आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- ग्रामपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या बळकट करण्यासाठी सहकार खात्याने 'अटल अर्थसाह्य योजना' जाहीर केली. यातून सोसायट्यांनी शेतीपूरक उद्योग करून गावे स्वयंपूर्ण करणे अभिप्रेत आहे.
एकूण प्रकल्प किंमत ४० लाख रुपये ठरले. त्याच्या ७५ टक्के (कमाल ३० लाख रुपये) अनुदान मिळेल. या पैशातून सोसायट्यांनी धान्य, फळे, भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र, गोदाम, वाहतुकीसाठी वाहने, सहकारी ग्राहक भांडार, जलशुद्धीकरण प्रकल्प, वॉटर एटीएम, शेतमाल पॅकेजिंग, कापडी किंवा ज्यूट पिशव्यांची निर्मिती, असे उद्योग करू शकतात.
गावातला पैसा गावातच खर्चला जावा, त्यातून खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, या उद्देशाने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. याबाबत त्यांनी सातत्याने बैठका घेतल्या. शेतमाल उत्पादक ते ग्राहक या दरम्यान असलेल्या साखळीतील सर्व घटकांचा विचार करून त्यातील व्यवसाय संधी शोधण्यात आल्या. या संधी म्हणजेच ठरलेले शेतीपूरक उद्योग, स्वच्छ पाणी प्रकल्प आदी. या शिवाय स्थानिक गरजांनुसार नावीन्यपूर्ण प्रकल्पही प्रस्तावित आहेत. एकूण प्रकल्पाच्या साडेबारा टक्के हिस्सा देऊन सोसायट्यांना या योजनेत सहभागी होता येते.
सेवा सहकारी सोसायट्यांचे आजचे स्वरूप कसे आहे..?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गावातील शेतकरी सभासदांना शेतीकर्जे देण्याचे माध्यम म्हणून सध्या सोसायट्या काम करतात. त्याच्या वसुलीवर या संस्थांना मोबदला मिळतो. एवढ्यावरच या संस्था टिकून आहेत. वसुली नसलेल्या सोसायट्यांची गोची होते. याशिवाय गावातील राजकारणही याच सोसायट्यांच्या माध्यमातून होत असते. कुणाला सभासद करायचे, कुणाला कर्जे द्यायची, हे ठरवण्याचे अधिकार सोसायट्यांना आहेत. काही लोकांची मक्तेदारी असते.
सोलापूर जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांना १५ कोटी
ही योजना राज्यभरातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसाठी आहे. राज्यातील ५ हजार सोसायट्या या योजनेतून बळकट करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी १५ कोटी १८ लाख रुपये मिळाले. राज्यभरातील निवडक सोसायट्यांसाठी एकूण ४९० कोटी रुपयांची ही योजना अाहे. ३४ जिल्ह्यातील ३५५ तालुक्यांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांतील सोसायट्यांना प्राधान्याने कर्जवाटप होईल.
आता सेवा सहकारी सोसायट्यांनी नेमके करायचे काय?
१. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करावी, विक्री करावी आणि शेतकऱ्यांचा नफा वाढवावा. शेतमालाची स्वच्छता आणि प्रतवारी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा.
२. शेतकरी ते ग्राहक यामध्ये असणारी मूल्य साखळी कमी करावी. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. जसे-गोदामे उभारून शेतमालाची साठवणूक.
३. ग्रामीण भागातील शिक्षित तरुण शेतीशी निगडित व्यवसाय करू इच्छित असेल तर त्याला प्रोत्साहन द्यावे. सोसायटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या व्यवसायात त्याला सामावून घ्यावे.
४. प्रक्रिया केलेली उत्पादने शहरी भागात, घाऊक विक्रेते, निर्यातदार, प्रक्रियादार, किरकोळ विक्रेते, बाजार समित्या, मॉल या ठिकाणी नेऊन त्याची विक्री करावी. जेणेकरून अधिक दर मिळेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.