आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक धारणा आणि तत्कालीन संदर्भ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यातून आपण माणूस त्या त्या वेळच्या सामायिक धारणा शोधतो. त्या चुकीच्याही असू शकतात, बरोबरही. एकटा कवी/लेखक नव्हे, तर लेखकू, समाजधारणा, संस्कृती यांच्या धुक्यातून कथेला चाचपडायचे असते. 
 
आज उपलब्ध प्राचीन साहित्य हे मौखिक परंपरेतून आले आहे. लिपी, मुद्रणकला यांच्या शोधानंतर ते लेखकूंनी भूर्जपत्रांवर उतरवले. त्यात नव्याने भर पडली, प्रक्षिप्त गोष्टी घुसडल्या गेल्या. चिकित्सक आवृत्त्यांमध्ये प्रक्षिप्त शोधण्याचा, संपादित करण्याचा प्रयत्न झाला/ होतो. 

अनेक रामायणे लिहिली गेली. त्यातील वाल्मिकी रामायण टिकले, लोकप्रिय झाले. म्हणून वाल्मिकी आद्यकवी ठरला. एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाची कथा लिहिली. तिच्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पडले.  कुठल्याही साहित्याकडे “तत्कालीन पर्यावरणातून” पहात चिकित्सा करावी. पुरुषप्रधान व जेत्यांना महत्व देणारीच ती संस्कृती होती/ आहे. सीतेवर अन्याय झालेला आपल्या संस्कृतीला मान्य झाला/होत असतो. राम आदर्श पुत्र, भाऊ व पती व राजा म्हणूनही अनेकांचे श्रद्धास्थान झाला. आज आधुनिक, पुरोगामी, मानवतावादी व विवेकी वातावरणातून भूतकाळाकडे बघताना आपल्याला अन्याय करणारा राम व हे पात्र आदर्श म्हणून बिंबवणारा वाल्मीकी दोघेही दोषी वाटतात. त्यावर वादही होतात. त्याला वर्ग-वर्ण-जात-धर्म यांच्या मोजपट्ट्याही चिकटवल्या जातात. 

ग्रंथ जाळले जातात. आज आपण दलित जाणिवा, स्त्रीवाद, स्वातंत्र्य इ. परिप्रेक्ष्यातून पुराणकथांकडे पाहतो. मागे वळून बघताना आपण  जिथे उभे आहोत, तिथले पर्यावरण  पुराणकथांमध्येही हवे, अशी अपेक्षा करतो. काळाचा विपर्यास करतो.वाल्मिकीने अमुक लिहायला हवे, नायक असा दाखवायला हवा होता, असे म्हणतो. म्हणजे त्याचे (उपलब्ध, प्रक्षिप्त जी आवृत्ती आहे त्याचे) अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमान्य करतो. वाल्मीकी शोषित समाजातला होता हे खरे की तीही दंतकथा? शोषित समाजातला असूनही त्याने जेत्यांची भाटगिरी केली, हे बरोबर नाही, असे काही जण उद्वेगाने व उपरोधाने म्हणतात. म्हणजे कोणी काय लिहावे, कुणाला काय सुचावे, यांवर बंधने घालणे होय. कुणाला युद्धाची कथा लिहावीशी वाटेल, कुणाला चोराची. पुराणकथांमध्ये लेखकूंकडून संदर्भ, श्लोक, उपकथा घुसडल्या जातात. हेही  “तत्कालीन पर्यावरणा”स धार्जिणे असते. उदा. धोब्याची कथा. ही वाल्मीकीची की  
घुसडलेली? कसे ठरवणार? कदाचित वाल्मिकींनी वेगळा शेवट केला असेल. कदाचित लव-कुशांनी काही बदल केले असतील...तात्पर्य अतिप्राचीन साहित्याविषयी विश्वासार्ह माहिती नसते.
 

रामकथा हा वाल्मीकींच्या प्रतिभेने निवडलेला हुंकार असू शकतो. त्याला महाकवी माना/नका मानू. त्याला उत्तर देण्यासाठी प्रति-रामायण/रावणायन/सीतायन/अमकायन लिहावे. तेही तितकेच रसाळ, काव्यमय नि नाट्यपूर्ण की काळ त्यालाच डोक्यावर घेईल, नाकारेल वा उपेक्षेने मारेल. साहित्यातून आपण माणूस नि त्या त्या वेळच्या सामायिक धारणा शोधतो. त्या चुकीच्याही असू शकतात, बरोबरही. एकटा कवी/लेखक नव्हे, तर लेखकू, समाजधारणा, संस्कृती यांच्या धुक्यातून कथेला चाचपडायचे असते.

बातम्या आणखी आहेत...