ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परत नंदुरबारमध्ये आणण्याचे कामही यांनी केले.


याशिवाय सातपायरी घाटाजवळच्या खामसापाडा नावाच्या दाट जंगलात असणाऱ्या आदिवासी पाड्यावरची ४८ शाळाबाह्य मुलं, तसेच चौंदणेपाड्याची ३५ शाळाबाह्य मुलं दादाभाई आणि संदीप सरांनी शोधून काढली आहेत. प्रशासन त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यासाठी सांगतंय, पण जवळची लेगापाणी जि.प. शाळाही त्यांच्यासाठी सुमारे पाच किमी दूर आहे. शिक्षण विभागातर्फे तोरणमाळमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खास निवासी आंतरराष्ट्रीय शाळाही आकार घेतेय, पण ग्रामस्थांचे आणि या बालरक्षक शिक्षकांचे म्हणणे आहे की, ती शाळा सुरू होईपर्यंत या मुलांकरिता तात्पुरती शाळा त्यांच्या पाड्यातच सुरू केली तर त्यांचे शिक्षण सुरळीत सुरू राहील. या आदिवासी मुलांना लवकरच शिक्षणाच्या प्रवाहात सामील होता यावे, त्यासाठी शुभेच्छा. 
(विशेष प्रतिनिधी, समता.शिक्षा वेबसाइट)


स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे 
snehswapn@gmail.com

बातम्या आणखी आहेत...