congress / विधिमंडळात खांदेपालट : काँग्रेसचे आता सोशल इंजिनिअरिंग, दोन्ही सभागृहांतील गटनेते, उपनेतेपद बिगर मराठा आमदारांना

बाळासाहेब थाेरातांकडे विधिमंडळ नेतेपद, बसवराज पाटील मुख्य प्रताेद
 

विशेष प्रतिनिधी

Jun 15,2019 09:51:00 AM IST

मुंबई - वर्षानुवर्षे मराठा समाजाचे वर्चस्व राहिलेल्या प्रदेश काँग्रेसने लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अाता विधिमंडळातील गटनेते व उपनेतेपदी प्रामुख्याने बिगर मराठा आमदारांना संधी दिली अाहे. राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुढाकाराने काँग्रेसने हे सोशल इंजिनिअरिंग साधत तळातील जातगटांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे.


राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडील विधिमंडळ नेतेपद व विराेधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. त्यात विधिमंडळ नेतेपदी पक्षाने नगर जिल्ह्यातीलच ज्येष्ठ नेते तथा विखेंचे कट्टर विराेधक बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावली. विधानसभा गटनेतेपद विदर्भातील विजय वडेट्टीवार यांच्याकडे, तर उपनेतेपद चांदिवलीचे नसीम खान यांना देण्यात आले. विधान परिषदेतील गटनेतेपद पुण्याचे शरद रणपिसे यांच्याकडे, तर उपनेतेपद सोलापूरचे रामहरी रुपनवर यांच्याकडे सोपवले आहे. यापैकी थाेरात वगळता इतर चारही महत्त्वाची पदे बिगरमराठा आमदारांकडे सोपवण्यात आली आहेत. यात महत्त्वाचे विधानसभेतील विराेधी पक्षनेतेपद वडेट्टीवारांकडे जाऊ शकते.


या निवडीत खर्गे यांनी मुख्य भूमिका बजावली. ते स्वत: अनुसूचित जाती गटातून (गुलबर्गा, कर्नाटक) आहेत. ‘विधिमंडळात काँग्रेसच्या नेतृत्वात सोशल इंजिनिअरिंग दिसायला हवे, अशी आपली भूमिका होती, त्यानुसार निवडी करण्यात आल्या आहेत’, असे त्यांनी सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात उघडपणे भाजप उमेदवाराचा प्रचार केलेले माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना प्रतोद करण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरात
सहकारातील मातब्बर मराठा नेते, गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर विरोधक, सध्या ते गुजरात राज्याचे प्रभारी.


विजय वडेट्टीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील अामदार. विधानसभेत उपनेते, अशोक चव्हाणांचे समर्थक, विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणे शक्य. ओबीसी जातगटाचे नेते आहेत.


नसीम खान
अल्पसंख्याक नेते. मुंबईतील चांदिवलीचे आमदार, मिलिंद देवरा व अशोक चव्हाण यांचेही समर्थक. अल्पसंख्याक मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले.

शरद रणपिसे (विधान परिषद सदस्य)
पुण्याचे असून ते अनुसूचित जातगटातून आलेले आहेत. अभ्यासू सदस्य म्हणून ओळख.


रामहरी रुपनवर (विधान परिषद सदस्य)
साेलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचेे नेते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे विरोधक.

टीम काँग्रेस
विधानसभा :
बाळासाहेब थोरात (विधिमंडळ नेते), विजय वडेट्टीवार (गटनेते), नसीम खान (उपनेते), बसवराज पाटील (मुख्य प्रतोद), के. सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे (सर्व जण प्रतोद).


विधान परिषद : शरद रणपिसे (गटनेते), रामहरी रुपनवर (उपनेते), अशोक ऊर्फ भाई जगताप (प्रतोद).

X
COMMENT