आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेस नीती आयोगाने दिली मंजुरी; 994 कोटींची तरतूद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर-तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाला नीती आयोगाने बुधवारी मंजुरी दिली. यासाठी आधी जाहीर १२८२ कोटी रुपयांच्या निधीत २८८ कोटी रुपयांची कपात करून आता ९९४ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती रेल्वे बोर्डातील सूत्रांनी दिली. 

 

दिल्लीत बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जानेवारीला विविध विकासकामांच्या उद््घाटनासाठी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना सोलापूर -तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) सादर केला होता. त्यांनी त्याला मंजुरी दिली. वरिष्ठ स्तरावरून या मार्गासाठी प्रयत्न होत असल्याने काही दिवसांपासून दिल्लीत घडामोडी सुरू होत्या. बुधवारी रेल्वे बोर्डाची बैठक झाल्यानंतर नीती आयोगाचीही तातडीने बैठक झाली. प्रस्तावित मार्गासाठी ९९४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. कामाच्या गतीनुसार हा निधी उपलब्ध केला जाणार आहे. साधारणपणे दरवर्षी १५० ते २०० कोटी रुपये या मार्गासाठी उपलब्ध होणार आहेत. मोदींच्या हस्ते या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन व्हावे यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांच्यासह रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव हे सोलापूरला येण्याची शक्यता आहे.