आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर : परिवहनच्या सिटीबस आज दुपारपासून धावणार, संप मिटला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दोन महिन्यांचे वेतन अदा करणे, त्यात एक महिन्याचे रोखीने तर एक महिन्याचे बँकेत वेतन अदा करणे. याशिवाय ११ कर्मचाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या अटीवर मागील २२ जानेवारीपासून सुरू असलेला संप सोमवारी १४ व्या दिवशी मागे घेण्यात आला. 


याबाबत महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी मध्यस्थी करून कामगार संघटनेबरोबर चर्चा केली. त्यानंतर सोमवारी संप मागे घेण्यात आला. दरम्यान मंगळवारी दुपारी वेतन अदा केल्यावर सिटीबस धावतील, असे परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 


परिवहन सेवकांचे थकीत अदा करण्याच्या मागणीसाठी २२ जानेवारीपासून परिवहन कर्मचारी संपावर होते. संपास प्रहार संघटनेने पाठिंबा देत आंदोलन आक्रमक केले. प्रवाशांचे हाल सुरू झाले. पालिकेची अार्थिक परिस्थितीचे कारण देत मदत करण्यास आयुक्तांनी असमर्थता दर्शवली.त्यामुळे संप चिघळत चालला होता. 


महापौर कक्षात दोन तास बैठक 
विरोधी पक्ष आंदोलनाच्या तयारीत असताना सोमवारी सकाळी परिवहनचे कर्मचारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्याकडे जाऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली. महापौर बनशेट्टी यांनी आयुक्तांना याबाबत माहिती देत महापौर कक्षात बैठक बोलावली. आयुक्त ढाकणे, सभागृह नेते संजय कोळी, परिवहन सभापती तुकाराम मस्के, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक अमोल शिंदे परिवहन सदस्य यांच्यात सुमारे दोन तास बैठक झाली. आयुक्तांनी पालिकेची परिस्थिती सांगितली. चर्चेअंती एक महिन्याचे वेतन देण्यास आयुक्तांनी होकार दिला. 


वेतन दिल्यानंतर सेवा 
परिवहन कर्मचाऱ्यांचे वेतन मंगळवारी देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता सिटीबस रस्त्यावर धावणार आहेत. कारण प्रशासन जो पर्यंत वेतन देत नही तो पर्यंत बससेवा सुरू करणार नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 


परिवहन डेपोत चर्चा व तोडगा 
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन कर्मचाऱ्यांना बोलावून दोन महिन्यांचे वेतन देऊ, ११ कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊ, असे आश्वासन दिलेयावेळी प्रहार संघटनेचे मुनीर शेख, नगरसेवक नरोटे, परिवहन कर्मचारी संघटनेचे देविदास गायकवाडसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. वेतन मिळाल्यानंतर बस रस्त्यावर आणू, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. महापौरांनी मागणी मान्य केल्यानंतर संप मिटला. 


एक वेतन मनपा, तर एक परिवहन देईल 
१४ दिवसांपासून सुरू असलेला संप दोन महिन्यांच्या वेतन देण्याच्या अटीवर मिटला आहे. एक वेतन महापालिका तर एक वेतन परिवहन विभाग अदा करेल. मंगळवारी प्रक्रिया सुरू होईल. संप मिटला. नागरिकांना मंगळवारपासून सुविधा मिळेल. शोभा बनशेट्टी, महापौर 

बातम्या आणखी आहेत...