आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज, साहित्य आणि जात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा.सुदाम राठोड

साहित्यातील "या' दहशतवादावर कोण बोलणार? या ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या १९ जानेवारी २०२० च्या "दिव्य मराठी रसिक' पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखावर कवी सुदाम राठोड यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. 

मराठी लेखक ज्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात राहतो, त्याची संरचना जात निर्धारित आहे. जातीव्यवस्था हे या सामाजिक संरचनेचे मूलद्रव्य आहे. हे मूलद्रव्य कला, साहित्य, भाषा, संस्कृतीसोबतच मानवी वर्तनातूनही झिरपत असते. जात हे या समाजाचे वास्तव आहे आणि ते नाकारणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करणे होय. हे जात वास्तव जाणीवेच्या पातळीवर असेल तर सहजपणे डोळ्यात भरते. पण ते नेणिवेच्या पातळीवर असेल तर सहजासहजी लक्षात येत नाही. ही जात कळत नकळत साहित्यातूनही झिरपतच असते. वर वर पाहता हे साहित्य निखळ साहित्य वाटत असते. पण त्यातही एक सांस्कृतिक राजकारण दडलेलं असतं. लेखक ज्या जाती घटकातून आलेला आहे, त्याचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पडणं स्वाभाविक आहे. पण साहित्यातून अशी जात दिसणं किंवा विशिष्ट जाती समूहाचे चित्रण असणं याला जातिवाद म्हणत नाही. 

जातीवाद म्हणजे जातीच्या आधारावर उच्च कनिष्ठ असा भेदभाव करणे, शोषण करणे, संधी नाकारणे अथवा वर्चस्ववाद जोपासणे होय. शक्यतो जात उतरंडीतील खालच्या जाती याच्या शिकार असतात. या जातींनी वर्चस्ववादी सांस्कृतिक राजकारणाविरोधात पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करणे किंवा त्यासाठी एकत्र येणे याला जातीवाद म्हणत नाही. एकत्र येणं ही त्यांची सामाजिक, सांस्कृतिक गरज असते. परंतु अलीकडे रिव्हर्स जातीवाद नावाचा प्रोपोगंडा हेतूपूर्वक पसरवला जातोय. हे पसरवण्याचे काम काही सजातीय पुरोगामी लेखक मंडळी करत आहेत. आपल्याकडे पुरोगामित्व देखील जातसापेक्ष आहे हे खेदाने म्हणावे लागते. ही पुरोगामी म्हणवणारी लोकं स्वजातीची चिकित्सा करणे टाळतात. इतर कुणी केली  तर त्याला जातीवादी ठरवतात. पण खरोखरच असा रिव्हर्स जातीवाद नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे का?असेल तर किती विजातीय लोकांचे ऑनर किलिंग घडवून आलेत? किती लोकांना गावकुसाबाहेर हाकलले गेले? कितींवर सामूहिक बहिष्कार टाकला गेला किंवा कुणाकुणाला संधी नाकारून त्यांचे आर्थिक शारीरिक मानसिक शोषण केले गेले? हेही स्पष्ट झाले पाहिजे. सगळ्याच जातींच्या अस्मिता टोकदार झाल्या आहेत. त्याचे पडसाद साहित्यातही उमटू लागले आहेत हे मान्यच करावे लागेल. मराठी साहित्यात जातीवाद फार पूर्वीपासून आहे. अगदी मध्ययुगाच्या प्रारंभापासून आहे असं म्हटलं तरी चालेल. पण त्यामागे जातीपेक्षा धार्मिक प्रेरणा अधिक प्रबळ होत्या. पण याच धार्मिक प्रेरणांच्या माध्यमातून संतांनी ‘यातीकुळ अप्रमाण’ मानण्याचे जे धाडस केले ते त्या काळातील फार मोठे क्रांतिकारी पाउल होते. अशा क्रांतिकारी घटना साहित्यात प्रत्येक काळात घडत आल्या आहेत. फक्त त्याची नोंद जात निरपेक्ष झाली नाही हा मुद्दा आहे. अभिजात साहित्य वगैरे असं काही नाही. ते सगळं विशिष्ट जात जाणीवांनी प्रभावित झालेलं साहित्य आहे. 

मध्ययुगीन काळ बाजूला ठेवू. आधुनिक साहित्यात तरी कुठे जातनिरपेक्षता दिसते? आधुनिक जाणिवेचे नाटक, कविता, ललित, वैचारिक असे विविध साहित्य प्रकार ताकदीने हाताळूनही आधुनिक साहित्याच्या जनकत्वाचा मान म. फुलेंना मिळाला नाही. काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर यांसारखे अतिशय समृद्ध कवितासंग्रह लिहूनही कवयित्री म्हणून सावित्रीबाई फुलेंची नोंद घेतली गेली नाही. अर्थात ज्या जात वर्गातील बहुसंख्य लोकं लिहिती असतील त्यांच्या जात जाणिवा तत्कालीन साहित्यात प्रबळ असतील ही गोष्ट मान्यच केली पाहिजे. पण साहित्याचं सौंदर्यशास्त्रच त्या दृष्टीने विकसित झालं असेल तर त्यातून जातीवादच पोसला जातो. कारण त्या सौंदर्यशास्त्रात न बसणाऱ्या साहित्याची दखलच घेतली जात नाही किंवा साहित्य म्हणून त्याला मान्यताच दिली जात नाही. मराठी साहित्य हे कुणा एकाच्या मालकीचे नाही. मराठी बोलणाऱ्या- लिहिणाऱ्या - वाचणाऱ्या सगळ्या जाती धर्माचे, वर्णाचे, वर्गाचे ते साहित्य आहे. पण ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ असे सौंदर्यशास्त्र विकसित झाले असेल तर हा एक प्रकारचा जातीवादच आहे. मग इथल्या दलित-भटक्या-आदिवासींच्या काळ्या रंगाचे काय करायचे? म्हणून कॉम्रेड शरद पाटलांना अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र सिद्ध करावे लागले. पण आता मराठी साहित्यात केवळ ब्राम्हणी-अब्राम्हणी एवढाच वाद उरलेला नाही. त्यामागे प्रबळ झालेल्या बहुसंख्य जातजाणिवा आहेत.

जातजाणीव हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे. त्याचे कारण जात वेगळी असेल आणि लेखन आपल्या जाणिवेचं असेल तर अशा विजातीय लेखकांना स्वीकारलं जातं. जात एकच असेल आणि लेखन वेगळ्या जाणिवेचं असेल तर सजातीयांनाही नाकारलं जातं. याचा अर्थ जातीपेक्षा साहित्यातील जाणीव महत्वाची आहे असे मात्र अजिबात नाही. कारण या जाणिवा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जातींनी प्रभावित झालेल्याच असतात. समकालीन मराठी साहित्यात ग्रामीण, महानगरी, दलित, स्त्रीवादी या प्रभावी जाणिवा आहेत. या जाणिवा खरेतर जातीय नव्हत्या. मात्र नंतर त्यांना जात चिकटली. ती चिकटावी अशी परिस्थिती काही महाभागांनी निर्माण केली. या जाणिवांमध्ये कुठल्या जाती बलवत्तर ठरल्या आहेत ते वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात आपापल्या जातींचे प्रश्न, वेदना साहित्यातून मांडल्या जाणे हा काही जातीयवाद नाही. त्याला विरोध असण्याचेही काही कारण नाही. पण आपापले सांस्कृतिक अजेंडे रेटण्यासाठी जी सजातीय गटबाजी होते ती साहित्याच्या गुणवत्तेला बाधा पोहचवणारी आहे. तो खरा साहित्यातला जातीवाद आहे.

लेखकाचा संपर्क - ९८३४९७४००८

बातम्या आणखी आहेत...