आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात भाजपला जोरदार दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, फडणवीस सरकारला 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच, यात कोणतेही गुप्त मतदान होणार नाही, सर्व निकालाचे लाईव्ह टेलिकास्ट केले जाईल, असेही न्यायालयाने सांगितले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. बहुमत चाचणीत भाजप पराभूत होणार आहे. सरकार कोसळणार आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा अस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी भाजपला घ्यावी लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी असे आदेशही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांची निवडही लाईव्ह करण्यात यावी. हंगामी अध्यक्षांच्या अंतर्गत बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे आता बुधवारी सायंकाळी पाच वाजेपुर्वी सर्व आमदारांचे शपथविधी पूर्ण करुन भाजपला बहुमताची चाचणी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे.
व्हीप काढण्याचा आधिकार जयंत पाटलांकडे
राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार नसून, जयंत पाटील यांचीच अधिकृत नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. विधिमंडळाच्या रेकॉर्डवर अजित पवारांचे नाव नाही. त्यामुळे जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते असून त्यांना व्हीप काढण्याचे अधिकार असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतो. राज्यपाल आणि विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभा अध्यक्षांना माहिती नसते. राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.