सत्ता संघर्ष / '...तर छोटा भाऊ म्हणून त्यांनी ऐकावं आणि चर्चा करावी, मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार आरोपांना उत्तरे दिली 

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2019 09:16:17 PM IST

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेत भाजप आणि फडणवीसांवर घणाघाती आरोप केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. "पंतप्रधान मोदी यांना मोठा भाऊ मानत असतील, तर छोटा भाऊ म्हणून त्यांनी मोठ्या भावाचं ऐकावं आणि सत्तास्थापनेसाठी चर्चा करावी", असा सल्ला मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना दिला.


मुनगंटीवार म्हणाले, "शिवसेनेने केलेले खोटारडेपणाचे आरोप आम्ही मान्य नाही करणार. विधानसभा निवडणुकीत ही गोष्ट कधीही पुढे आली नाही. निकालानंतर अचानक पत्रकार परिषद घेऊन सर्व पर्याय खुले असल्याची भाषा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी मानलेल्या भावाबद्दल मन कलुषित करणारी वक्तव्यं कोणी केली हे पाहावं. ते जर मोदींना मोठा भाऊ मानत असतील तर त्यांनी मोठ्या भावाचं ऐकून सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू करावी." असा सल्ला मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना दिला.


शिवसेनेकडून जनादराचा अनादर होतोय

"भाजपचं सत्तेवर नाही, तर सत्यावर प्रेम आहे. आमच्या पक्षाच्या नावातच पहिला शब्द भारतीय आहे. त्यानंतर जनता आणि मग पक्ष. त्यामुळे आमचं स्वप्न वंचितांचा, दिनदुबळ्याचा विकास करणं हा आहे. भाजपला खोटं ठरवण्याआधी त्यांनी विचार करावा. भाजपनं अजून दुसऱ्या पर्यायाचा विचार केलेला नाही. शिवसेनेकडून जनतेने दिलेल्या कौलाचा अनादर होतोय." असेही मुनगंटीवा म्हणाले.


X
COMMENT