आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर वनविहार : लाखो खर्चून उभारलेले फुलपाखरू उद्यान बहरण्यापूर्वीच कोमेजले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहराच्या मध्यवर्ती परिसरातील सिद्धेश्वर वनविहारात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाची दुरवस्था झालीय. फुलपाखरांचा आकार दिलेले फायबरचे सांगाडे शिल्लक असून एकही रोपटे जिवंत नाही. राखीव वनक्षेत्रात वनराई फुलवण्याऐवजी सिमेेंटचा वापर करून बांधकामावर वनअधिकाऱ्यांचे विशेष 'लक्ष' आहे. 


देशभरात फुलपाखरांच्या दीड हजार जाती आहे. त्यापैकी ६५ ते ७० प्रकारची फुलपाखरे सोलापुरात आढळतात. त्यामुळे निसर्गप्रेमींंनी फुलपाखरे उद्यान उभारण्याची अपेक्षा व्यक्त केलेली. वनविहारात काही दुर्मिळ फुलपाखरे आढळत असल्याने त्याच्या निरीक्षणासाठी ज्येष्ठ फुलपाखरू अभ्यासक व जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी अनेकदा वनविहाराला भेटी दिल्या होत्या. या ठिकाणी फुलपाखरू उद्यान उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी डॉ. बर्डेकरांनी दाखविली होती. त्याकडे वनविभागाने लक्ष दिले नव्हते. गेल्या दोन वर्षामध्ये वनविहारास पर्यटन विकासासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला. 


सिमेंटीकरणावर भर 
१८६ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या सिद्धेश्वर वनविहारात अनेक वन्यजीव आढळतात. राखीव वनक्षेत्रात झाडांची लागवड करण्याऐवजी सिमेंटचा वापर करून बांधकामांवर अधिक भर देण्यात आला. प्रवेशद्वार परिसरासह, अंतर्गत रस्त्यावर पेव्हरब्लॉक टाकण्यात आले. नैसर्गिक अधिवास वाढविण्याएेवजी वनक्षेत्रात बांधकाम करण्याचा उद्देश असल्याचे दिसते. 


सहा महिन्यात दूरवस्था...: वनविहारात फुलपाखरू उद्यान उभारण्यासाठी साडेतीन लाखांचा निधी मंजूर झाला. प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर उद्यान उभारले. फायबरच्या प्लेटलावून त्यास फुलपाखराचा आकार दिला. त्या भोवती फुलपाखरांना आकर्षित करणारी, अंडी घालण्यास आवश्यक रोपं जुलै महिन्यात (२०१८) लावण्यात आली. सुरवातीचे काही दिवस रोपं सुस्थितीत होती. पण, त्यानंतर पाण्याची सोय, व्यवस्थित संगोपन न झाल्याने सगळी रोपं करपली. उद्यानमध्ये एकही रोप जिवंत नाही. फक्त फायबरचे सांगाडे शिल्लक आहे. 


वनविहारात उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानमधील काही चांगली रोपे व्यायाम, फिरण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांनी काढून नेलीत. मध्यंतरी टाकी बंद पडल्याने पाणी नसल्याने रोपे वाळली. त्यासाठी साडेतीन लाखांचा निधी खर्ची पडला. तुषार सिंचन करून पुन्हा त्याचे संवर्धन करू. निकेतन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर 


चंदन चोरीचा रखडला तपास 
गेल्यावर्षी (सन २०१८) मे महिन्यात वनविहारातील ४० पेक्षा जास्त चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून नेली. स्थानिक वन्यजीव प्रेमींनी पोलिसांच्या मदतीने त्या चोरट्यांचा पाठलाग केला. त्या चोरट्यांची मोटारसायकल, झाडे तोडीचे साहित्य जप्त करण्यात आले. त्या आधाराने चोरट्यांचा तपास लावण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. 


वनविहारात ७० पेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे आढळतात. उद्यानासाठी फक्त त्यांना आकर्षित करणारी रोपे, मडपडलिंगची सोय केल्यास सहज ती आढळतील. राखीव वनक्षेत्रात नैसर्गिकता जपणे आवश्यकता आहे. वनविहार हे वन्यजीव अभ्यासकांसाठी जणू विद्यापीठ आहे. ऋतुराजा पाटील, फुलपाखरांचे अभ्यासक, सोलापूर 


फुलपाखरू पार्कसाठी या गोष्टींची गरज 
- काही विशिष्ट झाडी, झुडपं, गवत वाढविणे 
- आर्द्रता राखण्यासाठी तुषार सिंचन बसवणे 
- रासायनिक आैषधे, खतांचा वापर न करणे 
- निसर्ग परिचय केंद्रात फुलपाखरांची सचित्र माहिती 

बातम्या आणखी आहेत...