...तर आज दहशतवाद दिसला नसता; संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांचे मुंबईत मत

दिव्य मराठी

Apr 26,2019 10:48:00 AM IST

मुंबई - मुंबईवर २६-११ ला हल्ला झाला. त्यानंतर केंद्रातील मनमोहन सिंह सरकारने कठोर पावले उचलून सैन्याला पूर्ण अधिकार दिले असते तर आज परिस्थिती वेगळी दिसली असती. परंतु त्यांनी धमक न दाखवल्याने देशात दहशतवाद वाढला, असा आरोप केंद्रीय सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मुंबईत काँग्रेसवर केला.


निर्मला सीतरामन मुंबईत प्रचारासाठी आल्या असून शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी त्यांनी प्रचार सभा घेतली. त्यापूर्वी भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, पुलवामानंतर आमच्या सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलली, सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आणि त्यामुळेच थेट पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला. यासाठी कणखर नेतृत्व लागते आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने मिळाले आहे. परंतु देशातील विरोधी पक्ष दहशतवादाविरोधातील लढाईत सरकारच्या बाजूने रहाण्याऐवजी सरकारकडेच पुरावे मागत आहेत. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

अटलजी इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहिले होते
१९७१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहिले होते, त्यानंतर देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप नेहमीच सरकारच्या पाठीशी उभा राहिला, परंतु आज विरोधी पक्ष फक्त राजकारण करू पाहत आहे असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, यंदाच्या लाेकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळणार असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्जिकल स्ट्राइकबाबत देशात उत्साह
प्रचारात आम्ही राष्ट्रवादाचा मुद्दा मांडतो. कारण जनतेला ते आवडते असे सांगून त्या म्हणाल्या, मी कर्नाटक आणि केरळ मध्ये प्रचारासाठी गेले होते. तेथे सभामध्ये मी आम्ही केलेल्या विकासकामांबद्दल बोलायला लागले तेव्हा मला जनतेकडून चिठ्ठी पाठवून पुलवामा, बालाकोट बद्दल बोलायला सांगितले, मी त्यावर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा टाळ्यांचा गजर झाला. सर्जिकल स्ट्राइकबाबत केवळ उत्तर भारतच नव्हे तर संपूर्ण देशात उत्साह आहे, असेही त्या म्हणाल्या.

X