Crime / दारू विक्रेत्यांकडून ७ महिलांना मारहाण, पोलिस मदत करत नसल्याने सामाजिक कार्यकर्तीने ठाण्यात घेतले विष

पोलिसांना सोबत न्यायचे होतेः पोलिस निरीक्षक बुधवंत
 

प्रतिनिधी

Jun 08,2019 11:39:21 AM IST

माजलगाव - तालुक्यातील अवैद्य दारू विक्रीवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या दिरंगाई कामगिरीविरुद्ध दारूबंदी चळवळीत काम करणाऱ्या सत्यभामा सौंदरमल यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात विष प्राशन केले.


निर्धार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सत्यभामा सौंदरमल काम करतात. तालुक्यातील किट्टीआडगाव येथे अवैद्य दारू विक्री व गावठी दारूमुळे या गावातील अनेक तरूण व्यसनाधीन झाल्यामुळे गावातील अर्चना साधू ससाणे, शहाबाई किसन ससाणे, सुनीता उद्धव ससाणे यांनी आपल्या गावातील दारू विक्री बंद व्हावी, यासाठी सत्यभामा सौंदरमल यांना माहिती दिली. त्यानुसार सौंदरमल या शुक्रवारी दुपारी किट्टी आडगाव येथील माळेवाडी रोडवर असणाऱ्या तळ्यात गावठी दारूचे अड्ड्यावर महिलांसह पोहोचल्या आणि विक्री बंद करा असे म्हणाल्या असता दारू विक्रेत्याकडून सौंदरमल यांच्यासह सात महिलांना मारहाण झाली. यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडित महिलांसह सौंदरमल यांनी जाऊन पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांना हा सर्व प्रकार सांगितला. यावर बुधवंत यानी तुम्हाला गावठी दारूच्या अड्यावर कोणी जायचे सांगितले, असे सांगून हाकलून दिले. यावर संतापलेल्या सौंदरमल यांनी दारू विक्रेत्यांची पाठराखण करणाऱ्या बुधवंत यांच्या निषेधार्थ ठाण्यातच विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

पोलिसांना सोबत न्यायचे होतेः पोलिस निरीक्षक बुधवंत
किट्टी आडगावात गावठी दारू अड्ड्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्यक होते. मारहाण झालेल्या महिलांनी तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करता आला नाही. सदरील दारू विक्रेत्यावर कारवाया करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी सांगितले.

X
COMMENT